दिनांक : २१ / ०८ / २०२१
४८०. अभंग क्र. ३०८५
*लंकेमाजी घरे किती तीं आइका l सांगतसे संख्या जैसीतैसी ।।१।।*
*पांच लक्ष घरें पाषाणांची जेथें l सात लक्ष तेथें विटेबंदी ।।धृ।।*
*कोटि घरें जेथें कांशा आणि तांब्याचीं l शुद्ध कांचनाचीं सप्त कोटी ।।२।।*
*तुका म्हणे ज्याची संपदा एवढी l सांगाते कवडी गेलीं नाहीं l।३।।*
लंकेत घरं किती होती त्यांची जशीच्या तशी संख्या सांगतो ऐका. तिथे पाषाणाची म्हणजे दगडाची पाच लक्ष घरं होती. तर विटांची सात लक्ष घरं होती. कास्याची आणि तांब्याची कोटी घरं होती तर शुद्ध सोन्याची सात कोटी घरं होती. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याची एवढी संपदा होती त्याच्यासोबत एक कवडीही गेली नाही.
धनधान्य, पशु, जमीन, इमलेमाड्या, सोनं-रूपं, हिरे, माणिकमोती, यावरून माणसाची श्रीमंती मोजली जाते. धन हे फार महत्वाच असतं. निर्धनाला जगात कोणी विचारत नाही. निर्धनाला जगात मानही मिळत नाही. सन्मानही मिळत नाही. म्हणूनच एक कवी म्हणतो, *“दारिद्र्य मरण यातून मरण बरे बा दरिद्रता खोटी l मरणात दु:ख थोडे दारिद्रयात व्यथा असे मोठी ll”* मरण एकदाच येतं. पण दरिद्री माणूस रोज कणाकणाने मरत असतो. स्वाभिमानी माणसाला कोणाची लाचारी करणं, कोणाकडे हात पसरणं मरणप्राय यातना देणारं असतं. एका शायराने म्हटलं आहे, *“किसी को कैसें बताएँ जरुरतें अपनी l मदद मिले न मिले आबरू तो जाती हैं ll” असं करणं म्हणजे रोज मरणं असतं. पण पोटासाठी माणसाला लाचारी पत्करावी लागते. स्वाभिमानीपणाला उर्दूत खुद्दारी म्हणतात. अमीर मीनाई नावाचा एक शायर आपल्या खुद्दारीचं वर्णन करताना लिहितो, *“किसी रईस की महफिल का जिक्र ही क्या ही l खुदा के घर भी न जायेंगे बिन बुलाए हुए ll”*
काय जबरदस्त स्वाभिमान आहे? श्रीमंताच्या मेहफिल मध्ये काय पण देवाघरीही बोलावल्याशिवाय जाणार नाही असं शायर म्हणतो. खरा स्वाभिमानी जो असतो तो दुसऱ्याचाही स्वाभिमान कसा जपतो ते सांगताना जावेद अख्तर लिहितात, *“मुझे दुश्मन से भी खुद्दारी की उम्मीद रहती हैं l किसी का भी हो सर कदमों में सर अच्छा नहीं लगता ll”* या सर्वावर कडी केली ती फानी बदायुनी यांनी. ते लिहितात, *“दुनिया मेरी बला जाणे महँगी हैं या सस्ती हैं l मौत मिले तो मुफ्त न लूँ हस्ती की क्या हस्ती हैं ll”*
स्वस्त असो वा महाग असो, मरणही मी फुकट घेणार नाही. तर कैफ म्हणतात, *“जिस दिन मिरी जबीं किसी दहलीज पर झुके l उस दिन खुदा शिगाफ मिरे सर में डाल दे ll”* जबीं म्हणजे माथा, तर शिगाफ या फारसी शब्दाचा अर्थ आहे, दरार, म्हणजे अंतर! ज्या दिवशी मी दुसऱ्या कोणाच्या पुढे माझं मस्तक झुकविल त्याचक्षणी माझ्या डोक्यात दरार पडू दे म्हणजे माझं मस्तक फुटू दे. हे सर्व शायर जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या जातीचे आहेत. यांचे शेर वाचताना तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या ओळी सहज आठवतात. *“फुटो हे मस्तक तुटो हे शरीर l नामाचा गजर सोडू नये ll”* किंवा *“जरी माझी कोणी कापितील मान l तरी आन नको वदू जिव्हें ll”* तुकाराम महाराजांनी पिढीजात सावकारीला तिलांजली दिली, त्यांनी जे दुष्काळात धान्य वाटून टाकलं. नामदेव महाराजांनीही कुटुंबाच्या पिढीजात व्यवसायाकडे पाठ फिरवली आणि समाज परिवर्तनाचं अफाट कार्य अंगावर घेतलं. त्यांच्या घराची दुरावस्था झाली. त्या दारीद्र्याला कंटाळून त्यांच्या पत्नीने दोन वेळा आत्महत्या करायचा प्रयत्न केला. या दोघांच्या कुटुंबाची अवस्था अशी हलाखीची असतानाही शिवरायांनी पाठवलेलं धन तुकाराम महाराजांनी *“सोने आणि माती l आम्हां समान हे चित्ती ll”* असं म्हणून परत पाठवलं. तर नामदेव महाराजांनी कोण्या व्यापाऱ्याने पाठवलेलं गाडीभर धान्य गोरगरीबांत वाटून टाकलं. याला खुद्दारी म्हणतात. याला स्वाभिमान म्हणतात. म्हणून तुकाराम महाराज आपल्या अभंगातून स्पष्ट शब्दात जाणीव करून देतात की, *“जंव मोठा चाले धंदा l तंव बहीण म्हणे दादा ll सदा शृंगारभूषणें l कांता लवे बहुमानें ll”* जोवर तुमचा धंदा व्यवस्थित चालू आहे तोवरच बहिण तुम्हाला दादा म्हणते. जोवर पत्नीला आभूषणे करता तोवरच ती सन्मानाने वागवते. जगाची रीतच अशी आहे. *“बरे जालियाचे अवघे सांगती l वाईटाचे अंती कोणी नाही ll नोहें मातापिता नोहें कांतासुत l इतरांची मात काय सांगो ll”* दारिद्र्य आल्यावर आईबापच किंव्हा बायकापोरंही साथ देत नाहीत तर इतरांच्या कथा काय सांगू असं तुकाराम महाराज म्हणतात. मानवी जीवनात चार पुरुषार्थ सांगितले आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. पण ज्याने अर्थ हा पुरुषार्थ साधला त्यालाच उरलेले तीन पुरुषार्थ साध्य करता येतात. तुमच्याकडेच काही नसेल तर तुम्ही लोकांना देणार काय? भिकारी असेल तर त्याला काम म्हणजे जीवनाचा उपभोग तरी कसा घेता येणार? ज्याच्या कोणत्याच इच्छा, आकांक्षा तृप्त झालेल्या नाहीत त्याला मोक्ष तरी कसा मिळणार? महाभारत सांगतं, *“अर्थस्य पुरुषो दास: दासस्त्वर्थो न कस्यचित् l”* म्हणजे पुरुष अर्थाचा, संपत्तीचा दास आहे, अर्थ, संपत्ती कोणासी दासी नसते. म्हणूनच भर दरबारात द्रोपदीचं वस्त्रहरण होत असतांना भीष्म, द्रोण, कृप सर्व माना खाली घालून बसले. पण कोणीही उठून त्याला विरोध केला नाही. कौरवांची बाजू अन्यायाची आहे हे माहित असतांनाही भीष्म, द्रोणादी कौरवांच्या बाजूने लढले कारण *"अर्थस्य पुरुषो दास:l”* तुकाराम महाराजांना तर हे माहितीच होतं. आणि म्हणूनच तुकाराम महाराज आपल्या अभंगातून निर्धन माणसाचे काय हाल होतात त्यांचं वर्णन करतात. आईबाप आणि बायकापोरंसुद्धा विचारत नाहीत, तर मग बाकी जगाचं काय? परक्याचं काय? असा प्रश्न तुकाराम महाराज विचारतात. धन मिळवलंच पाहिजे असं तुकाराम महाराज सांगतात. पण ते धन कसं मिळवायचं तेही सांगतात. *“जोडोनिया उत्तम वेव्हारें” हा मार्ग तुकाराम महाराज सांगतात. चोऱ्यामाऱ्या करून, लुटमार करून, दुसऱ्याला फसवून, लुबाडून, धन मिळवू नका, तर उत्तम व्यवहार करून, रास्त मार्गाने धन मिळवा आणि त्याचा योग्य धनविनियोग करा. त्यातून दुसऱ्यालाही मदत करा. असं तुकाराम महाराज सांगतात. असं असताना मग या अभंगात तुकाराम महाराज पूर्ण यू टर्न कसा घेतात असा प्रश्न वरवर विचार करणाऱ्याला पडू शकतो. जवळ जवळ सर्व कीर्तनकार, प्रवचनकार हेच सांगतात की वर जाताना रिकाम्या हातानेच जावं लागतं. बंगला, गाडीघोडं, सोनंनाणं, हिरेमोती, पैसाअडका, जमीनजुमला सर्व इथेच ठेऊन जायचं आहे. काहीही सोबत न्यायचं नाही. *“मुठ्ठी बांध के आनेवाले हाथ पसारे जायेगा l इस नाचिज दुनियासे तुने क्या पाया क्या पायेगा l चढता सुरज धीरे धीरे ढलता हैं ढल जायेगा ll”* जन्माला येताना मुठ बांधलेली होती, पण मरताना हात पसरलेले असतात. लोक अंगावरचे कपडे आणि दागिनेही काढून घेतात. मग आयुष्यभर इतकी धडपड, पैशाच्या मागे पळणं, संपत्तीचा हव्यास धरणं, त्यासाठी ज्या नाही त्या उचापती करणं हे सर्व कशासाठी? लोकांचे तळतळाट घेणं कशासाठी? जगद्गुरू तुकाराम महाराजही या अभंगातून तेच सांगतात. मग तुकाराम महाराजांचं कोणतं म्हणणं खरं आणि कोणतं खोटं मानायचं? कोणतं योग्य आणि कोणतं अयोग्य मानायचं? याचं उत्तर हे आहे की तुकाराम महाराजांचं तेही म्हणणं बरोबर आहे आणि हेही म्हणणं बरोबर आहे. जर कुणाला या दोन मतात विसंगती दिसत असेल तर तो त्याच्या बुद्धीचा दोष आहे. तुकाराम महाराज कोणता अभंग कोणाला उद्देशून लिहितात ते समजलं नाही तर असा घोटाळा होऊ शकतो.
समजा डॉक्टरांकडे दोन पेशंट गेले. एक कुपोषित आहे. दुसरा अतिपोषित आहे. तर डॉक्टर दोघांना एकच सल्ला का? उघड आहे की जो कुपोषित असेल त्याला डॉक्टर पोटभर जेवण करण्याचा, उपासतापास करण्याचा, पौष्टिक अन्न खाण्याचा सल्ला देतील. त्याला विश्रांती घ्यायला सांगतील. कारण त्याच्या शरीराला त्याची गरज आहे. त्याच्या शरीराचं पोषण होणं गरजेचं आहे. जो अतिपोसलेला असेल त्याला डॉक्टर जेवण कमी करण्याचा सल्ला देतील. चिकन, मटन, चरबीयुक्त पदार्थ खायला प्रतिबंध करतील. त्याला व्यायाम करण्याचा सल्ला देतील. प्रत्येक रुग्णाची जशी गरज असेल तसा सल्ला डॉक्टर देतील. ज्याच्या हातातोंडाची गांठ पडत नाही. ज्याला पोटभर अन्न खायला मिळत नाही. ज्याला नियमित अन्नाचे फाके पडतात. त्याचा आजार वेगळा आहे. त्याला वेगळा सल्ला दिला जाईल. ज्याची चरबी उतू जात आहे, ज्याला आपले पाय दिसतच नाहीत, ज्याला स्वत:चा भारही पेलवत नाही, त्याला वेगळा सल्ला दिला जाईल. पण सल्ले परस्पर विरुद्ध असले तरी त्या दोन्ही सल्ल्याचं उद्धिष्ट एकच असेल. ते असेल रुग्ण बरा करणं.
समाजात सर्व माणसं समान पातळीवर जगात नाहीत. कोणी अत्यंत गरीब असतो, तर कोणी अत्यंत श्रीमंत असतो. या अभंगात तुकाराम महाराजांनी जो उपदेश केला आहे तो श्रीमंतांसाठी, गर्भश्रीमंतांसाठी, ज्यांच्याकडे प्रचंड पैसा, धन, संपत्ती असूनही ज्यांचा हव्यास अजून संपलेला नाही त्यांच्यासाठी केला आहे. आपल्या परंपरेत श्रीमंती म्हटली की एकतर कुबेर आठवतो वा दुसरा रावण आठवतो. रावणाची लंका सोन्याची होती असं म्हणतात. सोन्याची लंका मारुतीने पेटवली कशी हा एक प्रश्नच आहे. पण तो इथे बाजूला ठेऊ. तुकाराम महाराजांनी तर या अभंगात एक यादीच दिली आहे. तुकाराम महाराज सांगतात, *“लंकेमाजी घरे किती तीं आइका l सांगतसे संख्या जैसीतैसी ।।*
*पांच लक्ष घरें पाषाणांची जेथें l सात लक्ष तेथें विटेबंदी ।।*
*कोटि घरें जेथें कांशा आणि तांब्याचीं l शुद्ध कांचनाचीं सप्त कोटी ।।*
समजायला अत्यंत सोपा अभंग आहे. तुकाराम महाराज सांगतात की लंकेत घरं किती होती ती मी जशीच्या तशी सांगतो, नीट ऐका. चिरेबंदी दगडाची पाच लक्ष घरं होती. तर विटांची सात लाख घरं होती. कांस्य आणि तांब्याची तिथे प्रत्येकी एक कोटी घरं होती. तर शुद्द सोन्याची सात कोटी घरं होती. लंकेत गरिबी कमी होती असं दिसतं. आणि गर्भ श्रीमंतांची संख्या जास्त दिसते. कारण दगड-विटांची मिळून फक्त बारा लाख घरं आहेत. तर कास्य, तांबं आणि शुद्ध सोन्याची एकूण आठ कोटी घरं आहेत. आपल्याकडे उलटी परिस्थिती दिसते. अब्जोपती, करोडोपती, लखोपती यांची संख्या चढत्या क्रमाने असते. जगभर हीच परिस्थिती आहे. दोन टक्के लोकांच्या हातात ऐंशी टक्के संपत्ती आहे तर ऐंशी टक्के लोकांच्या हातात फक्त दोन टक्के संपत्ती आहे. ती पण लुबाडून घ्यायचं सुरूच असतं. म्हणजे एकीकडे उपासमार आहे तर दुसरीकडे खाऊन खाऊन अजीर्ण होतं आहे. हा अभंग त्या अजीर्ण होणाऱ्या लोकांसाठी आहे. मध्यंतरी कोणत्यातरी मंदिराच्या पुजाऱ्याच्या मुलीच्या लग्नाचा फोटो व्हायरल होत होतां. त्या नवऱ्या मुलीच्या अंगावर अंगभर सोनं होतं, त्या पुजाऱ्याच्याही अंगावर अंगभर सोनं होतं. किलो, किलो सोनं अंगावर पांघरणाऱ्या या पुजाऱ्याने इतकं सोनं आणलं कुठून? आणि त्याचं करणार काय? मेल्यावर सोबत नेणार आहे का? या जनतेचा पैसा जर जनतेच्या हितासाठी खर्च केला तर किती गरीबांचा उद्धार होईल? किती जणांना शिक्षण मिळेल? किती जणांना रोजगार मिळेल? किती कुटुंबं सुखी होतील? चोवीस तास देवाच्या संपर्कात राहूनही पुजाऱ्याच्या बुद्धीत काहीही फरक पडत नाही. त्याचा हव्यास सुटत नाही. *अंगावर सोनं पांघरून हे जीवनाची माती करतात. तुकाराम महाराजांनी घरी चालून आलेलं सोनं नाकारून जीवनाचं सोनं केलं.*
आज आपल्या देशात काय सुरु आहे? आताच्या अंबानी बंधूंचा बाप कोणे काळी पेट्रोल पंपावर लोकांच्या गाड्यात पेट्रोल भरत होता. मरताना धीरूभाई अंबानी एक यशस्वी उद्योगपती, भांडवलदार बनला होता. पोराच्या वाट्याला प्रचंड संपत्ती सोडून गेला. अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी तोंडात सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला आले. धीरुभाईने आपला व्यवसाय वाढवताना कसली तमा बाळगली नाही. अत्यंत आक्रमकपणे व्यवसाय वाढवला. तोच गुण अंबानीपुत्रात उतरला. त्यांची हाव वाढली. गेल्या दहा वर्षात अंबानीने अनेक टीव्ही चँनेल संपत्तीच्या जोरावर ताब्यात घेतले. त्यावरून ज्याला सत्तेत आणायचं त्याचा धुँवाधार प्रचार केला. एका सामान्य बुद्धीच्या माणसाला पहाता पहाता मसिहा बनवून टाकला. अधिनिक प्रचारतंत्रांचा वापर करून लाखो कोटी उधळून आपल्याला हवं ते सरकार त्यांनी आधी राज्यात आणि नंतर केंद्रातही सत्तेत आणलं. आणि आता सत्तेत बसवलेल्या आपल्या हस्तकांच्या माध्यमातून मन मानेल तसे निर्णय घेतले जात आहेत. अंबानी आणि अदानी यांची गेल्या आठ वर्षात झालेली प्रगती एकीकडे आणि देशाच्या अर्थ व्यवस्थेच्या विकासदराची नऊवरून जवळ जवळ वजा सव्वीस पर्यंत झालेली घसरण दुसरीकडे ठेवली तर अगदी स्पष्ट दिसून येतं की देशाच्या हिताचा बळी देऊन अंबानी-अदाणी पोसले जात आहेत. देश भिकेला लागला असतांना, देशावरचं दरडोई कर्ज आजवरच्या विक्रमी उत्तुंग टप्प्यावर पोचलेलं असताना, अंबानीची संपत्ती वाढत आहे. अंबानीची मुंबईला बावीस की सव्वीस मजली इमारत आहे. प्रत्येक मजल्यावर पोहोण्याच्या तलावापासून सर्व सोयीसुविधा आहेत. वर हेलीकॉप्टर उतरवण्याची सोय आहे. नीता अंबानी कडे प्रचंड पैसा आहे. कशासाठी वापरते? हजारो पायताणांचे जोड, कपड्याचे जोड, दागिने वगैरेची वर्णनंही आपल्यापर्यंत पोचवली जात असतात. अन्न उद्योग, शेतीसंबंधी करण्यात आलेल्या ज्या कायद्यांच्या विरोधात आठ महिन्यांहून अधिक काल शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसला आहे, ते कायदेही अंबानी आणि अदानी यांच्यासाठीच केले आहेत हे आता सर्वांना माहिती झालं आहे. प्रश्न हा आहे की करोडो भारतीयांची बरबादी करून, त्यांच्या तोंडाचा घास हिसकावून घेऊन अंबानी उद्या जगातला पहिल्या क्रमांकाचा भांडवलदार ठरला तरी काय होणार आहे? जगभरात कमावलेली इस्टेट तो मरताना वर बरोबर बांधून नेणार आहे? सत्ताविसाव्या मजल्यावरून आकाशात झेप घेणारं त्याचं हेलिकॉप्टर काय त्याला स्वर्गात पोचवणार आहे? आणि अशा देशद्रोह्यांच्या मदतीने सत्तेत आलेले तरी काय वरती जाताना लाखो रुपये किंमतीचे मश्रूम बरोबर बांधून नेणार आहे? अशा अनिर्बंध लुट करणाऱ्या लोकांना तुकाराम महाराज सांगतात की सोन्याच्या लंकेचा मालक असलेला रावण, ज्याच्याकडे अफाट, अमर्याद अशी संपती होती, तोही वर गेला तर त्याच्यासोबत एक फुटकी कवडीही गेली नाही. *“तुका म्हणे ज्याची संपदा एवढी l सांगाते कवडी गेलीं नाहीं ll”* तुम्ही काय घेऊन जाणार आहे? आणि जर इथेच सर्व सोडून जायचं असेल तर मग या संपत्तीचा इतका हव्यास कशाला? एखाद्या प्रामाणिक, संवेदनाशील मनाला खरोखर विचारप्रवृत्त करायला लावणारा हा प्रश्न आहे. हा प्रश्न फक्त अंबानी-अदांनीसाठी नाही तर केवळ धन आणि सत्ता यांच्यामागे लागलेल्या, त्यापायी माणुसकी विसरलेल्या प्रत्येकासाठी आहे. ऐनकेन मार्गाने सत्ता मिळवली. ठीक आहे. सव्वा लाखाच्या गॉगलची हौस पुरी करून घेतली. ठीक आहे. दहा-बारा लाखाचे पँट आणि शर्ट घातले तेही ठीक आहे. खायची, प्यायची आणि फिरायचीही हौस करून घेतली, हेही ठीक आहे. तुमच्या नादानपणामुळे करोडो कामगार बेरोजगार झाले. कित्येकांनी आत्महत्या केल्या. पण इतकं सारं करूनही जर देश खड्डयातच जात असेल तर मग तुमची बुद्धी वेळेवर काय करत होती? कशासाठी तुम्ही ही सत्ता, संपत्ती कमवली? यांच्यातला दमडाही तुम्हाला सोबत नेता येणार नाही. मग हा अट्टाहास कशासाठी? म्हणून अजूनही ताळ्यावर या. नीट विचार करा. आपल्या मनाशीच विचार करा. आता आपला परतीचा प्रवास सुरु झाला आहे. माणसाला सुखी करण्यासाठी काय करता येईल याचा विचार करा. संपत्ती महत्वाची आहेच. तिला मोल आहेच. पण तिच्या मर्यादाही समजून घ्या. कितीही संपत्ती असली तरी ती गेलेला जीव परत आणू शकत नाही. अंबानी जगातला सर्वात श्रीमंत उद्योगपती झाला आणि त्याने त्याची सर्व संपत्ती देऊन धीरुभाईला परत आणायचं ठरवलं तर आणता येईल का? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, “सांगाते कवडी गेलीं नाहीं ll” मग काय करायला हवं? वॉटसअँपवर खूप काही कचरा असला तरी काही चांगल्या गोष्टीही येतात. त्यातलीच एक ! एक खूप पैसेवाला शेठ होता. त्याने व्यवसायात प्रचंड पैसा कमवला होता. पण आता त्याचं वय झालं. संध्याछाया भिववू लागल्या. त्याला वाटत होतं की मी नाना लटपटी, खटपटी केल्या. व्यवसाय वाढवला. पण मी एकही पुण्याचं काम केलं नाही. स्वर्गात कसं जायचं. आणि आपल्या या संपत्तीसह कसं जायचं? त्याने दवंडीच पिटली की जो कोणी मला माझी सर्व संपत्ती स्वर्गात नेण्याचा मार्ग सांगील त्याला मी मोठं बक्षीस देईल. लोकांनी बक्षिसाच्या अपेक्षेने भरपूर डोकं खाजवलं. पण त्यांना काही सुचेना. दिवसांमागून दिवस उलटले. शेवटी एके दोव्शी एक तरूण आला . म्हणाला, “मी तुम्हाला मार्ग सांगतो.” शेटजी म्हणाला सांग. त्याने शेटजीला विचारलं तुम्ही दोन वर्षांपूर्वी अमेरिकेला गेला होतात ना ? शेटजी म्हणाला, “हो, गेलो होतो.” तिथे भरपूर खरेदी केली होती ना ? त्या तरुणाने विचारलं. शेटजी म्हणाला , हो केली होती.” मग तरुणाने विचारलं तिथे आपला रुपया चालतो का ? शेटजी म्हणाले नाही, “तिथे डॉलरच लागतो.” त्या तरुणाने विचारलं मग तुम्ही डॉलर कुठून आणले? शेटजी, “रुपये देऊन डॉलर घेतले.” मग तो तरूण म्हणाला, “तसंच स्वर्गात हे पैसे चालणार नाही? तिथलं चलन घ्यावं लागेल. शेटजी म्हणाले स्वर्गात कुठलं चलन असतं? तो तरूण म्हणाला तिथे पुण्ण्याचं चलन चालतं. इथे जो पैसा कमावला, तो इथेच खर्च करा. गोरगरिबाला मदत करा. भूकेलेल्यालां अन्न दया. तहानलेल्याला पाणी द्या. जे रंजले गांजले असतील त्यांचं दु:ख दूर करायचा प्रयत्न करा. त्यातून तुम्हाला पुण्य मिळेल. मग त्याचा उपयोग तुम्हाला स्वर्गात होईल. तेंव्हा शेटजीच्या डोक्यात प्रकाश पडला. तुकाराम महाराजांना नेमकं हेच सांगायचं आहे. गरजेपुरतं कमवा. योग्य मार्गाने कमवा. कमावलेलं दीनदुबळ्यांसाठी खर्च करा. वर सांगितलेली गोष्ट एक बोधकथा आहे हे लक्षात ठेवायचं. नाहीतर लगेच एखादा उठून विचारेल की तुम्हीच म्हणता की स्वर्ग-नरक असं काही नसतं त्याला हे विसंगत आहे. गोष्टीचं सार तेवढं घ्यावं. बाकी विसरून जावं.
*तुकाराम महाराजांना जर फक्त आपल्या मोक्षाचीच चिंता असती तर मग त्यांना हे सर्व सांगायची गरज राहिली नसती. पण तुकाराम महाराज एका सुखी, समृद्ध आणि समतेवर आधरित समाजाचं स्वप्न पहात होते. त्यांचा प्रत्येक श्वास याचसाठी होता. तुकाराम महाराज नवसमाजाचे दृष्टे होते. त्यासाठीच ते आयुष्यभर धडपडत होते. त्यंच्या आयुष्यातली ही धडपड समजली तर तुकाराम महाराज समजले असं होईल. म्हणून आपणही तुकाराम महाराज समजून घेऊ आणि इतरांनाही तुकाराम महाराज समजावून देऊ!*
जय जगद्गुरू !
जगद्गुरू तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात, “सरे ऐसें ज्याचे दान l त्याचे कोण उपकार ll” जो संपून जाणारं दान देतो, त्याचे काय उपकार मानायचे? कोणाला अन्नदान केलं. तो ते खाऊन संपवून टाकतो. पैसे दिले ते खर्चून टाकतो आणि पुन्हा कफल्लक होतो. म्हणून अन्न-वस्त्र वा धन दान करण्याऐवजी एखाद्याला ज्ञान दिलं तर ते कायम स्वरूपी रहातं. म्हणून कोणाला भेट द्यायची तर पुस्तकांची द्या. ज्ञानाची द्या. तुकोबांचा हा संदेश आचरणात आणणाऱ्यांच्या दोन कथा आपल्याला या माध्यमातून सांगितल्या. आज तिसरी कथा. मोबाईलवर बँक खात्यात ५०००/- रुपये जमा झाल्याचा मेसेज आला. कोणी पाठवले असतील याचा विचार करत होतो तेवढ्यात फोन आला. माउली तुमच्या खात्यात पाच हजार भरले आहेत. मला पुस्तकांचे दहा सेट पाठवा. पुण्याहून माननीय बाळकृष्ण शिंदे बोलत होते. त्यांनी आधी एक सेट मागवला होता. वाचल्यावर आपल्या मित्रांनीही वाचावा असं त्यांना वाटलं. त्यांनी लगेच दहा सेटचे पैसे पाठवून दिले. या निरुपणातून तुकाराम महाराजांचे विचार जास्तीजास्त लोकांपर्यंत पोचवण्याची तळमळ यातून दिसून येते. गाथा परिवार बाळकृष्ण शिंदे यांचा कायम ॠणी राहील.
"शुद्ध ऐसे ब्रह्मज्ञान" (किंमत : ₹ ४००/-); जगद्गुरू तुकाराम महाराज जीवनसंघर्ष ( ₹ ५०/-) आणि लोकराजा महाराजा सयाजीराव गायकवाड ( ₹ ६०/-) ही तिन्ही पुस्तके एकत्र रु. ५००/- त घरपोच मिळतील. यासाठी गुगल पे क्र. 9975641677 (उल्हास पाटील, कोटक बँक वा एचडीएफसी बँक ) संपूर्ण पत्ता आणि पैसे भरल्याचा स्क्रीन शाँट
9420801956 या नंबरवर पाठवा.
- उल्हास पाटील
गाथा परिवार
gathaparivar.org
9975641677
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.