🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

शनिवार, नोव्हेंबर १३, २०२१

शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी MahaStudent ॲपद्वारे नोंदविली जाणार_सहसचिव राजेंद्र पवार

 


मुंबई : सरल प्रणाली आधारित सुविधा उपलब्ध करून राज्यातील शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती डिजीटल पद्धतीने नोंदविण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. MahaStudent ॲपद्वारे ही माहिती नोंदवावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. यामुळे राज्य, जिल्हा, तालुका व केंद्रस्तरावर विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती तात्काळ कळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत तंत्रस्नेही शिक्षकांची आणि डिजीटल शाळांची चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहिली आहे. राज्यात सरल प्रणालीवर सर्व शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांची माहिती भरण्यात आली आहे. भारत सरकारने ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स’ हा निर्देशांक विकसित केला असून यामध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांची डिजीटल पद्धतीने उपस्थिती यासाठी गुण देण्यात येणार आहेत. यादृष्टीने राज्याने विकसित केलेल्या सरल प्रणालीमध्ये ही उपस्थिती नोंदविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

  हे ॲप हे गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध असून यामध्ये शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती तसेच अनुपस्थिती डिजीटल पद्धतीने नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सर्व शिक्षकांची उपस्थिती नोंदविण्याची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. या ॲपमुळे विद्यार्थ्यांचे हजेरीपत्रक वेगळ्याने ठेवण्याची तसेच मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची वेगळी माहिती भरण्याची आवश्यकता राहणार नाही, असे शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव राजेंद्र पवार यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

Tags: MahaStudent

न्युमोनिया नियंत्रणासाठी ‘साँस’ अभियानाचे आयोजन ; अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या हस्ते उद्घाटन

 


मुंबई, दि. १२ : न्युमोनियापासून संरक्षण, प्रतिबंध आणि उपचार यासाठी ‘जागतिक न्युमोनिया दिनाचे’ औचित्य साधून ‘साँस’ मोहिमेचे राज्यस्तरीय उद्घाटन सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या हस्ते करण्यात आले.

आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. मृदुला फडके यांच्या प्रमुख उपस्थितीत हे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.

डॉ. प्रदीप व्यास यांनी महाराष्ट्रात अर्भक मृत्यूदर १९ वरून १७ वर आल्याबद्दल आरोग्य कर्मचारी व अधिकारी यांचे अभिनंदन केले. ‘साँस’ मोहीम राबविण्याकरिता ‘न्युमोनिया नाही तर बालपण सही’ या घोषवाक्यासह शुभेच्छा दिल्या.

यावेळी डॉ .अर्चना पाटील यांनी ‘साँस’ कार्यक्रमाअंतर्गत विविध उपक्रम तसेच राज्य व जिल्हास्तरावर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. डॉ. मृदुला फडके यांनी बालकांमधील न्युमोनियाचा आजार कसा होतो, न्युमोनियापासून संरक्षण, प्रतिबंध आणि उपचार यावरील माहिती सांगितली. तसेच गंभीर न्युमोनिया असतानाच्या स्थितीत आशा, ए.एन.एम , सी.एच.ओ यांनी कुठल्या प्रकारची विशेष काळजी घेतली पाहिजे या विषयी मार्गदर्शन केले.

बालकांमधील न्युमोनियाविषयी जनजागृती व लोकसहभाग मिळवण्यासाठी ‘साँस’ मोहिम राज्यभरात १२ नोव्हेंबर २०२१ ते २८ फेब्रुवारी २०२२ कालावधीत राबविण्यात येणार आहे. या राज्यस्तरीय उद्घाटनाच्या सोहळ्याप्रसंगी राज्यातील सर्व आरोग्य संस्था रुग्णालये, अधिकारी कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

सूत्रसंचालन डॉ. रामचंद्र हंकारे यांनी केले. उपसंचालक डॉ.कैलास बाविस्कर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर यांनी संयोजन केले. या कार्यक्रमात दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यभरातील डॉक्टर्स, आरोग्य विभागाचे संबंधित कर्मचारी, अधिकारी, आशा, ए.एन.एम देखील सहभागी झाले होते.

Tags: न्युमोनिया

सर्पदंश आणि त्यावरील उपचारांबाबत जागृती करणे गरजेचे – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

 


मुंबई, दि. ११ :- ग्रामीण भागात सर्पदंश ही आजही एक मोठी समस्या आहे. सर्पदंशाने होणारे मृत्यू कमी होण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सजग झाले पाहिजे. त्याचबरोबर सर्पदंशाबाबत व त्यावरील उपचारांबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले.

विघ्नहर मेडिकल फाउंडेशनच्या वतीने आयोजित शून्य सर्पदंश मृत्यू प्रकल्पाच्या मिशन इम्पॉसिबल माहितीपटाचे अनावरण सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या कार्यक्रमास आमदार अतुल बेनके, अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास, प्रधान सचिव डॉ.निलीमा करकेट्टा, आयसीएमआरच्या संचालिका डॉ.गीतांजली सचदेव, आयएमएचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे आदी उपस्थित होते.


गृहमंत्री श्री.दिलीप वळसे-पाटील म्हणाले, ग्रामीण भागात सर्पदंश ही एक मोठी समस्या आहे. सर्पदंशाबाबत काही गैरसमजुती आहेत. या दूर करण्यासाठी शून्य सर्पदंश मृत्यू प्रकल्प उपयुक्त ठरेल. सर्पदंशावरील लशी महाग आहेत. सर्पदंशाबाबत जनजागृतीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याची आवश्यकता आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने असे कार्यक्रम आयोजित करावेत असेही त्यांनी यावेळी सूचित केले.

सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री.टोपे यांनी सांगितले की, सर्पदंशाने होणारे मृत्यू कमी करण्याचे आव्हान आहे. जुन्नर, आंबेगाव, मंचर तालुक्यातील सर्पदंशाने होणारे मृत्यू कमी करण्यात यश आले आहे. मात्र राज्यभरात अशा प्रकारे काम करायला हवे. यासाठी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. त्यासाठी प्रशिक्षण संस्था तयार करण्यासंदर्भात विचार करण्यात येईल.

सर्पदंशाने होणारा मृत्यू नोटीफाईड डिसीज म्हणून समावेश करण्यात येईल. सर्पदंशावर होणा-या उपचारासाठी महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा वाढवण्याचा विचार केला जाईल, असेही श्री. टोपे यांनी सांगितले.

डॉ. सदानंद राऊत यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की, सर्पदंशामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांना विशेषत: करुन शेतकरी शेतमजूर यांना या समस्येला सामोरे जावे लागते. यावर मात करण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल. यावेळी माजी आमदार बाळासाहेब दांगट, डॉ. डी. सी. पटेल, डॉ. प्रियंका कदम, अशोक हांडे, डॉ. संदेश राऊत आदी उपस्थित होते.

Popular posts लोकप्रिय पोस्ट