🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

मंगळवार, फेब्रुवारी ०९, २०२१

शेतकऱ्यांशी संबंधित योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी

 

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या संयुक्त बैठकीत निर्देश


मुंबई,दि.९ : शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा झाला तर शेती संदर्भात नियोजन करणे सोयीचे होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणि पेरणी हंगाम लक्षात घेऊन वेळेवर कर्जपुरवठा होणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांशी संबंधित विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना कृषिमंत्री दादाजी भुसे आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी येथे दिल्या.

 


नवीन प्रशासकीय भवन, मंत्रालय येथे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सहकार विभाग आणि कृषी विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात संयुक्त बैठक घेतली. या बैठकीला सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, कृषी सचिव एकनाथ डवले, सहकार आयुक्त अनिल कवडे, कृषी पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल पवार, संचालक सतिश सोनी उपस्थित होते.


शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान होऊ नये म्हणून राज्यातील सर्व बाजार समितीच्या आवारात धान्य चाळण यंत्र बसविण्यात यावे, तसेच शेतमाल बाजार आवारात पाठविण्यापूर्वी गाव पातळीवर शेतमालाची आर्द्रता तपासण्यासाठी विकास संस्थेच्या स्तरावर मॉश्चर मीटर उपलब्ध करून द्यावे. यासाठी विकास संस्था, सहकारी सोसायटी यांनी पुढाकार घ्यावा. आणि बाजार समितीमध्ये सुद्धा मॉश्चर मीटर बसविणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. असे निर्देश यावेळी देण्यात आले.


 


महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने प्रमुख शेतमालाची जिल्हा व राज्य स्तरावरील एकूण आवक व बाजारभाव याची अद्ययावत माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारभावाची माहिती मिळेल आणि त्यांची फसवणूक होणार नाही. किमान आधारभूत किंमत अंतर्गत केंद्र शासनाने खरेदीसाठी उत्पादनाच्या २५ टक्के ही मर्यादा न ठेवता खरेदी केंद्रावर येणाऱ्या संपूर्ण मालाची खरेदी करावी अशी शिफारस करणारा प्रस्ताव तातडीने केंद्र सरकारला पाठविण्यात यावा, असे निर्देश ही संबंधित यंत्रणांना देण्यात आले.


 शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी किसान क्रेडीट कार्डच्या माध्यमातून कर्ज वाटपाची प्रक्रिया दि. ३१ मे किंवा १५ जून पर्यंत पूर्ण करावी. प्रत्येक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांनी जिल्ह्यातील प्रत्येक कर्जदार शेतकऱ्यांना केसीसी रूपे डेबीट कार्ड वितरीत करून त्यांना एटीएम मशीनद्वारे रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि किती शेतकरी याचा वापर करत आहेत यांची माहिती द्यावी. राज्यातील पतपुरवठ्यापासून वंचित असलेल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी सहकार्य करून नियोजन करावे आणि शेतकऱ्यांना वेळेवर पतपुरवठा कसा होईल याचा आढावा घ्यावा, असे निर्देशही कृषीमंत्री व सहकार मंत्री यांनी यावेळी दिले.


 


रूपये १ लाख ते ३ लाख पर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना देखील शुन्य टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत १ टक्का ऐवजी ३ टक्के व्याज अनुदान देणेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील राहिलेल्या शेतकऱ्यांना तातडीने लाभ देण्याची कार्यवाही करावी. शेतकऱ्यांना तातडीने लाभ देण्यासाठी तालुका-जिल्हा समितीने तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.


Post by श्री.संजय ब्रम्हानंद पा.चिखले

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com






पाणी वाचविण्यासाठी युवा पिढींनी पुढाकार घ्यावा-जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर


 पाण्याचा एक-एक थेंब महत्वाचा असून पाणी वाचविणे ही काळाची गरज आहे. पाणी व्यर्थ वाया जाऊ न देता पाण्याचा योग्य वापर करावा. पाणी वाचविण्यासाठी युवा पिढींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. 


जलसंधारण मंत्रालय आणि युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात 700 जिल्ह्यामध्ये कॅच द रेन ( पावसाचे पाणी साठवा) ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील 100 गावाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील गावाचाही समावेश आहे. या मोहिमेंतर्गत गावातील किमान 100 कुटूंबाना छतावर पडणारे, शेतात पडणारे तसेच गावाच्या परिसरात पडणारे पावसाचे पाणी साठवण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा युवा अधिकारी , चंदा रावळकर यांनी दिली. 


नेहरू युवा केंद्राच्यावतीने युवा कार्यक्रम व सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. सुरुवातीला जिल्हास्तरीय कॅच द रेन अभियानाचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी कॅच द रेनच्या लोगोचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, वन विभाग, सिंचन विभाग एनजीओ व राष्ट्रीय युवा स्वयंसेवक आदी उपस्थित होते.


Post by संजय ब्रम्हानंद चिखले 

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com


Popular posts लोकप्रिय पोस्ट