🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

बुधवार, मे ०६, २०२६

नांदेड पोलिसांचे आवाहन: नियम पाळा, शहर वाहतूक सुरळीत ठेवा

 

नांदेड पोलीस वाहतूक नियम
अधिकृत प्रसिद्धी पत्रक, नांदेड पोलीस

संपादक: संजय पाटील चिखले

नांदेड,दि.०६/०५/२०२६:  शहरातील वाहतूक सुरळीत राहावी व नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी नांदेड जिल्हा पोलिसांकडून महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे.

रस्त्यावर कोणत्याही परिस्थितीत नो पार्किंगमध्ये दुचाकी, रिक्षा किंवा चारचाकी वाहने उभी करू नयेत, तसेच वाहतुकीला किंवा पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने हातगाड्या लावू नयेत. दुकानमालकांनीही शासकीय जागेत किंवा फुटपाथवर दुकानाचे बोर्ड ठेवू नयेत, याची विशेष खबरदारी घ्यावी.
शहरातील सर्व मॉल चालकांनी आपल्या ग्राहकांसाठी मॉलच्या आवारातच पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून द्यावी व त्यासाठी आवश्यक तेथे वॉचमन नेमावेत.
ऑटो रिक्षा चालकांसाठीही स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की, विना परमिट, फिटनेस किंवा इन्शुरन्स असलेली वाहने चालवू नयेत. तसेच रिक्षा चालवताना स्वच्छ व विहित गणवेश परिधान करावा व गणवेश नीटनेटका ठेवावा. रस्त्यावर अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने रिक्षा उभी करू नये. प्रवासी वाहतूक करताना नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. वरील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
तसेच सर्व नागरिक व वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करून शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन माननीय पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) श्री. रामेश्वर वेंजने व शहर वाहतूक शाखेचे सपोनि श्री. भागवत नागरगोजे यांनी ०४ मे रोजी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.

जनसंपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड

Popular posts लोकप्रिय पोस्ट