🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

मंगळवार, ऑगस्ट २६, २०२५

‘आपले सरकार’पोर्टलच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सेवा आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून द्याव्यात - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वर्षा निवासस्थानी सेवा सुलभीकरणासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज राज्यातील नागरिक सेवांसंदर्भात आढावा बैठक घेतली.

संजय पाटील चिखले

मुंबई, दि. 25 :- राज्य शासनाच्या विविध विभागांकडून नागरिकांना सेवा पुरवल्या जातात. या सेवांसाठी आपले सरकार हे पोर्टल असून या पोर्टलवरील सर्व सेवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुरवण्यात याव्यात. तसेच सर्व सेवा योग्यप्रकारे आणि गरजेनुसार पुरवण्याच्यादृष्टीने सर्व तालुक्यांमध्ये एक रिंग तयार करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एकाच प्रकारच्या 9 सेवा एकत्र करण्याचे निर्देश देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सेवा पुरवठ्याच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत नियमितपणे पडताळणी करण्यात यावी, तसेच अर्ज प्रक्रियेत लागणारी कागदपत्रांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यासाठी नियोजन करावे. सर्व जिल्हा परिषद, महापालिका आणि विद्यापीठांचे डॅशबोर्ड एकसमान असावेत, जेणेकरून राज्यभरातील नागरिकांना एकसंध अनुभव मिळेल, या सेवेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रिंग व क्लस्टर प्रणाली राबवण्यात यावी. रिंगमध्ये सुरवातीस त्या तालुक्यातील १० ते १२ गावांचा समावेश असावा व गरजेनुसार सेवा पुरवण्यात याव्यात. या रिंगच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र गट व व्यवस्थापन टीम तयार करावी. तसेच सेवा पुरवण्यासाठी डिश डिजिटल सेवा हबचा वापर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

मुख्य सचिव राजेश कुमार यांनी सेवा वितरणात अपीलची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आणि प्रमाणपत्र वितरणासाठी मल्टी-मॉडेल प्रणाली (जसे की ईमेल, पोर्टल, व्हॉट्सअ‍ॅप) वापरण्याच्या सूचना दिल्या.

आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून सध्या राज्यात 1001 सेवा पुरवण्याचे काम सुरू असून त्या पैकी ९९७ सर्व पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसामध्ये पोर्टलवर उपलब्ध असलेल्या सेवांमध्ये २३६ सेवांची वाढ झाली आहे.

राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अपर मुख्य सचिव (नियोजन) राजगोपाल देवरा, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटीया, महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर आदी यावेळी उपस्थित होते.

TAGS: ‘आपले सरकार’पोर्टल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बुधवार, जुलै ३०, २०२५

अवयवदान ही एक सामाजिक चळवळ-आरोग्यमंत्री

 

संजय पाटील चिखले

२९ जुलै २०२५ | 📍मंत्रालय, मुंबई

अवयवदान ही एक सामाजिक चळवळ

अवयवदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया न राहता, ती संपूर्ण समाजासाठी एक जागृती निर्माण करणारी जनचळवळ व्हावी, यासाठी माझा विशेष प्रयत्न आहे. ३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राज्यभरात ‘अवयवदान पंधरवडा’ राबवित असताना मी हे ठामपणे सांगू इच्छितो की, एक अवयव एखाद्या रुग्णालाच नव्हे, तर त्याच्या कुटुंबालाही नवजीवन देऊ शकतो. त्यामुळे अवयवदानासंदर्भातील भीती, शंका आणि गैरसमज दूर करून सकारात्मक मानसिकता निर्माण करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

मी आरोग्य विभागाला स्पष्ट निर्देश दिले आहेत की, ही मोहीम केवळ एक उपक्रम म्हणून न राबवता, ती एक भावनिक व सामाजिक बांधिलकी म्हणून घेतली जावी. १५ ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात मेंदूमृत रुग्णांचे अवयवदान करणाऱ्या कुटुंबांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात यावा, जेणेकरून त्यांचा समाजात आदर्श निर्माण होईल.

माझा विश्वास आहे की, जनतेच्या सक्रिय सहभागामुळे महाराष्ट्र लवकरच अवयवदानाच्या क्षेत्रात देशात आदर्श राज्य म्हणून पुढे येईल.

या बैठकीला राज्यमंत्री श्रीमती. मेघना साकोरे - बोर्डीकर, सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग यांचे अधिकारी तसेच रुग्णालय सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत, केईएम रुग्णालयाचे डॉ. आकाश शुक्ला , उपसंचालक, डॉ. कैलास बाविस्कर, सहायक संचालक डॉ. फडणीस व दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागीय उपसंचालक व क्षेत्रीय अवयवदान प्रत्यारोपण समितीचे अधिकारी उपस्थित होते.

@MeghnaBordikar

#Shivsena #Prakashabitkar #OrganDonation #DonateLife #SocialAwareness #BeanOrganDonor #MaharashtraHealthMission

३ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत अवयवदान पंधरवडा साजरा होणार


संजय पाटील चिखले

मुबई, दि. २९ : राज्यात ३ ते १५ ऑगस्ट २०२५ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या अवयवदान पंधरवड्याचे नियोजन प्रभावी व उद्दिष्टपूर्ण असावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

मंत्रालयात अवयवदान पंधरवड्याच्या नियोजनासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, आरोग्य आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, डॉ. शुक्ला यांच्यासह दूरदृष्टी संवाद प्रणालीद्वारे राज्यातील विभागीय अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.आबिटकर म्हणाले की, अनेक रुग्ण आजही अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे ठराविक उद्दिष्ट ठेवून, गतीने आणि जनजागृतीवर भर देत काम करणे आवश्यक आहे. १५ ऑगस्ट रोजी अवयवदान करणारे तसेच लाभार्थी रुग्ण यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात यावा, त्यांना प्रशस्तिपत्र देण्यात यावे आणि माध्यमांसमोर त्यांची मते मांडण्यात यावीत, असेही त्यांनी सांगितले.

प्रशिक्षण, कार्यशाळा, नियोजनपूर्व सूचना यांच्या माध्यमातून सर्व अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यात यावे. आजपर्यंत प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना अवयव मिळवून देण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू ठेवावेत. अवयव दात्यांचा विश्वास मिळवून सकारात्मक वातावरण निर्माण करावे आणि काम गतिमान, परिणामकारक असावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनीही मार्गदर्शन करताना सांगितले की, अवयवदानाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे. आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून अधिकाधिक रुग्णांना अवयव मिळावेत, यासाठी पंधरवड्यात प्रभावी कामकाज व्हावे, असे त्यांनी सांगितले.

००००

राजू धोत्रे/विसंअ/



बुधवार, जुलै २३, २०२५

पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे "लोकमान्य बाळ गंगाधर टिळक" यांची जयंती साजरी


संजय पाटील चिखले

दि. 23 जुलै 2025 बुधवार रोजी 'लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या महापुरूषांची जयंती पोलीस अधीक्षक कार्यालयात साजरी करण्यात आली.

मा.श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली श्री. उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांचे हस्ते महापुरूषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी श्री जे.ई. गायकवाड, पोउपनि तथा जनसंपर्क अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड यांचेसह पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व विभागाचे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन 'लोकमान्य बाळ गंगाधर टिळक' या महापुरूषांना अभिवादन केले.

सदर कार्यक्रमाचे नियोजन ग्रेपोउपनि / सुर्यभान कागने, मारोती कांबळे व नरेंद्र राठोड यांनी चांगल्या प्रकारे केले आहे.

सोमवार, जुलै २१, २०२५

नांदेड मध्ये गूंजले संत कबीर परमात्म्याचे अमृत वचन


संजय पाटील चिखले

नांदेड दिनांक २० जुलै २०२५ रोजी नांदेड च्या हडको बसस्टॉप परिसरातील दत्तकृपा मंगल कार्यालय येथे संत कबीर साहेब यांच्या अपार दयेमुळे आणि रामपाल महाराज यांच्या कृपेमुळे  एक अद्वितीय सत्संग कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने पार पडला.

या कार्यक्रमात नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यातून आणि आसपासच्या परिसरातून हजारो भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. संत रामपाल जी महाराज यांनी ऑनलाईन प्रोजेक्टरच्या माध्यमातून आपल्या अमृतमय प्रवचनातून उपस्थित जनसमुदायाला जीवनातील खरे उद्दिष्ट काय आहे, मोक्षप्राप्तीसाठी कोणता योग्य मार्ग आहे, याचे शास्त्र आधारित ज्ञान दिले. अनेक लोकांनी कबीर परमेश्वराची खरी ओळख आणि त्यांची मोक्षदायक भक्ति पद्धत प्रथमच समजून घेतली.

कार्यक्रमात मोफत नामदीक्षा घेण्याची व्यवस्था करण्यात आली होती आणि शेकडो लोकांनी नामदीक्षा घेऊन आपल्या जीवनात आध्यात्मिक परिवर्तनाची सुरुवात केली. उपस्थित भक्तांसाठी चहा-बिस्किटची सुविधा करण्यात आली होती. संपूर्ण वातावरण भक्तिभाव, श्रद्धा आणि आध्यात्मिक ऊर्जा याने भरलेले होते.

आयोजकांनी सर्व भक्तगणांचे आभार मानत पुढील काळात असेच शास्त्र आधारित सत्संग नांदेड जिल्ह्यात तसेच इतर ठिकाणी आयोजित केले जातील, असे सांगितले. शेवटी सर्वांना आवाहन करण्यात आले की, जगतगुरु संत रामपाल जी महाराज यांनी दिलेला खरा शास्त्र आधारित भक्ति मार्ग स्वीकारून आपल्या जीवनात सुख, शांती आणि मोक्षप्राप्ती साधावी, तसेच आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि मित्रपरिवारालाही या पवित्र ज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न करावा. कारण मनुष्य जन्म फार दुर्मिळ असून त्याचा उपयोग परमात्मा प्राप्तीसाठीच व्हायला हवा.


रविवार, जुलै १३, २०२५

मरवाळी: शासकीय रस्त्यावरील अतिक्रमणांचा विळखा दूर करण्यास ग्रामपंचायत, बांधकाम विभाग अपयशी

     

मरवाळी/ता.नायगाव,दि.१३/०७/२०२५: नायगाव तालुक्यातील टेंभूर्णी ते कुंचेली (शंकरनगर) दरम्यान करोडो रुपये खर्च करून सिमेंट कॉक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे .हा रस्ता मरवाळी गावातून जात असून शासन दरबारी म्हणजेच बांधकाम विभागाकडे या रस्त्याची रुंदी ही 33 फुट आहे.मरवाळी गावच्या गावठाण भागातून जाणा-या रस्त्यालगत गावातील काही नागरीकांनी वर्षानुवर्षे व काही अलिकडच्या काळात ग्रामपंचायतीच्या परवानगीने अनाधिकृत अतिक्रमण करून घरे बांधली आहेत,तर काही जणांनी बेकायदा मुरुम टाकून,पत्रे टाकून हा शासकीय रस्ता आपल्या ताब्यात घेतला आहे त्यामुळे सदर रस्त्याची गावातील रुंदी ही 22 फुटापेक्षा कमी होत आहे. 

सदर रस्त्यावरील अनधिकृत अतिकृमण काढण्यापेक्षा ग्रामपंचायत, मरवाळी यांनी रस्ता 22 फुटाचा करण्याचा सर्वानुमते चर्चा करुन ठराव घेऊन अतिकृमणास समर्थन देत आहे?, गुत्तेदार करत असलेल्या 22 फुटाच्या रस्त्यामध्ये एका बाजूच्या नालीकरीता जागा सोडल्यास सदर रस्त्याची रुंदी 15 ते 17 फुट इतकीच राहत आहे. या मुळे  शासकीय रस्त्यावर अतिकृमण कायम होण्यास ग्रामपंचायतीच्या निर्णयामुळे एक प्रकारची मदत होईल, व भविष्यात शासकीय रस्ता शिल्लक राहणार नाही.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ च्या कलम ५३ नुसार ग्रामपंचायतीला अतिक्रमणे दूर करण्याचे अधिकार आहेत,जर अतिक्रमणे झाली ती दूर करण्यास ग्रामपंचायतीला अपयश आल्यास महसूल अथवा पोलीस यंत्रणेची मदत घेण्यात यावी.असे असताना ग्रामपंचायत बघ्याची भूमिका घेत आहे तसेच २५ जानेवारी १९९०, १३ डिसेंबर १९९३, ०४ डिसेंबर २०१० च्या ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार सदर अतिक्रमणे दूर करण्याचे वेळोवेळी परिपत्रकान्वये निर्देश दिले आहेत.

हा रस्ता बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्यामुळे बांधकाम विभागातील संबंधित अधिकारी अशा प्रकारे अवैध बांधकाम, अतिक्रमणे करुन बसलेल्यांसमोर नांगी टाकून बसले आहेत.

असे असतानाही अशी सार्वजनिक जागेवरील बांधकामे दूर करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत त्वरित काळजी घेत नाही तसेच जन्या अतिक्रमणांची बाब उशिरा लक्षात आल्यामुळे ही अतिक्रमणे कालांतराने दूर करणे कठीण जाते.ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची असून शासनाच्या जमिनी,जागा,रस्ते जतन करण्याच्या दृष्टीने अत्यंत निष्काळजीपणाची आहे.

अरुंद रस्ता बनल्यामुळे पुढे चालून वाहनं ये-जा करताना अडचण निर्माण होऊन गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागल्याशिवाय राहणार नाही,असी अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे काढण्यास ग्रामपंचायत,  बांधकाम विभाग अपयशी ठरल्यामुळे गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन सदरील अतिक्रमण व अनधिकृत बांधकामे काढण्याची मागणी केली आहे.

गावचे सरपंच, बांधकाम विभागाचे डिप्टी इंजिनिअर, इंजिनिअर  गावात आले होते, पदाधिकारीही उपस्थित होते,गावातील काही नागरिकही होते. यांच्यात चर्चा होऊन सर्वानुमते कुणाचेही बांधकाम न पाडता  २२ फुटाची मार्किंग करुन रस्ता बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

                                      गुत्तेदार                                                                 


 

सोमवार, जुलै ०७, २०२५

सोसायटी निवडणुकीत शिवराज पाटील होटाळकर यांच्या पॅनलचे 11 पैकी 11 उमेदवार विजयी

          
संजय चिखले

मरवाळी/ता.नायगाव, दि.०६/०७/२०२५: मौजे. होटाळा तालुका नायगाव(खै.) येथील सेवा सहकारी सोसायटी होटाळा चे श्री दत्त विकास पॅनल प्रमुख शिवराज पाटील होटाळकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आज दिनांक 6/7/ 2025 रोजी पार पडली या पॅनलचे 11 पैकी 11 उमेदवार भरघोश मताने निवडून आले.या निवडणूकीत सर्व गावकऱ्यांनी एकतर्फी विजय मिळवून दिला.

 विजयी उमेदवार 

 श्री शिवराज भाऊराव पाटील, शिवाजी संभाजी पवार, विठ्ठल दादाराव पवार, राजेश व्यंकटराव पवार, गोविंद कंदुरके, दत्ता देवराव पवार, उमरेकर दत्ता देवराव, पवळे गोविंद गंगाधर, पवार शिवकांत शामराव, संजय भगवान बन, डोईवाड मोतीराम गंगाराम या सर्व उमेदवाराचे गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

             कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तात्रय भगवानराव पाटील होते, गावातील प्रथम नागरिक गणेश व्यंकटराव पवार हनुमंतराव माली पाटील प्रा.काशीबन सर संग्राम एकाळे. गणेश भद्रे भगवान भद्रे.शिवाजी कोतेवार. मधुकर पवार शंकर पवार व्यंकट पवार गंगाधर येवते प्रकाश पवार रमेश पिंपळदरे भाऊराव पाटील. शरद हनुमंतराव पवार धोंडीबा दत्तात्रय पवार मनोहर हिवराळे जितेश पवार डी एम पिंपळदरे गणेश विठ्ठलराव पवार संभाजी रामजी जाधव चंद्रकांत दसरत पवार तसेच गावातील सर्व मंडळी उपस्थित होती.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद पवार पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन चंद्रकांत पवार यांनी केले.

गुरुवार, जुलै ०३, २०२५

एका महिलेने बार्टीच्या कुविख्यात सराईत लाचखोरीन कंत्राटी महिला सुजाता पोहरेचा काट्याने काढला काटा

 हक्कासाठी लाच का?

कुठलाही सरकारी दाखला लाचेशिवाय मिळणे तुमचा हक्क आहे


मरवाळी/नांदेड,दि.०३/०७/२०२५: लाच देणे व लाच घेणे हा कायद्याने दंडनीय अपराध आहे, असा फलक सर्वच शासकीय कार्यालयांत लावलेला दिसतो.असे असतानाही लालची लोकसेवक पैशाच्या मोहापायी लाच मागताना सर्रासपणे आढळून येतात.काही प्रकरणात नागरिकांना लाच देण्याची इच्छा नसल्याने ते आपल्या जिल्ह्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दाखल करुन लाचखोर महिला-पुरुष लोकसेवकास ॲंटी करप्शन ब्युरोच्या हवाली करतात तर लाखों लोकं लाच देणे मजबुरी का नाम महात्मा गांधी समजून लाचखोरांच्या लालसेला बळी पडतात

         ॲंटी करप्शन ब्युरो कडून नेहमी आवाहन करण्यात येते की,नागरिकांकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास एसीबीकडे तात्काळ संपर्क साधावा.एसीच एक तक्रार प्राप्त झाली असता त्यावर यशस्वी सापळा कारवाई करण्यात आली आहे...


सविस्तर वृत्तांत

तक्रारदार यांनी त्यांचे मुलाचे पुढील शिक्षणासाठी अनुसूचीत जातीची जात पडताळणी होऊन वैधता प्रमाणपत्र मिळणेकामी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड यांच्याकडे ऑनलाइन अर्ज केला तसेच दिनांक 13/03/2025 रोजी ऑफलाइन देखील अर्ज केला होता. परंतु तो काही तांत्रिक कारणास्तव नामंजूर करण्यात आला होता. 

        तक्रारदार यांनी पुन्हा त्यांचे मुलाचे ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर यातील आरोपी लोकसेविका सुजाता पोहरे यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी तक्रारदार यांना सांगितले की, मी काम करीत असलेल्या विभागाचे शेजारीच जात पडताळणी विभागाचे काम चालते. तेथे माझी ओळख असून मी तुझे काम करून देते. परंतु पैसे भरल्याशिवाय काम होणार नाही. तुम्ही 20,000/- रूपये टोकन रक्कम दिल्यास तुमचे काम होईल अन्यथा काम होणार नाही अशा आशयाची तक्रार दिनांक 26/06/2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे दिली होती. 


तक्रारीची पडताळणी

    दिनांक 03/07/2025 रोजी समाज कल्याण कार्यालय, नांदेड परिसरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI) नांदेड येथील लोकसेविका सुजाता पोहरे यांचे कक्षात पंचासमक्ष लाचमागणी पडताळणी केली. 

         यातील लोकसेविका यांनी तक्रारदार यांच्या मुलाची अनुसूचीत जातीची जात पडताळणी होऊन जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्याकरीता एकूण 30,000/- रूपये लाचेची मागणी केली. तडजोडअंती सुरूवातीस 15,000/- रूपये व उर्वरीत रक्कम 15,000/- रूपये जात पडताळणी प्रमाणपत्राचे काम झाल्यानंतर द्यावे लागतील असे म्हणून लाचेची मागणी केली.


 सापळा कारवाई

    दिनांक 03/07/2025 रोजी समाज कल्याण कार्यालय, नांदेड परिसरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI) नांदेड येथील लोकसेविका सुजाता पोहरे यांचे कक्षात सापळा कार्यवाही आयोजित केली. लोकसेविका सुजाता पोहेरे यांनी तक्रारदार यांचेकडून लाच रक्कम 15,000/- रूपये पंचासमक्ष स्वतः स्विकारली आहे.


आरोपीचे अंग झडतीमध्ये मिळून आलेल्या वस्तू आणि रोख रक्कम

         लोकसेविका यांचे ताब्यात एक विवो कंपनीचा T4 कंपनीचा मोबाईल व रोख रक्कम 50 रूपये मिळून आले. मोबाईल तपासकामी ताब्यात घेण्यात आला आहे. 

 

आरोपीची घरझडती

     आरोपी लोकसेविका सुजाता पोहरे यांचे हडको, नांदेड येथील राहते घराची घरझडती सुरू आहे.


गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया

    लोकसेविका सुजाता पोहरे यांचेविरुद्ध पो.स्टे. विमानतळ, ता. जि. नांदेड येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


आरोपी अटक

       लोकसेविका यांना ताब्यात घेण्यात आले असुन गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक करण्याची तजवीज ठेवली आहे.  


सापळा व तपास अधिकारी

श्री. करीम खान पठाण,

पोलीस निरीक्षक,

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड.

सापळा पथक

मपोहेकाॅ/609 मेनका पवार, पोेकाॅ/1082 यशवंत दाबनवाड, पोेकाॅ/1487 ईश्वर जाधव चापोहेकाॅ/2468 रमेश नामपल्ले सर्व नेम. लाचलुचपत प्र

तिबंधक विभाग, नांदेड.




आवाहन

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.


श्री.प्रशांत पवार

पोलीस उपअधीक्षक 

ला.प्र.वि.नांदेड. 

93590 56840 (मोबाईल, व्हाट्सअप)


कामं अडली

गरज पडली

तर फक्त एक फोन

दूरध्वनी 02462 253512


ACB हेल्पलाईन

टोल फ्री 1064



रविवार, मार्च ०९, २०२५

मीडिया मॉनिटरिंगविषयक शासन निर्णयाबाबत महाराष्ट्र शासनाचे स्पष्टीकरण

 मुंबई प्रेस क्लबने उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन


By: संजय चिखले (✍🏼माळा आडवं मरवाळी✍🏼)

वृत्त विशेष

📍मुंबई, रविवार दि.०९ मार्च २०२५महाराष्ट्र शासनाने आज मीडिया मॉनिटरिंगविषयक निर्गमित शासन निर्णयाबाबत सविस्तर स्पष्टीकरण देत मुंबई प्रेस क्लबने व्यक्त केलेल्या शंकांचे निरसन केले आहे. या उपक्रमाचा उद्देश माध्यमांवर देखरेख ठेवणे किंवा टीकेला आळा घालणे नसून, चुकीच्या माहितीचे विश्लेषण करून त्यावर योग्य ती कार्यवाही करणे हा आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

देखरेख नव्हे, तथ्य तपासणी:

हा उपक्रम केवळ प्रसिद्ध झालेल्या माहितीमधील तथ्यांची पडताळणी करेल. पत्रकार किंवा वृत्तसंस्थांवर कोणतीही देखरेख ठेवली जाणार नाही. सार्वजनिक हितासाठी चुकीच्या माहितीचे निराकरण केले जाईल.

वस्तुनिष्ठ विश्लेषण

‘नकारात्मक’ वृत्तांत म्हणजे केवळ चुकीची, दिशाभूल करणारी किंवा जाणीवपूर्वक विकृत केलेली माहिती, असे यात अभिप्रेत आहे. तथ्यांवर आधारित रचनात्मक टीका कधीही नकारात्मक म्हणून वर्गीकृत केली जाणार नाही. स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित ही वर्गीकरण प्रणाली आहे. तसेच माध्यमांमधून प्रसिद्ध झालेली वस्तुनिष्ठ माहिती, तथ्यांवर आधारित रचनात्मक टीका, शासनापर्यंत पोहोचवण्यासाठीही याद्वारे पूर्वीप्रमाणेच कामकाज करण्यात येईल.

शासनाची भूमिका

* नागरिकांना अचूक माहिती पुरवणे हे शासनाचे कर्तव्य

* चुकीच्या माहितीचे वेळीच निराकरण करण्यासाठी यंत्रणा

* घटनात्मक मर्यादांचे पालन करणारी कार्यपद्धती

पारदर्शकता आणि संवाद

* केंद्राच्या कार्यपद्धतीनुसार संपूर्ण पारदर्शकता

* निष्कर्षांची सार्वजनिक उपलब्धता

* माध्यम संस्थांशी सकारात्मक संवादाची तयारी

नागरिकांपर्यंत अचूक माहिती पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. वृत्तपत्र स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांबाबत आमची बांधिलकी अढळ आहे. चुकीच्या माहितीमुळे सार्वजनिक समज दूषित होऊ नये यासाठी ही यंत्रणा कार्यरत राहील, असे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

शासन माध्यम संस्थांशी संवाद साधून या उपक्रमात आवश्यक त्या गुणात्मक सुधारणा करण्यास तयार आहे. या उपक्रमाद्वारे नागरिकांना शासकीय योजना व कार्यक्रमांबाबत अचूक माहिती मिळण्यास मदत होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

०००

TAGS मीडिया

गुरुवार, मार्च ०६, २०२५

एसटी महामंडळ बसमध्ये प्रवास करताना आता सुट्ट्या पैशाची चिंता मिटली,MSRTC ने यूपीआय क्यू आर कोड स्कॅन करून तिकीट देण्याची सुविधा सुरू केली

 

संजय चिखले, नांदेड: एसटीतून प्रवास करताना आतापर्यंत तिकीट काढण्यासाठी सुट्या पैशांची मोठी समस्या जाणवत होती. अनेकदा या सुट्या पैशावरून प्रवासी व वाहकामध्ये वादही होत. मात्र आता एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत डिजिटल प्रणालीद्वारे तिकीट देण्याची सोय केली आहे. त्यामुळे प्रवाशांची आता तिकिटासाठी सुट्या पैशांची चिंता मिटणार आहे.

एसटीत पारंपरिक पद्धतीने अजूनही रोख पैसे घेऊन तिकीट देण्याची पद्धत आहे. परंतु यात बऱ्याचदा सुटे पैेसे नसल्याने तिकिटाची अडचण होते. सुटे पैसे नसतील तर कंडक्टर (वाहक) उतरताना उरलेले पैसे घ्या म्हणतात. बऱ्याचदा घाईत उतरताना ते पैसे घेण्याचे प्रवासी विसरतात. किंवा वाहकाकडेच सुटे पैसे नसतील तर प्रवाशांसोबत तू-तू मै-मै होते. यावर आता एसटी महामंडळाने कायमस्वरूपी तोडगा काढला असून आता डिजिटल प्रणालीद्वारे तिकीट देण्यात सोय करण्यात आली आहे. सर्व वाहकांसाठी ॲण्ड्राईड तिकीट इश्यू मशिन्स (ईटीआयएम) नव्याने सेवेत दाखल झाल्या आहेत. नव्या मशिनमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशांऐवजी यूपीआय, क्यूआर कोड आदी डिजिटल पेमेंटचा वापर करत तिकीट काढता येणार आहे. शिवाय रोख पैसे देऊनही याच मशीनमधून तिकीट मिळणार आहे.

शासनाची सर्व कार्यालये हळूहळू कॅशलेस होत असताना महाराष्ट्र राज्य परिवहन एसटी महामंडळातही ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आता एसटीमधील प्रत्येक वाहकाकडे त्यांच्या जवळील मशीनमध्ये क्यूआर कोडची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सुट्या पैशांची चिंता आणि त्यावरून होणारे वाद आता होणार नाहीत. एसटी बसमधील वाहकाकडे प्रवास करताना अनेकदा तिकिटाचे पैसे सुट्टे देण्या-घेण्यावरून वाहक आणि प्रवाशांमध्ये नेहमीच वादावादी होत असते. त्याचा प्रवाशांना मन:स्ताप होत असतो; परंतु आता प्रवासी एसटीचे तिकीट खरेदी करताना डिजिटल पेमेंट करू शकणार आहेत. जिल्ह्यात ही सुविधा वाहकांच्या तिकीट यंत्रावर करण्यात आली आहे.

या सुविधेस सध्या प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, मोठ्या कटकटीतून सुटका झाल्याचे समाधान प्रवाशांना मिळत आहे. मॉलपासून चहाच्या टपरीपर्यंत अन् भाजी विक्रेत्यांपासून रिक्षाचालकांपर्यंत सध्या सगळ्यांकडेच डिजिटल पेमेंट वॉलेट, यूपीआय असल्यामुळे रोख पैशांची गरज कमी झाली आहे. एसटीचा क्यूआर कोड सर्व पेमेंट वॉलेटला चालणार आहे. त्यामुळे गुगल पे असो वा फोन पे अशा प्रत्येक वॉलेटवरून पैसे दिले जाऊ शकतात.

महामंडळाच्या जेवढ्या बसेस जिल्ह्यात सध्या धावताहेत, त्या प्रत्येक बसमध्ये क्यूआर कोडची सुविधा दिली जात आहे. त्याचा लाभही सध्या प्रवाशांकडून घेतला जात आहे. मात्र बसच्या आरक्षणासाठी अद्याप यूपीआय पेमेंटची सोय उपलब्ध नाही. डेबिट व क्रेडिट कार्डचा वापरही दुसऱ्या टप्प्यात केला जाणार आहे. त्यामुळे एसटीची पेमेंट प्रक्रिया सुलभ पद्धतीने होत आहे. एसटी बसमध्ये पूर्वी चिल्लर पैशावरून प्रवासी व वाहकांत वाद होत असत. बऱ्याचदा पैसे नंतर देतो म्हणून प्रवाशांना सांगितले जात होते. आता चिल्लर पैसे बाळगण्याची चिंता मिटली आहे.



रविवार, फेब्रुवारी ०९, २०२५

वृत्त विशेष: शेत वहीवाटीमध्ये वाहन वापरानुसार रस्ता करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे


By संजय चिखले

मरवाळी, गुरुवार,दि.१६/०१/२०२५: यांत्रिकीकरणामुळे सध्या शेत वहीवाटीमध्ये मोठ्या वाहनांचा वापर होत असल्याने वाहन प्रकारानुसार शेत जमीन वहिवाट रस्ता करण्याबाबत तहसिलदारांना निर्णय घेता यावा यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात याव्यात, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.

शेतजमिनीच्या खरेदी विक्रीच्या दस्त नोंदणीमध्ये शेत रस्त्याचा समावेश बंधनकारक करणे व शेत रस्त्यांच्या नोंदणी ७/१२ इतर हक्कात करण्याबाबत महसूल मंत्री यांच्या दालनात बैठक झाली. बैठकीस वित्त नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय आणि कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार अभिमन्यू पवार, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार, सहसचिव अजित देशमुख उपस्थित होते.

महसूल मंत्री श्री बावनकुळे म्हणाले की, शासनाने शेत रस्त्यांचे वर्गीकरण केले आहे. त्यानुसार जे रस्ते अस्तित्वात आहेत त्यांना क्रमांक देण्यात यावेत. शेतजमिनीमध्ये वहिवाट करण्यासाठी अस्तित्वात असलेले रस्ते काही ठिकाणी अरुंद आहेत. अशा ठिकाणी मोठी वाहने जाण्यास अडचण निर्माण होऊन तक्रारही होतात. शेत वहिवाट रस्त्याची तक्रार सुनावणी तहसीलदार यांच्याकडे होते. त्यानंतर त्यावर थेट अपील उच्च न्यायालयात केले जाते. थेट अपील होण्यापूर्वी अतिरिक्त जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करता यावे यासाठी एक स्टेप मधी असणे आवश्यक असून त्यानुसार नियमात सुधारणा करण्यात याव्यात अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

०००

एकनाथ पोवार/विसंअ/

वृत्त विशेष: शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

 

  • शिवपाणंद व शेत रस्त्यांची कामे दर्जेदार करा
  • ग्रामस्तरीय शेतरस्ता समिती स्थापन करणार
  • पाणंद रस्त्यांची प्रलंबित प्रकरणे महिनाभरात निकाली काढणार
  • मोजणीसह पोलीस संरक्षणासाठीची फी बंद करणार

By संजय चिखले

मरवाळी, गुरुवार,दि.०६/०२/२०२५: राज्यातील सर्वच शिवपाणंद आणि शेतरस्त्यांची हद्द निश्चित करून त्यांची कामे दर्जेदाररीत्या पूर्ण करावी, अशी सूचना देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर महसूल प्रशासनामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.

शिवपाणंद आणि शेत रस्ते समृद्ध करण्याबाबत पब्लिक डोमेनच्या माध्यमातून नागरिकांच्या सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.


नागपूर पॅटर्न राबवणार

महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, नागपूर जिल्ह्यात प्रती किलोमिटर केवळ आठ ते दहा लाख रुपये खर्चामध्ये उत्कृष्ट पाणंद रस्ते बनविण्यात आले आहेत. या कार्यपद्धतीचा सर्व जिल्ह्यांनी अभ्यास करून इतर जिल्ह्यांमध्येही याप्रमाणे कार्यवाही करावी. तसेच ग्रामस्तरीय शेतरस्ता समिती स्थापन करून त्याचा अहवाल शासनास सादर करावा. रस्त्यांचे काम दर्जेदार होईल, याची दक्षता घ्यावी. पाणंद रस्त्यांबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे एका महिन्यात निकाली काढावीत.

मोजणीसह पोलीस संरक्षणासाठीची फी बंद करणार

पाणंद रस्ते, शेतरस्ते, सार्वजनिक वहीवाटीच्या रस्त्यांच्या मोजणी आणि पोलीस संरक्षणासाठी असलेली फी बंद करण्याचा विचार करण्यात येईल असे सांगून श्री. बावनकुळे म्हणाले, अशा रस्त्यांच्या नंबरींगचे सर्वेक्षण करुन नंबरींग हटवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. रस्त्यांच्या प्रकरणी तहसीलदारांच्या निर्णयावर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील केल्यानंतर त्यांनीच अंतिम निकाल देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगून शेतरस्त्यांचा उल्लेख झाल्याशिवाय वाटप पत्र मंजूर करण्यात येऊ नये यासाठीही शासन सकारात्मक असल्याचे सांगितले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ


मंगळवार, फेब्रुवारी ०४, २०२५

PCR-MCR: नांदेडच्या उप-यास दोन दिवसांची पोलीस कोठडी रिमांड(PCR) तर दुसरीकडे अंबड उपविभागीय कार्यालयातील आरोपीचा वाढीव PCR संपल्यानंतर आता १७ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी (MCR)

    

संजय चिखले

नांदेड, मंगळवार,दि.०४ फेब्रुवारी २०२५: काल दि. 03.02.2025 रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कार्यालय जालना, जि. जालना येथे करण्यात आलेल्या लाच सापळा कारवाईतील आलोसे नामे अमोल रमेश येन्नावार  वय 47 वर्ष पद - वरीष्ठ लिपीक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कार्यालय, जालना जि. जालना ( वर्ग 3) यांना गुन्ह्याचे तपासकामी अटक करून आज दि. 04.02.2025 रोजी मा. श्री. एस. जी. अडके साहेब, विशेष जिल्हा व सत्र न्यायालय, क्र 4, जालना जि. जालना यांचे समक्ष न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने नमुद आलोसेचा गुन्ह्याचे तपासकामी दि. 05.02.2025 रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड (PCR) मंजुर केला आहे.

              तसेच वाढीव पोलीस कोठडी मध्ये असलेला उपविभागीय अधिकारी कार्यालय, अंबड जि. जालना येथील सापळा कारवाईतील आलोसे नामे देवानंद कारभारी डोईफोडे वय 37 वर्षे, सहाय्यक महसूल अधिकारी, उपविभागीय अधिकारी, कार्यालय अंबड जि. जालना यांचा वाढीव एक दिवसाचा  PCR संपत असल्याने आलोसे यास पुन्हा एक दिवसाचे वाढीव PCR चे मागणीसह मा.विशेष न्यायालय अंबड येथे हजर केले असता मा.न्यायालयाने आलोसे यास दि.17.02.2025 रोजी पावेतो न्यायालयीन कोठडीमध्ये (MCR) जालना जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील क्रंमांकावर संपर्क साधावा.
  
अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो जालना कार्यालय
02482-220252
मो. क्रं. 9881463365
टोल फ्री क्र. 1064

MJP परतूर कार्यालयात वरिष्ठ क्लर्क असलेल्या नांदेडच्या उप-याच्या भाडेतत्त्वावर असलेल्या गाडीचे बिल काढण्यासाठी साहेब व स्वतः करिता 8 हजाराची लाच स्वीकारताना ऍंटी करप्शन ब्युरो पथकाने मुसक्या आवळल्या

 

By संजय चिखले

नांदेड, सोमवार,दि.०३-०२-२०२५: तक्रारदार यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, उप विभाग परतूर येथिल कार्यालयात भाडेतत्वावर असलेल्या बोलेरो जीपचे बिले मंजुर करण्यासाठी आलोसे अमोल रमेश यन्नावार वय 47 वर्षे व्यवसाय नौकरी वरीष्ठ लिपीक, महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विभाग कार्यालय, जालना यांनी साहेबासाठी 5000/-रुपये व स्वतः करिता 3000/- रुपये अशी एकुण 8000/- रुपयांची लाच मागणी करुन ती स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले आहे

तक्रारदार यांची बोलेरो जीप क्र. एम.एच.46 पी-8184 ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग जालना अंतर्गत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, उप विभाग परतूर येथिल कार्यालयात भाडेतत्वावर असुन सदर जीपचे मागील तीन बिले एकुण 1,25000/- रुपये मंजुर करण्यासाठी यातील आलोसे अमोल रमेश यन्नावार वय 47 वर्षे व्यवसाय नोकरी वरीष्ठ लिपीक, महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विभाग कार्यालय, जालना यांनी साहेबासाठी 5000/-रुपये व स्वतः करिता 3000/- रुपये अशी एकुण 8000/- रुपयांची लाच मागणी केली, परंतु तक्रारदार यांची त्यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना यांच्याकडे तक्रार केली.

सदर तक्रारीवरुन दि.03.02.2025 रोजी लाच मागणी पडताळणी केली असता, यातील आलोसे अमोल रमेश यन्नावार वय 47 वर्षे व्यवसाय नोकरी वरीष्ठ लिपीक, महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विभाग कार्यालय, जालना यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग जालना अंतर्गत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, उप विभाग परतूर येथिल कार्यालयात भाडेतत्वावर असलेल्या बोलेरो जीप क्रं. एम.एच.46 पी-8184 हीचे मागील तीन बिले एकुण 1,25000/- रुपये मंजुर करण्यासाठी साहेबासाठी 5000/-रुपये व स्वतः करिता 3000/- रुपये अशी एकुण 8000/- रुपयांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन आज दि.03.02.2025 रोजी सापळा कार्यवाही दरम्यान यातील आलोसे यांना महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विभाग कार्यालय, जालना येथे स्वतः चे कार्यालयात तक्रारदार यांच्याकडुन लाचेची 8000/-रुपये रक्कम स्विकारतांना लाचेच्या रकमेसह पोलीस उप अधीक्षक श्री. बी. एस. जाधवर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना, यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले व अंगझडती घेतली असता आलोसे यांच्याकडे लाचेची रोख रक्कम 8000/-रुपये व मोबाईल मिळुन आले.

आलोसे अमोल रमेश यन्नावार वय 47 वर्षे व्यवसाय नोकरी वरीष्ठ लिपीक, महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विभाग कार्यालय, जालना यांच्यावर पोलीस ठाणे कदीम जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया चालु आहे.

सदरची कामगीरी मा. श्री. संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, मा. श्री. मुकुंद आघाव, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक बी. एस. जाधवर, व पथकातील अंमलदार गजानन घायवट, गणेश चेके, गणेश बुजाडे, संदीपान लहाने, शिवलिंग खुळे यांनी केली.

तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांचे कडुन आवाहन करण्यात येते कि, कोणी लोकसेवक स्वत अगर इतरांमार्फत शासकीय कामासाठी लाचेची मागणी करीत असल्यास किंवा खासगी व्यक्ती मार्फत कोणी लाचेची मागणी करीत असल्यास ०२४८२ २२०२५२, तसेच टोल फ्री के १०६४ वर संपर्क करावा.

 

तसेच पोलीस उप अधिक्षक जालना मो.नं. ९८८१४६३३६५ व dysp.acbjalna@mahapolice.gov.in आणि dyspacbjalana@gmail.com वर संपर्क करावा.

शनिवार, फेब्रुवारी ०१, २०२५

PCR:अंबड उपविभागीय महसूल कार्यालयातील अव्वल कारकूनास (महसूल सहायक) ३ तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड

 

जात प्रमाणपत्र देण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना जालना एसीबी पथकाने रंगेहाथ पकडून आवळल्या होत्या मुसक्या

By संजय चिखले

नांदेड, शनिवार, दि.०१-०२-२०२५: काल दि. ३१.०१.२०२५ रोजी उपविभागीय अधिकारी, कार्यालय अंबड, जि. जालना येथे करण्यात आलेल्या लाच सापळा कारवाईतील आलोसे नामे देवानंद कारभारी डोईफोडे वय ३७ वर्ष सहाय्यक महसूल अधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय, अंबड जि. जालना ( वर्ग ३) यांना गुन्ह्याचे तपासकामी अटक करून आज दि. ०१.०२.२०२५ रोजी मा. श्री. गायधनी साहेब, अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय, अंबड जि. जालना यांचे समक्ष न्यायालयात हजर केले असता...

मा. न्यायालयाने नमुद आरोपीचा गुन्ह्याचे तपासकामी दि. ०३.०२.२०२५ रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड (PCR) मंजुर केला आहे.

           लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील क्रंमांकावर संपर्क साधावा.

अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो जालना कार्यालय

02482-220252

मो. क्रं. 9881463365.

मो. क्र. 9767108455.

टोल फ्री क्र. 1064.

सोमवार, जानेवारी २७, २०२५

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन'चे लोकार्पण

 गुन्हे सिद्धतेकरिता 'मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन' सुरू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य


By संजय चिखले

नांदेड, सोमवार,दि.२७ जानेवारी २०२५: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आज मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण केले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ नुसार ७ किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. या सुधारणांचा प्रमुख भाग असलेली 'मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन' महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहे. गुन्हे सिद्धतेकरिता अशी सुविधा सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

राज्यात एकूण २५९ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करण्यात येणार असून त्यापैकी २१ पूर्णपणे सुसज्ज व्हॅन्स कार्यरत करण्यात आल्या आहेत, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून क्राईम सीन ॲप्लिकेशन गुन्हे स्थळावर तपासणी करणार आहे. यामध्ये पुरावे संग्रहित करून बारकोडद्वारे सुरक्षित करण्यात येणार आहे.

पुरावे नष्ट करणे, पुराव्यांशी छेडछाड करून आरोपींना शिक्षेपासून आता कुणीही वाचवू शकणार नाही. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होऊन गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण निश्चितच वाढणार आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

याप्रसंगी मंत्री डॉ. पंकज भोयर आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

लाखोंचा पगार तरिही भिकारी,सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवारने जमवली २९ लाखांची बेकायदा मालमत्ता

     कायदेशीर उत्पन्नाचे तुलनेत १६.६५% अपसंपदा


समाजात, पाहुणे राऊळे, नातेवाईक, मित्रमंडळी तसेच जवळची लोकं साहेबांनी लई कमाई केली, कमाई केली सतत चर्चा करत असतात, बहुतांश लोकसेवकांनी ती कमाई अशाच भ्रष्टाचारातून केलेली असावी

By संजय चिखले

नांदेड, रविवार दि.२६-०१-२०२४: सविस्तर माहिती असी कि,लोकसेवक संजय पुजलवार सध्या सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई कार्यालयाकडून उघड चौकशी करण्यात आली. लोकसेवक यांनी संपादित केलेली मालमत्ता कायदेशीर स्त्रोताद्वारे संपादित केली किंवा कसे याबाबत त्यांना वेळोवेळी संधी देवून माहिती घेण्यात आली. परंतु त्यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत ते पुष्टीदायक पुरावे सादर करू शकले नाहीत. त्यांनी लोकसेवक पद धारण केलेल्या कालावधीत त्यांना प्राप्त असलेल्या कायदेशीर उत्पन्नापेक्षा जास्त किंमतीची मालमत्ता स्वतःचे नावे, त्यांची पत्नी सौ.मनीषा संजय पुजलवार यांच्या नावे संपादित केल्याचे उघड चौकशी अंती निष्पन्न झाले आहे. त्यांनी संपादित केलेली रू. 28,74,146/- किंमतीची मालमत्ता ही त्यांच्या कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेत 16.65% जास्त असल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले आहे.

 सदरहू विसंगत बेहिशोबी मालमत्ता संपादित करण्यासाठी दि.01/05/1998 ते दि. 31/03/2019 दरम्यान लोकसेवक संजय पुजलवार यांना त्यांची पत्नी सौ. मनीषा संजय पुजलवार यांनी मदत करून गुन्हयास प्रोत्साहित करून अपप्रेरणा दिली आहे.        

म्हणून त्या दोघांचे विरूध्द श्री संतोष कमलाकर गुर्जर, पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, मुंबई यांनी गुन्हा रजिस्टर नंबर 59/2025 नुसार तक्रार दिल्यानंतर वरील प्रमाणे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 कलम 13(1)(ब), 13 (2), 12 अनुसार पोलीस स्टेशन भाग्यनगर,जि.नांदेड येथे अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      तसेच पुढील कायदेशीर प्रक्रिया चालु आहे.

आरोपी संजय पुजलवार, सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी व पत्नी मनीषा संजय पूजलवार, दोघे आमदार नगर, मालेगाव रोड, नांदेड येथे वास्तव्य करून आहेत.

या अपसंपदेच्या कारवाईचा पुढील तपास श्री संदीप पालवे,पोलीस अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो नांदेड परिक्षेत्र,डॉ. संजय तुंगार,अपर पोलीस अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो नांदेड परिक्षेत्र यांचे मार्गदर्शन व श्री प्रशांत पवार पोलीस उप अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो,नांदेड यांचे पर्यवेक्षणाखाली तपास अधिकारी-

          श्रीमती माधुरी यावलीकर, पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड ह्या करत आहेत.

  • नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट)यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास अथवा शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी बेकायदा मार्गाने अपसंपदा जमवल्याची माहिती असल्यास तात्काळ खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

       श्री प्रशांत पवार, 

       पोलीस उप अधीक्षक, 

       अँटी करप्शन ब्युरो, नांदेड. 

       मो.क्र. - 9870145915

       दुरध्वनी 02462-253512 

       टोल फ्रि क्रं. 1064

शनिवार, जानेवारी २५, २०२५

महाराष्ट्रात तीन यशस्वी सापळा कारवायामधे चार लाचखोर चतुर्भुज

 

By संजय चिखले

नांदेड,दि.२५-०१-२०२५: आज दिनांक २५ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील ॲंटी करप्शन‌ ब्युरो अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तीन युनिट द्वारे करण्यात आलेल्या तीन यशस्वी सापळा कारवाई मधे ४ लाचखोर आरोपी लोकसेवकांना रंगेहाथ पकडण्यात यश मिळाले आहे.छत्रपती संभाजीनगर युनिट द्वारे शिल्लोड तालुक्यात करण्यात आलेल्या यशस्वी सापळा कारवाईत महसूल सहायक (अनाधिकृत गौण खनिज उत्खनन/वाहतूक पथक) तसेच गडचिरोली युनिट द्वारे पुराडा वनपरिक्षेत्रात करण्यात आलेल्या यशस्वी सापळा कारवाईत वनपाल व सांगली युनिट द्वारे करण्यात आलेल्या यशस्वी सापळा कारवाईत पोलीस हवालदार व पोलीस नाईक ACB च्या जाळ्यात अडकले आहेत.

  1. छत्रपती संभाजीनगर लाप्रवि परिक्षेत्र अंतर्गत छत्रपती संभाजीनगर घटक एक कारवाई
  2. नागपूर परिक्षेत्र अंतर्गत अंतर्गत गडचिरोली घटक एक कारवाई
  3. पुणे लाप्रवि परिक्षेत्र अंतर्गत सांगली घटक एक कारवाई

शुक्रवार, जानेवारी २४, २०२५

महाराष्ट्रात दोन यशस्वी सापळा कारवायामधे चार लाचखोर चतुर्भुज

 


By संजय चिखले

नांदेड,दि.२४-०१-२०२५: आज दिनांक २४ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील ॲंटी करप्शन‌ ब्युरो अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दोन युनिट द्वारे करण्यात आलेल्या दोन यशस्वी सापळा कारवाई मधे ४ लाचखोर आरोपी लोकसेवकांना रंगेहाथ पकडण्यात यश मिळाले आहे.धुळे युनिट द्वारे करण्यात आलेल्या यशस्वी सापळा कारवाईत महिला सरपंच व ग्रामसेवक तसेच भंडारा युनिट द्वारे करण्यात आलेल्या यशस्वी सापळा कारवाईत आजी माजी सरपंच जाळ्यात अडकले आहेत.

  1. नाशिक लाप्रवि परिक्षेत्र अंतर्गत धुळे घटक एक कारवाई
  2. नागपूर लाप्रवि परिक्षेत्र अंतर्गत भंडारा घटक एक कारवाई

आ.चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली शिवराज पाटील होटाळकरांसह अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश : अजित पवारांच्या उपस्थितीत मुंबईत रंगला पक्ष प्रवेश सोहळा

 


By संजय चिखले

मुंबई,दि.२३-०१-२०२५: लोहा - कंधार विधानसभा मतदारसंघाचे आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्यासह नायगाव विधानसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला . पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष जीवन पाटील घोगरे, माजी सभापती व्यंकटराव पाटील गोजेगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य विनायकराव पाटील मांजरमकर, मारोती वाडेकर, माधव पावडे, धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक पाटील वडजे, शिवराज पाटील गाडीवान, संजय पाटील शिंदे, गंगाजी पाटील मुगावकर, सटवाची मोदलवाड, श्रीपत पाटील शिंदे, माधव पाटील उपासे, शिवाजी पाटील पवार, बापूराव पाटील पवार, चंद्रकांत पाटील पवार, गणेश पाटील पवार, मनोहर पाटील हिवराळे, बालाजी पाटील, विलास पाटील धुपेकर, दत्तात्रय पाटील होटाळकर, भाऊराव पाटील पवार, देवराज पाटील पवार, गुरुराज पाटील पवार, चंद्रकांत पाटील पवार, जेजेराव पाटील पवार, राजू पाटील बावणे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत शिवराज पाटील होटाळकर आणि शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश झाल्यानंतर पक्ष वाढीसाठी आगामी काळात आपण निश्चितपणे चांगल्या पद्धतीने काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करत शिवराज पाटील होटाळकर यांच्यासह पक्षात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना अजितदादा पवार यांनी शुभेच्छा दिल्या.

तर नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद वाढून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठे यश मिळविण्यासाठी ताकतीने काम करू यासाठी शिवराज पाटील आणि त्यांची संपूर्ण टीमने जोमाने काम करेल असा विश्वास आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला.

गुरुवार, जानेवारी २३, २०२५

महाराष्ट्रात सहा यशस्वी सापळा कारवायामधे कनिष्ठ लिपिक(बीड),सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक(नांदेड),ग्रापं स्तरिय संगणक परिचालक(लातूर),नगर भूमापन अधिकारी (धुळे),उप अभियंता(रायगड),वरिष्ठ मुख्य लेखणिक(सोलापूर) असे सात लाचखोर चतुर्भुज

 

By संजय चिखले

नांदेड,दि.२३-०१-२०२५: आज दिनांक २३ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील ॲंटी करप्शन‌ ब्युरो अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वेगवेगळ्या युनिट द्वारे करण्यात आलेल्या सहा यशस्वी सापळा कारवाई मधे ७ लाचखोर आरोपी लोकसेवकांना रंगेहाथ पकडण्यात यश मिळाले आहे. त्यात

  1. छत्रपती संभाजीनगर लाप्रवि परिक्षेत्र अंतर्गत बीड घटक एक कारवाई
  2. नांदेड लाप्रवि परिक्षेत्र अंतर्गत नांदेड घटक एक कारवाई व लातूर घटक एक कारवाई
  3. नाशिक लाप्रवि परिक्षेत्र अंतर्गत धुळे घटक एक कारवाई
  4. ठाणे लाप्रवि परिक्षेत्र अंतर्गत रायगड अलिबाग घटक एक कारवाई
  5. पुणे लाप्रवि परिक्षेत्र अंतर्गत सोलापूर घटक एक कारवाई

Popular posts लोकप्रिय पोस्ट