![]() |
| शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. |
पूजाच्या मृत्यू प्रकरणी विरोधीपक्षांनी मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून घाणेरडं राजकारण केलं आहे, असा आरोप राठोड यांनी केला आहे.
पूजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू, तसंच या प्रकरणी 19 दिवस एफआयआर दाखल न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
पूजा चव्हाण प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच नाव आल्यानं त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्य सरकार आणि शिवसेनेवरही विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली आहे.
संजय राठोड यांच्याबाबत निर्णयासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या सरकारी निवासस्थानी 24 फेब्रुवारी रोजी एक बैठकही पार पडली होती. या बैठकीला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते. मात्र, या बैठकीनंतरही संजय राठोड यांच्याबाबत कुठलाच निर्णय जाहीर करण्यात आला नव्हता.
परळी येथील पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील महंमदवाडी येथील हेवन पार्क या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
महंतांची मागणी
दरम्यान संजय राठोड यांचा चौकशीआधीच राजीनामा घेऊ नका अशी मागणी महंत सुनील महाराजांनी केली होती.
"मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या दबावाला बळी पडू नये. चौकशी न करता राजीनामा घेतला तर बंजारा समाजात असंतोष निर्माण होईल, त्याला भाजप जबाबदार राहील. संजय राठोड यांना दोषी ठरवणं म्हणजे बंजारा समाजाला दोषी ठरवणं होईल, चौकशीतून येमारा निकाल सर्वांना मान्य राहील त्यामुळे चौकशी होईपर्यंत राजीनामा घेऊ नये अशी आमची विनंती आहे, "असं सुनील महाराज यांन म्हटलंय.
संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजूर करावा अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.
तसंच अकार्यक्षम पोलिसांवर कारवाई करण्याची मागणीसुद्धा चित्रा वाघ यांनी केली आहे.
"पूजा चव्हाण घटनेत समोर आलेले सगळे अपडेट्स पाहाता प्रकरणाचा थेट रोख शिवसेना मंत्री संजय राठोडांकडे जातो. पोलिसांनी स्यूमोटो घेऊन मंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा," अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आधी केली होती.
"पुरावे असतांनाही मुसक्या आवळायच्या सोडून कसली वाट पहाताय," असा सवालही चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येभोवती संशयाचे वर्तुळ निर्माण झाले असून याप्रकरणी सखोल चौकशी पोलिसांनी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
संजय राठोड कोण आहेत?
संजय राठोड हे शिवसेनेच्या कोट्यातून विदर्भातील एकमेव कॅबिनेट मंत्री आहेत. राठोड यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. बंजारा समाजाचे नेतृत्व करणारे आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांना ओळखलं जातं.
संजय राठोड यांनी वयाच्या 21व्या वर्षी शिवशक्ती संघटनेतून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वयाच्या 27व्या वर्षी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. दारव्हा, दिग्रस, नेर या तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी त्यांनी केली.
शिवसेना जिल्हाध्यक्ष असतांना आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. यवतमाळातील जवाहरलाल दर्डा विमानतळाला 'संत गाडगे बाबा विमानतळ' हे नाव देण्यासाठी त्यांनी धावपट्टी खोदून मोठं आंदोलन केलं होतं. या आंदोलनानं राज्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
त्यानंतर त्यांनी यवतमाळच्या राजकारणात मजबूत पकड निर्माण केली. यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणावर दबदबा असणाऱ्या माणिकराव ठाकरे यांना त्यांनी थेट आव्हान दिलं.
अगदी ग्रामपंचायतीपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या दारव्हा मतदारसंघात संजय राठोड यांनी शिवसेनेचा भगवा फडकवला. 2004मध्ये तत्कालीन गृह राज्यमंत्री असलेल्या माणिकराव ठाकरेंचा पराभव करत ते पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले.
2009 मध्ये दारव्हा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यातून दारव्हा मतदार संघ रद्द होऊन दिग्रस मतदार संघ अस्तित्वात आला. या मतदारसंघातून राठोड यांनी तत्कालीन क्रीडा मंत्री संजय देशमुख यांचा पराभव केला.
राठोड यांनी 2014 मध्ये आमदारकीची हॅटट्रिक साधली. राष्ट्रवादीचे नेते वसंत घुईखेडकर यांचा त्यांनी पराभव केला. 2019 मध्ये संजय देशमुख यांचं तगडं आव्हान त्यांच्यापुढं होत. असं असतानाही तब्बल 60 हजार मताधिक्यांनी ते विजयी झाले. त्यामुळे राठोड यांची मंत्रीपदासाठी वर्णी लागली. सध्या संजय राठोड ठाकरे सरकारमध्ये वनमंत्री आहेत.
यापूर्वी भाजप-शिवसेना सरकारमध्ये ते महसूल राज्यमंत्री होते. राज्यमंत्र्यांना काम करू दिलं जात नाही, असं म्हणत राठोड यांनी तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना थेट आव्हान दिलं होतं. त्यासाठी त्यांनी राजीनाम्याचं अस्त्र वापरलं होतं.
'ग्रामीण भागातील शिवसेनेचं नेतृत्व'
संजय राठोड हे ग्रामीण भागातील आमदार आहेत, असं मत ज्येष्ठ पत्रकार आशिष जाधव यांनी व्यक्त केलं.राठोड यांच्या राजकीय प्रवासाविषयी बोलताना ते सांगतात, "संजय राठोड ज्या मतदार संघातून येतात तो मतदार संघ कायम बंजारा, कुणबी बहुल राहिलाय. बंजारा मतं ही त्यांच्या विजयासाठी नेहमी निर्णायक राहिली आहे. या मतदार संघामधली बंजारा मतं संजय राठोड यांनी शिवसेनेच्या बाजूने फिरवली. बंजारा नेतृत्व म्हणून संजय राठोड हे जरी पुढे आले असतील, तरी त्यांनी समाज उपयोगी कामं किती केले, यावर वादविवाद होतील. ग्रामीण भागातील शिवसेनेनं उभं केलेलं नेतृत्व म्हणून संजय राठोड यांच्याकडे पाहता येईल."
पुढे बोलताना ते सांगतात "गेल्या 20 वर्षांमध्ये आपण जर शिवसेनेचा कार्यकाळ बघितला खासकरून युती सरकारच्या काळातला कार्यकाळ बघितला, तर विदर्भामध्ये यवतमाळमधील दारव्हा दिग्रस या भागात शिवसेना वाढली ती संजय राठोड आणि भावना गवळी यांचे वडील पुंडलिक दादा गवळी यांच्यामुळे.
संजय राठोड यांचा राजकीय प्रवास सामान्य कुटुंबातून मंत्रिपदापर्यंत झाला, असं मत हितवादचे जिल्हा प्रतिनिधी दिनेश गंधे व्यक्त करतात.
ते सांगतात, "संजय राठोड यांना राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी संपर्क वाढवला. आरोग्य सेवेत त्यांनी मोठं काम केलंय. तात्या लहाने यांच्याकडून घेतलेल्या शिबिरात त्यांनी हजारो लोकांचे डोळ्यांची शस्त्रक्रिया करून घेतली. यवतमाळ शहरात एवढे दिग्गज नेते असतांना स्वबळावर त्यांनी महाराष्ट्रात ओळख निर्माण केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी मोठे आंदोलन केली."
पूजा चव्हाण प्रकरणामुळे कोडींत सापडलेल्या वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत राठोड यांनी राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारलेला नाही. विधिमंडळाचं अधिवेशन तोंडावर असतानाच भाजपानं संजय राठोड यांच्या यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत अधिवेशनात कामकाज चालू न देण्याचा इशारा दिला होता.
याआधीच मुख्यमंत्र्यांकडून संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे संकेत गेले होते. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडीवर विरोधकांचा वाढता दबाव तसेच घटक पक्षांचा आक्रमकपणा पाहता मुख्यमंत्र्यांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. अधिवेशन काळात सत्ताधारी महाविकास आघाडीला लक्ष्य करण्यात येईल यामुळेच संजय राठोड यांना राजीनामा देण्यासाठी सांगण्यात आले.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात यापुढे पोलीस तपासात काय निष्पन्न होते यावरच संजय राठोड यांची मंत्रीमंडळातील पुर्नप्रवेश अवलंबून आहे. सध्या हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आले आहे. या प्रकरणातील चौकशी अहवालानंतरच संजय राठोड यांचा महाविकास आघाडीतील पुढचा टप्पा निश्चित होईल.
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा
www.nandednewsupdate.blogspot.com



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा