🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

शुक्रवार, मे २१, २०२१

लाच प्रकरण : लाचखोर महिला सरपंच व सरपंच पतीने 5 हजाराची मागितली लाच ! एसीबीच्या पथकाकडून रंगेहाथ पकडण्याचा संशय येताच काढला पळ

 लाच देणे आणि लाच घेणे दोन्ही कायद्याने गुन्हा आहे


 उस्मानाबाद,दि 18 मे 2021 : उस्मानाबाद तालुक्यातील मेंढा ग्रामपंचायत ची महिला सरपंच व पतीने एका युवकाकडे ५ हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र सापळ्याचा संशय आल्याने सरपंचपतीने पैसे न स्वीकारताच पळ काढला. 

तक्रारदार युवकाची उस्मानाबाद तालुक्यातील मेंढा गावच्या शिवारात शेती आहे. यापैकी एका एकरात या तरुणाने शासनाच्या फळबाग योजनेतून शेवग्याचे पीक घेतले आहे. या पिकाच्या मशागतीकरिता संबंधित तरुण हा मस्टर मागणीवर स्वाक्षरी घेण्यासाठी १० मे रोजी सरपंच शशिकला विश्वनाथ कांबळे हिच्याकडे गेला होता. घरामध्ये तेव्हा सरपंचपती विश्वनाथ कांबळे हाही हजर होता.मस्टर मागणीवर स्वाक्षरी करण्याची विनंती केली असता, सरपंच महिलेने पूर्वीच्या ५ मस्टरचे प्रत्येकी १ हजार रुपये याप्रमाणे एकूण ५ हजार रुपये देण्याची मागणी केली. ही रक्कम विश्वनाथ कांबळे याच्याकडे दिल्यानंतरच मस्टर मागणीवर स्वाक्षरी करू,असे सांगितले. त्यामुळे तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी मंगळवारी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार तरुण लाचेची रक्कम घेऊन सरपंचपती विश्वनाथ कांबळे याच्याकडे गेला. मात्र विश्वनाथ कांबळे याला संशय आल्याने त्याने रक्कम न स्वीकारताच तेथून काढता पाय घेतला.

याप्रकरणी मंगळवारी मध्यरात्री बेंबळी ठाण्यात लाचखोर महिला सरपंच व तिच्या पती विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

✍️✍️✍️

पत्रकार

संजय ब्रम्हानंद पा.चिखले मरवाळीकर

7767912933 

 लाच देणे आणि लाच घेणे कायद्याने दोन्ही गुन्हा आहे 

 कामं अडली गरज पडली तर फक्त एक फोन ACB हेल्पलाईन 1064 टोल फ्री

 कुठलाही सरकारी दाखला लाचेशिवाय मिळणे तुमचा हक्क आहे.त्यासाठी लाच का द्यायची?

लाचखोरांविरुद्ध कारवाई हा निर्धार

 सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

 👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा👇

व्हिजीट, पाकीट आणि व्हायरस _श्री रवींद्र पांडुरंग बोरकर सहाय्यक लेखाधिकारी

 


The system has not COLLAPSED. 

It was always like this. 

It has been EXPOSED.

                 काही ठराविक शासकीय कर्मचारी/अधिकाऱ्यांची व्हिजीट आणि पाकीट याच एक अनोखं नातं आहे, किंबहुना पाकीटासाठी व्हिजीट आणि व्हिजीट दिली की पाकीट हे समीकरणच बनले आहे, ही पद्धत कोणी सुरू केली हे माहीत नाही परंतु ती अनेकांच्या अंगवळणी पडली हे तितकेच खरे. मला १४ वर्षांच्या शासकीय नोकरीत पाकीट स्विकारण्याचा कधी प्रसंग आला नाही. मूळातच ईश्वर कृपा, आई वडिलांची पुण्याई आणि गुरूंचे आशीर्वाद यामुळे मला कोणत्याही आर्थिक तडजोडी/वशिल्याशिवाय सातारा जिल्हा परिषदेत कनिष्ठ लेखाधिकारी पदावर थेट नियुक्ती (सरळसेवा) मिळाली, पोस्टींगही सोयीस्कर वित्त विभाग जि.प. सातारा, आणि वेतन श्रेणीही चांगली (साधारणपणे PSI, नायब तहसीलदार यांच्याशी मिळतीजुळती) त्यामुळे आर्थिक प्रलोभने व वरकमाई पासून दूर राहायचे असा निश्चय नोकरी स्वीकारली त्यावेळीच केला होता अर्थात त्याला घरातील संस्कार व सत्संग याचीही किनार होती. वाढती बेरोजगारी व जीवघेण्या स्पर्धेच्या काळात माझ्यासारख्या पारंपारिक शिक्षण घेतलेल्या एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला पहिल्याच प्रयत्नात अधिकारी पदावर स्वतःच्या जिल्हयात शासकीय नोकरी मिळणं यासारखी दुसरी भाग्याची गोष्ट कोणती? अर्थात ती काही सहजासहजी मिळाली नाही त्यासाठी खुप संघर्ष करावा लागला परंतु नोकरी लागल्यावर आई वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि इच्छापूर्ती झाल्याचे समाधान यापुढे तो कमीच होता. नोकरी मिळाल्याने मी खुप खुश होतो विशेषतः माझ्या आईची मनोमन फार इच्छा होती की मला शासकीय नोकरी मिळावी आणि झालंही तिच्या मनासारखं.

           माझ्या गरजा मर्यादित असल्याने मिळणाऱ्या सुविधा आणि वेतनात मी खुप समाधानी होतो आणि आहे तसेही शासकीय नोकरदाराची व कुटुंबाची, दयाळू शासन खुप काळजी घेते व त्यासाठी पेन्शन, वैद्यकीय बिले प्रतिपूर्ती, विमा संरक्षण, लसीकरण इत्यादी तरतुदी केलेल्या आहेत. शासकीय कर्मचारी असल्याने सध्या कोरोना महामारीच्या काळात खाजगी हॉस्पिटल्समधील कोविड पेशंटची बिले ऑडिट करण्यासाठी एप्रिलमध्ये "ऑडीटर" नेमणूकीची ऑर्डर आली, आपत्कालीन कायद्याचा आदर करून आणि मा.जिल्हाधिकारी साहेबांचा आदेश शिरसावंद्य मानून मी कामाला लागलो. पंचायत समिती कार्यालयात March ending ची कामे सुरू होती तरीही बिले तपासणीच्या अनुषंगाने मी एका हॉस्पिटलला व्हिजीट दिली आणि PPE Kit घातलेले डॉक्टर माझ्या समोर भेटीला आले, मी थोडासा बावचळलो आणि २ मीटर अंतर रहावे म्हणून खुर्ची मागे घेतली कारण थोड्याच वेळापूर्वी मी त्यांना बाहेर स्वॅब घेताना लांबूनच पाहिलं होतं, त्याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी सध्या पुरेसा स्टाफ मिळत नसल्याने अशी कामे करावी लागतात असे सांगितले. अर्धा कप चहा घेत व्हिजीट रिपोर्ट लिहीला आणि शासन नियमानुसार व निकषानुसार बिले आकारणी करणेबाबत सूचना देऊन तसेच बिलांबाबत तक्रारींकरिता संपर्क साधण्यासाठी फोन/मोबाईल नंबर्स दर्शविणारा फलक हॉस्पिटलच्या नोटीस बोर्डावर लावून त्यासोबत डॉक्टरांचा व माझा फोटो घेऊन मी तेथून निघालो. 

            त्यानंतर पुन्हा एका हॉस्पिटलला व्हिजीट दिली. तेथील डॉक्टर दांपत्याने मला अटेंड केले त्यांना मी बिल आकारणी बाबत प्राथमिक सूचना दिल्यानंतर व्हिजीट रिपोर्ट लिहीत असताना डॉक्टरांनी एक पांढऱ्या रंगाचे पाकीट ऑफर केले आणि मी आश्चर्यचकित झालो कारण १४ वर्षांच्या नोकरी पहिल्यांदाच आणि पहिल्याच भेटीत मी पाकीट बघितले होते परंतु ज्या सहजतेने त्यांनी ते पुढे केले त्याच सहजतेने मी स्विकारण्यास स्पष्ट नकार दिला, मी लाजलो असा समज करून त्यांनी पुन्हा ते पाकीट बक्षीस म्हणून घ्यावे असे सांगितले, मात्र मी निर्णयावर ठाम होतो, पुन्हा बाहेर नोटीस बोर्डा शेजारी फोटो सेशन झालेनंतरही त्यांनी परत एकदा विचारले परंतु तेथेही मी नकार दिला कारण आमचं ठरलंय. 

          पाकीट बऱ्यापैकी फुगलेले होते, त्यात किती रक्कम होती हे मला माहित नाही आणि मी ते विचारलेही नाही, आता ज्या गावाला जायचे नाही त्या गाडीची चौकशी कशाला? कदाचित असतील ५ ते १० हजार. मी कायम पाकीटा पासून अलिप्त होतो आणि आहे अगदी माझ्या लग्नातही आहेर पाकीट आणू नये असे लग्न पत्रिकेत छापले होते. घडल्या प्रकाराबद्दल माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्यातील एक म्हणजे शासकीय यंत्रणेला गृहीत धरण्यात "डॉक्टर तुम्ही सुद्धा" ? 

           पुढच्याच आठवड्यात मी त्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालेल्या कोरोनाबाधित पेशंटची बिले तपासत होतो, पाकीट प्रकारामुळे मनात संशयाची पाल चुकचुकत होतीच, cross check म्हणून सहजच एका बिलावरील मोबाईल नंबरवर पेशंटच्या नातेवाईकांना फोन केला आणि हॉस्पिटलमध्ये भरलेल्या बिलाची रक्कम विचारली आणि माझा संशय खरा ठरला कारण मला ऑडिटसाठी सादर केलेले बिल हे कमी रकमेचे आणि प्रत्यक्ष पेशंटकडून घेतलेले बिल जास्त रकमेचे होते म्हणजेच हॉस्पिटलमध्ये २ प्रकारची बिल बुके ठेवून व बिले बनवून अवाजवी बिल आकारणी व कलेक्शन सुरू होते व आहे. अशा प्रकारे २ भिन्न बिलांव्दारे शासकीय यंत्रणेच्या ऑडीट सिस्टीमला चकवा देण्यात येत होता व आहे. याबाबतचा रिपोर्ट मी संबंधित यंत्रणेला पाठविला आहे तसेच आकारणी केलेले जादा बिल संबंधित पेशंटला परत करण्याची कार्यवाही सुरू आहे. आता मला व्हिजीटच्या पाकीट प्रकरणाचा उलगडा झाला माझ्या ऑडीटर धर्मापासून (कर्तव्यापासून) मला परावृत्त करण्यासाठीच ते पाकीट बक्षीस म्हणून ऑफर केले होते व त्यातील रक्कम संबंधित डॉक्टरांच्या खिशातील नसून सर्वसामान्य रूग्णांकडून केलेल्या जादा आकारणीचा एक भाग होती. 

           एकीकडे "रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा" मानून काम करणारे काही डॉक्टर्स आहेत तर दुसरीकडे कोरोनाच्या नावाखाली वाहत्या गंगेत हात धुऊन घेणाऱ्या अपप्रवृत्तीही आहेत. आरोग्य व्यवस्थेतील काही बेफिकीर व निर्ढावलेल्या व्यक्तींमुळेच व्यवस्थेची अशी अवघड व नाजूक अवस्था झाली आहे हे भंडारा, नाशिक, विरार इत्यादी ठिकाणच्या आगीच्या दुर्घटनांवरून दिसून आले आहे त्या घडून आल्या आणि निष्पाप नवजात बालकांचा व रुग्णांचा नाहक जीव गेला, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली त्यामुळे अशा अपप्रवृत्तींना वेळीच व प्राधान्याने डोस देऊन "break the chain" ची प्रभावी अंमलबजावणी करणे ही काळाची गरज आहे. सध्या या यानिमित्ताने कोलमडलेली आरोग्य व्यवस्था उघड झाल्याचे एका प्रतिथयश डॉक्टरांनी केलेले खालील twitt विचारात घेण्याजोगे आहे. 

The system has not COLLAPSED. 

It was always like this. 

It has been EXPOSED.

            आगामी काळात आपण समर्पित कोरोना योध्दयांचे प्रयत्न व परिश्रम, शासनाने केलेले नियम व त्रिसूत्री पाळुन आणि लसीकरणाच्या माध्यमातून कोविड-19 या अदृश्य व्हायरसचा मुकाबला करून कोरोनावर नक्कीच मात करु पण माणसांसह संपूर्ण आरोग्य व्यवस्था I.C.U. मध्ये व्हेंटिलेटरवर ठेवणाऱ्या काही अपप्रवृत्ती आणि त्या पाकीटातील दृश्य व्हायरसच काय? हाच खरा प्रश्न आहे.


श्री रवींद्र पांडुरंग बोरकर

सहाय्यक लेखाधिकारी

पंचायत समिती खंडाळा

रा.वाई, जि.सातारा

मो.नं.९८५०४१४३३१


बालदोस्तांसाठीची धम्माल कविता : हसरी फुले(बालकाव्य)-डॉ.शुभांगी गादेगावकर

 


घर कसे ही असले तरी त्या घराला अंगण आणि अंगणात आनंदाने खेळणारी मुले असतील तर त्या घराचा स्वर्ग निर्माण होऊ शकतो. घराला घरपण येते. ही लहान मुले नभांगणातल्या ता-यांसारखी आणि वेलींवरच्या फुलांसारखी असतात. आनंदाने बहरत असतात, फुलत असतात आणि वाढतही असतात. म्हणूनच कवयित्री डाॅ. सौ.शुभांगी गादेगावकर या मुलांना हस-या फुलांची उपमा देतात. त्यांची ही कविता म्हणजे बालदोस्तांसाठी धम्माल उडवणारी आहे.

    डॉ. शुभांगी गादेगावकर या ठाणे जिल्ह्यातील असून भाईंदर येथे प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत आहेत.'बन्याच्या गमतीजमती' हा बालकथासंग्रह तर 'आशेची पालवी','चूक कोणाची?','मला रक्त हवंय' या कादंब-या, अपूर्व रंगावली इत्यादी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या बालकथेस मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. 

     घरात असता हसरे तारे.. पाहू कशाला नभाकडे हे गीत आपण खूपदा ऐकलेले आहे. कवयित्रीची कविता याच आशयाची आहे. बालकांच्या बाल अवस्थेची ओळख करून देत मुलांना मनोरंजनातून प्रबोधनही करतात. कवयित्री म्हणते, निसर्ग बालकाला नेहमीच खुणावत असतो. झाडे, वेली, भिरभिरणारी फुलपाखरे ,चिमण्या, काळे काळे ढग, वेलींवरची फुले, जत्रेतली खेळणी, घरातली लहान मनीमाऊ त्याला हवी हवीशी वाटतात. यात ते रममाण होते. आनंद लुटण्याचा प्रयत्न करते .या लहान मुलांच्या मनातली भावना कवयित्री कवितेतून सागण्याचा प्रयत्न करत आहे. 

फुला फुला फूल रे

वा-यासंगे डूल रे

मनामनातून हसणारे हे फूल त्याला हात लावले तर घाण होईल. अशा फुलांना त्रास देऊ नका. असे कवयित्री फुलांची उपमा देऊन मुलांसाठी लिहिते. 

भातुकलीचा खेळ मांडणारी ही निरागस मुले आनंदाने खेळताना भान हरपून जातात. तल्लीन होऊन जातात. मोबाईल खिशात ठेवणे म्हणजे जग खिशात ठेवल्यासारखे वाटते. म्हणजे मोबाईलवर जगाची माहीती लवकर मिळत असते. नव्या तंत्रज्ञानाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले पाहिजे असे कवयित्रीला वाटते. नव्या युगाच्या दिशेने वाटचाल करूया. नवी क्रांती घडवूया असे वाटते. 

मोबाईलवर शिका तुम्ही

घरबसल्या खूप काही

मोबाईल ठेवा खिशात

जग आपल्या हातात

संपूर्ण जगाला भेडसावत असणारा प्रश्न म्हणजे पर्यावरण -हासाचा. पर्यावरण बिघडल्यामुळे माणसांच्या जीवनचक्रात कसा बिघाड होत आहे. त्याकरिता पर्यावरण चळवळी उभारल्या पाहिजेत. आज कोरोनाच्या विषाणूचा उपद्रव वाढला. शुद्ध हवा मानवाला मिळत नाही. वृक्षसंवर्धन आणि स्वच्छता अभियान यास खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. कवयित्री वृक्षांचे महत्त्व मुलांना पटवून देण्याचा प्रयत्न करते आहे. 

झाड देते छाया

ठेवा निर्मळ काया

फळ देतात मधुर रस

जीवन करा तुम्ही सरस

निसर्गाची ओळख करून देतांना पाखरांच्या आवाजांची ओळख करून देते. कावळा काव काव, चिमणी चिवचिव, कबूतर गुटरगू, कोकीळ कुहूकुहू असा आवाज मुलांना गोड वाटतो. मुलं तशीच अनुकरण करत असतात. मुलांना स्वप्न पडतात पण सकाळी ती स्वप्ने खोटे वाटू लागतात. स्वप्नात लाॅटरी लागून करोडपती झाला आणि सकाळी उठल्यावर काय तर आहे त्या ठिकाणीच. 

स्वप्नात लागली लाॅटरी

भरुन गेली तिजोरी

स्वप्न दिसले सुंदर मोठे

सकाळी कळले सगळेच खोटे

शेतात राबणारा शेतकरी, दवाखान्यात राबणारा डाॅक्टर, शाळेत राबणारा शिक्षक हा कसा असतो हे मुलांना विचारत कवयित्री उत्तरे काढून घेते. तर मन किती चपळ आणि एका जागेवर कधीच बसत नाही. त्याला ताब्यात घेणेही खूपच अवघड काम. सैरावैरा फिरणा-या स्वच्छंदी पाखरांसारख मन असते. म्हणूनच मुलांना मनाबद्दल कवयित्री सांगते. बहिणाबाई चौधरी यांनीही मनाला उभ्या पिकावर धाऊन जाणा-या ढोरांची उपमा दिली आहे. अशी मनाची अवस्था असते. 

मन स्वैर पाखरु

कसे त्याला आवरु

नव्या आशा, नवी उमेद घेऊन आपण जीवन आनंददायी जगले पाहिजे. या जीवनाचे नवे गीत आपण गाऊया अशी कवयित्री लिहिते. नदीच्या प्रवाहासारखे आपले जीवन वाहत असते. निसर्ग चक्र सोबत घेऊन जगत असते. आपणासही असेच जगावे लागते. 

झुळझुळ झुळझुळ नदी वाहते

सळसळ सळसळ करती पाने

आनंदाने आपण गाऊ

नूतन जीवन गाणे

'जाण' या कवितेतून कवयित्री  आपण सुजाण नागरिक असल्याचे सांगते.आपण संस्कारक्षम, सुविचारांच्या आणि सुजलाम भूमीत जन्मलेले आहोत. नागरिक कसा असावा असे कवयित्री लिहिते. 

कर्तव्याचे करावे पालन

अधिकारांचे सदैव रक्षण

लोकशाही सुराज्याचे अस्त्र

शिकवते नागरिकशास्त्र

राष्ट्रीय एकात्मता ही काळाची गरज आहे. मांडवासारखा एकत्र हा देश विविध जातीधर्मात बांधला गेला आहे. एकात्मतेची ही बांधलेली मूठ कधीच सोडता कामा नये.आपण सगळे एकाच मातेची मुले आहोत. 

भिन्न जाती, भिन्न धर्म

भिन्न असती जरी कर्म

सगळ्यांची एकच माता

भारत भूमी असे विधाता

हसत खेळत मुलांना आनददायी प्रवाहात आणण्यासाठी कवयित्री प्रयत्न करते आहे. कारण बाल अवस्थेतच बालकांना योग्य वळण लावता येते. योग्य संस्कार आणि ज्ञान दिले तर देशाचा पाया मजबूत होईल अशी आशा कवयित्रीला वाटते. डॉ. मधुसूदन घाणेकर यांची प्रस्तावना आहे. मुखपृष्ठ पूजा बागूल यांनी रेखाटले आहेत. आतील चित्रे डॉ. शुभांगी व कु.ओम गादेगावकर यांनी रेखाटली आहेत. कवयित्रीच्या पुढील लेखनास खूप खूप शुभेच्छा! 

         प्रा. रामदास केदार

           ९८५०३६७१८५


हसरी फुले 

(बालकाव्य) 

डॉ.शुभांगी गादेगावकर

९६१९५३६४४१

समीक्षा पब्लिकेशन्स 

पृष्ठे ६०,किंमत १२०

(कुरिअर सह मूल्य १२० रू.)

गुगल पे नं ९८६९१५८७६०

Popular posts लोकप्रिय पोस्ट