🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

रविवार, एप्रिल ०४, २०२१

रेमडेसविर,मेडिकल,ऑक्सीजनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई–अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे

 राज्यात केवळ सात दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामुळे सर्व रक्तपेढ्यांनी तसेच स्वयंसेवी संस्थांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून रक्तदान शिबिरे आयोजित करावी


मुंबई, दि. ४ एप्रिल : सध्या महाराष्ट्रात कोविडच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असून, संभाव्य वाढणाऱ्या रुग्णांचे हित लक्षात घेऊन मेडिकल ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिले. या संदर्भात रेमडेसिविर इंजेक्शनचे उत्पादक व मेडिकल ऑक्सीजन उत्पादक यांच्या प्रतिनिधींसमवेत बांद्रा येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात मंत्री श्री.शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे, रेमडेसिविर इंजेक्शन व मेडिकल ऑक्सिजनचे उत्पादक यांचे प्रतिनीधी तसेच अन्न व औषध प्रशासन, वैद्यकीय शिक्षण विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

राज्यात केवळ सात दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामुळे सर्व रक्तपेढ्यांनी तसेच स्वयंसेवी संस्थांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून रक्तदान शिबिरे आयोजित करावी, असे आवाहनही राजेंद्र शिंगणे यांनी यावेळी केले.

महाराष्ट्र राज्यासाठी जास्तीत जास्त रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा व मेडिकल ऑक्सिजनची उपलब्धता यांचे नियोजन करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या. सर्व उत्पादकांनी प्राधान्याने महाराष्ट्र राज्यासाठी औषधाचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिलेले असून, सध्या देखील सुमारे 50 ते ६० हजार इंजेक्शनचा साठा दररोज उपलब्ध होत आहे. त्यामुळे राज्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा फारसा तुटवडा नाही. राज्यात निर्माण होणाऱ्या ऑक्सीजन साठ्यापैकी 80 टक्के साठा हा वैद्यकीय वापरासाठी राखीव ठेवला आहे. महाराष्ट्र राज्यातील दररोजचे ऑक्सीजनचे उत्पादन 1250 मेट्रीक टन इतके असून त्यापैकी 700 टन साठा वैद्यकीय कारणासाठी वापरला जात आहे. तसेच आवश्यकता भासल्यास जेथे कोविड रुग्ण मोठया संख्येने नाहीत अशा राज्यामधुन देखील ऑक्सिजन प्राप्त करुन घेण्यासाठी प्रशासन स्तरावर चाचपणी सुरु आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन कोणत्याही रुग्णास मिळत नसल्यास अथवा त्यांचा काळाबाजार होत असल्यास त्या बाबतची माहिती त्यांनी संबंधित अन्न व औषध कार्यालयाच्या जिल्हा कार्यालयास अथवा प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. त्यांना औषध मिळवून देण्यास निश्चित मदत केली जाईल व काळाबाजार करणाऱ्या विरुध्द कडक कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत करण्यात आले आहे.

Tags: रेमडेसिविर

रेमडिसिवीर इंजेक्शन या औषधाच्या उपलब्धतेबाबत व वितरणाबाबत प्रेस नोट


कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय



जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय ) 

  • अर्थचक्राला धक्का नाही, श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी
  • सर्व प्रकारची वाहतूक सुरु मात्र गर्दीची ठिकाणे बंद
  • खासगी कार्यालयांना घरूनच काम
  • केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु
  • रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी
  • मुख्यमंत्र्यांचे सहकार्याचे आवाहन
  • विरोधी पक्षांनाही विश्वासात घेतले

मुंबई, दि 4 एप्रिल : कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंन्त याची अंमलबजावणी केली जाईल. हे निर्बंध लावतांना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. शेतीविषयक कामे , सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय झाला.

या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्बंधांचे काटेकोर पालन करण्यात सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करताना आपण विरोधी पक्षांशी देखील बोललो असून त्यांनी देखील याबाबत सहकार्य करण्याची तयारी दर्शविल्याचे सांगितले.   

यापुढे या आदेशांना मिशन बिगीन अगेन ऐवजी ब्रेक दि चेन असे संबोधण्यात येईल

यातील कोणत्या गोष्टी सुरु राहतील आणि कशावर निर्बंध राहील याची माहिती पुढीलप्रमाणे: 

 शेतीविषयक कामे सुरु

 शेती व शेतीविषयक कामे, अन्नधान्य व शेतमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीतपणे सुरू राहील. 

 रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी

राज्यात 144 कलम लागू केले जाईल. सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही.यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील.  

बागा, चौपाट्या, समुद्र किनारे आदी सार्वजनिक ठिकाणे रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील. दिवसा दिवसा या सार्वजनिक ठिकाणी लोकं आरोग्याचे नियम न पाळता गर्दी करीत आहेत असे लक्षात आले तर स्थानिक प्रशासन ते ठिकाण पूर्णपणे बंद करू शकते 

आवश्यक सेवेतील दुकानेच सुरु

किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा, 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील. अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच स्वत: व ग्राहकांकडून नियमांचे पालन होते किंवा नाही ते पाहावे 

सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच

सार्वजनिक व खासगी अशी सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच राहील. रिक्षांमध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सीमध्ये चालक आणि निश्चित केलेल्या प्रवाशांपैकी 50 टक्के प्रवासी प्रवास करू शकतील. 

सार्वजनिक व खासगी बसेसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही. आसनांवर बसलेल्या प्रवाशांनाच परवानगी आहे. प्रवाशांनी मास्क घातलेला हवा.  

बस चालक, वाहक व इतर कर्मचारी यांनी आपले लसीकरण पूर्ण करावे किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बाळगावे. बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वेमध्ये सर्वसाधारण डब्यात उभ्याने प्रवासी असू नयेत तसेच प्रवासी मास्क घालतील याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यायची आहे. 

वित्तीय सेवा सोडून इतर खासगी कार्यालये बंद

खासगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणे बंधनकारक राहील. केवळ बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार, अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज , पाणी पुरवठा करणारी कार्यालये मात्र सुरू राहतील

शासकीय कार्यालये- ५० टक्के उपस्थितीत

शासकीय कार्यालये जी थेट कोरोनाशी संबंधित नाहीत तेथील कर्मचारी उपस्थिती 50 टक्के मर्यादेपर्यंत राहील

शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश नसेल. आवश्यक असेल तर कार्यालय किंवा विभाग प्रमुखाचा प्रवेश पास लागेल. कार्यालयांतील बैठका ऑनलाईनद्वारे घ्याव्यात. केवळ कार्यालय परिसरातल्या कर्मचाऱ्यांना वैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल

मनोरंजन, सलून्स बंद

मनोरंजन व करमणुकीची स्थळे बंद राहतील. चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, व्हिडीओ पार्लर्स, क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क्स पूर्णपणे बंद राहतील. 

प्रार्थना स्थळे दर्शनार्थीसाठी बंद

सर्वधर्मीयांची स्थळे, प्रार्थना स्थळे बाहेरून येणारे भक्त व दर्शनार्थीसाठी बंद राहतील मात्र याठिकाणी काम करणारे कर्मचारी , पुजारी वगैरे यांना दैनंदिन पूजा अर्चा करता येईल. या कर्मचाऱ्यांचे लसीकरण देखील लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे  

उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद

उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद राहतील. पण उपाहारगृह एखाद्या हॉटेलचा भाग असेल तर ते तेथे राहणाऱ्या अभ्यागातासाठीच सुरू ठेवता येईल, बाहेरील व्यक्तीसाठी प्रवेश असणार नाही. मात्र टेक अवे किंवा पार्सलची सेवा सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहील

खाद्य विक्रेत्यांसाठी पार्सल सेवा

रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाद्य विक्रेत्यांना सकाळी ७ ते रात्री ८ केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल. पार्सलची वात पाहणाऱ्या ग्राहकांना सुरक्षित अंतर नियमांचे पालन करावे लागेल. मात्र नियमांचे पालन होत नाही असे दिसले तर स्थानिक प्रशासन ते पूर्णपणे बंद करता येईल

ई कॉमर्स सेवा सुरु

ई कॉमर्स सेवा नियमितपणे सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरूच राहील. होम डिलिव्हरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा त्या व्यक्तीस 1000 रुपये आणि संबधीत दुकान किंवा संस्थेस 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल

 सर्व कटिंग सलून्स, ब्युटी पार्लर्स, स्पा बंद राहतील. याठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी देखील लवकरात लवकर लसीकरण पूर करावे 


वृत्तपत्रे छपाई आणि वितरण सुरु

वृत्तपत्रे छपाई आणि वितरण नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात येईल मात्र विक्रेत्यांनी लसीकरण करून घ्यावे 

शाळा- महाविद्यालये बंद राहतील. मात्र 10 व १२ परीक्षांचा अपवाद असेल. सर्व खासगी क्लासेस बंद राहतील. 

उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरू

उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरूच राहील, मात्र याठिकाणी आरोग्याचे नियम पाळले गेलेच पाहिजेत याची काळजी व्यवस्थापनाने घ्यावी.

चित्रीकरण सुरु ठेवता येईल मात्र गर्दीचा समावेश असलेली चित्रीकरणे करू नये तसेच सर्व कर्मचारी व चित्रीकरण स्थळावरील लोकांची आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. 10 एप्रिलपासून याची अमलबजावणी होईल. 

 आजारी कामगाराला काढता येणार नाही

बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी मजूर, कामगारांनी राहणे गरजेचे आहे. केवळ साहित्याची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. कोणत्याही कामगारास कोविड झाला या कारणासाठी काढून टाकता येणार नाही. त्याला आजारी रजा द्यायची आहे. रजेच्या काळात त्याला पूर्ण पगार द्यावा लागेल कामगारांची आरोग्य तपासणी ठेकेदाराने करायची आहे

 तर सोसायटी मिनी कंटेन्मेंट

5 पेक्षा जास्त रुग्ण एखाद्या सोसायटीत आढळल्यास ती इमारत मिनी कंटेन्मेंट म्हणून घोषित करणार. तसा फलक लावणार , बाहेरच्या लोकांना प्रवेश बंदी.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेवर "अशोकराज" : विरोधी पॅनलचा केला दारुण पराभव, पण खा.चिखलीकरला धूळ चारण्यात अपयश

 नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत २१ पैकी १७ जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीच्या समर्थ सहकार पॅनलचे सर्व नेते, कार्यकर्ते व उमेदवारांचे अशोकराव चव्हाण यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. आज झालेल्या मतमोजणीत महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने 13, राष्ट्रवादी काँग्रेसने 3 तर शिवसेनेने 1 जागा जिंकून विरोधकांवर एकतर्फी मात केली आहे.

अशोक चव्हाणांकडून भाजपच्या पॅनेलचा धुव्वा, परंतु खा.चिखलीकरला धूळ चारण्यात अपयश

नांदेड, दिनांक 4 एप्रिल 2021 : नांदेड जिल्ह्यात मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी झालेल्या मतदानाची रविवारी मतमोजणी पार पडली असून अखेर जिल्हा बँकेवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे अखेर 'राज' आले असून 21 पैकी 17 जागा महाविकास आघाडीने मिळवत एकहाती सत्ता संपादित केली आहे. या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपाप्रणीत व खा. चिखलीकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनल चा पूर्ण धुव्वा उडाला असून केवळ चार जागांवर त्यांना समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे.परंतु चिखलीकर पिता-पुत्राचा पराभव करणे महत्त्वाचे होते,पण पिता-पुत्राचा पराभव करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला आहे.पराभव करता आला नाही हे नक्की.

             जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया आज पार पडली. 2 एप्रिल रोजी झालेल्या मतदानाचे आज रविवारी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या कक्षात मतमोजणी करण्यात आली यात अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत.

              अर्धापूर सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून महाआघाडीचे गोविंदराव शिंदे नागेलीकर हे अवघ्या एका मताने विजय झाले आहेत त्यांना 18 तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाप्रणित पॅनलचे गांधीजी पवार यांना 17 मते मिळाली आहेत. अर्धापूर मतदार संघातून बाबुराव कदम हे 23 मते घेऊन विजयी झाले आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी डॉ. लक्ष्मणराव इंगोले यांना केवळ एक मत पडले आहे. कंधार सेवा सहकारी संस्था मतदार संघातून प्रवीण पाटील चिखलीकर यांनी 16 मते घेत विजय मिळवला असून त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव पांडागळे यांचा पराभव केला आहे. पांडागळे यांना 8 मते मिळाली आहेत. लोहा सहकारी संस्था मतदारसंघातून भाजपचे खासदार तथा पॅनलचे प्रमुख प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सर्वाधिक 42 मते मिळवून विजयी संपादित केला आहे त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी ललिताबाई सूर्यवंशी यांचा पराभव केला आहे. सूर्यवंशी यांना केवळ 6 मते मिळाली आहेत. नायगाव सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण यांनी 28 मते मिळविली आहेत. तर गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांना 22 मते मिळाली आहेत. देगलूर मतदारसंघातून विजयसिंह देशमुख यांनी 34 मते घेऊन विजय मिळविला आहे. त्यांनी गोदावरीताई सुखावे यांचा पराभव केला आहे. सुगावे यांना 29 मते मिळाली आहेत. धर्माबाद सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून महाविकास आघाडीचे श्याम कदम हे विजयी झाले आहेत. त्यांना 4 मते पडली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी गफारबेग मिर्झा यांना 1 मत मिळाले आहे. उमरी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून माजी आ. बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे चिरंजीव कैलास देशमुख यांनी विजय मिळविला असून त्यांना 25 मते मिळाली आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे संदीप कवळे यांचा 4 मताने पराभव केला आहे. राठोड यांना 16 मते मिळाली आहेत.

            किनवट सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर दहिफळे यांनी 26 मते घेऊन विजय मिळविला आहे. त्यांनी भाजपाप्रणित पॅनलचे उमेदवार सुरेश रंगनेनवार यांचा पराभव केला आहे. रंगनेनवार यांना 16 मते मिळाली आहेत. माहूर मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदेवराव केशवे यांचे चिरंजीव राजेंद्र केशवे यांनी 13 मते घेऊन विजय मिळविला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार बंडू भुसारे यांना 7 मते मिळाली आहेत. सेवा सहकारी संस्था महिला नांदेड मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या संगीता पावडे यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी डॉक्टर शीला कदम यांचा पराभव केला आहे. पावडे यांना 537 तर डॉ. शीला कदम यांना 375 मते मिळाली आहेत. हिमायतनगर महिला राखीव मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार विजयाबाई शिंदे यांना 590 मते घेत अनुराधा पाटील यांचा पराभव केला.पाटील यांना 319 मते मिळाली आहेत. नागरी सहकारी बँक पतसंस्था मतदारसंघात भाजपाप्रणित पॅनलचे उमेदवार दिलीप कंदकुर्ते यांचा पराभव झाला असून या मतदार संघातून महाविकास आघाडीचे शिवराम लुटे हे 105 मते घेऊन विजयी झाले आहेत. इतर सहकारी संस्था मतदारसंघातून जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष मोहनराव पाटील टाकळीकर यांनी 178 मते मिळवून विजय मिळविला आहे.येथे त्यांचे प्रतिस्पर्धी व्यंकटेश जिंदम यांनी मतदानाच्या दोन दिवस अगोदर टाकळी कर यांना आपला पाठिंबा दिला होता तरीही जिंदम यांना 18 मते मिळाली आहेत अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून महा विकास आघाडीच्या सविता मुसळे या 566 मध्ये घेऊन विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाप्रणित पॅनलचे उमेदवार लक्ष्मणराव ठक्करवाड यांचा पराभव केला आहे. ठक्करवाड यांना 319 मते मिळाली आहेत. इतर मागासवर्गीय मतदारसंघातून महा विकास आघाडीचे हरीहरराव भोसीकर हे सर्वाधिक 707 मते घेऊन विजयी झाले आहेत. त्यांनी उमाकांत गोपछडे यांचा पराभव केला आहे.गोपछडे यांना 203 मते मिळाली आहेत.

         भटक्या विमुक्त जाती-जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातून महा विकास आघाडीचे व्यंकटराव जाळणे हे विजयी झाले असून त्यांना 639 मते मिळाली आहेत.त्यांनी भाजपाप्रणित पॅनलचे अगड्मदास शिनगारे यांचा पराभव केला आहे.शिंगारे यांना 269 मते मिळाली आहेत. एकंदरीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक 13 जागा मिळविलेल्या आहेत, तर मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने 3 जागा व शिवसेना 1 जागा मिळविली आहे. 21 पैकी 17 जागा महा विकास आघाडीने मिळविलेल्या असून जिल्हा बँकेवर निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे.दरम्यान भाजपाचे माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर हे यापूर्वी बिनविरोध निवडून आले आहेत.आज झालेल्या मतमोजणीत चिखलीकर पिता-पुत्र आणि माजी आ.गोरठेकर यांचे चिरंजीव कैलास असे 3 जण विजयी झाले आहेत.भाजपाप्रणीत पॅनलला या निवडणुकीत केवळ 4 जागा मिळालेल्या आहेत.

नांदेड जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचा धुव्वा
अशोक चव्हाण म्हणतात…
बॅंकेला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व संचालक प्रामाणिक प्रयत्न करतील, याची मला खात्री आहे" असं अशोक चव्हाण म्हणाले.

“बॅंकेला गतवैभव प्राप्त होईल”

“समर्थ सहकार पॅनलला विजयी करणाऱ्या जिल्हा बॅंकेच्या सर्व सभासदांचेही मी आभार मानतो. जिल्हा बॅंकेच्या मतदारांनी महाविकास आघाडीवर मोठा विश्वास दाखवला आहे. त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवून शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्यांच्या या बॅंकेला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व संचालक प्रामाणिक प्रयत्न करतील, याची मला खात्री आहे” असं अशोक चव्हाण म्हणाले.

“एकाधिकारशाहीमुळे संस्थेची वाताहत”

“जिल्हा बॅंकेची परिस्थिती आज काय आहे, ते लपून राहिलेले नाही. मागील काही वर्षात एकाधिकारशाहीमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेल्या या संस्थेची वाताहत झाली आहे. ही बॅंक वाचवण्यासाठी मी राज्य सरकारच्या माध्यमातून 100 कोटी रुपयांचे अनुदानही मिळवून दिले. पण बॅंकेला चांगल्या परिस्थितीत आणण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज असून, महाविकास आघाडीच्या समर्थ सहकार पॅनलचे नवनिर्वाचित संचालक त्या दिशेने पराकाष्ठा करतील” असा विश्वास अशोक चव्हाणांनी व्यक्त केला.

कोरोनाची परिस्थिती आणि ज्येष्ठ नेते गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचे निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर कोणीही जल्लोष करुन नये, असे आवाहन चव्हाणांनी सर्व उमेदवार आणि विजयाच्या शिलेदारांना केले.

चिखलीकर जिंकले, पण पॅनल पराभूत

लोहा मतदारसंघातून भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर विजयी झाले, तर कंधार मतदारसंघातून त्यांचे पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर यांनीही बाजी मारली. अशोक चव्हाण आणि प्रतापराव चिखलीकर लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा आमनेसामने आल्याने दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र यावेळी चव्हाणांनी बाजी मारत लोकसभेच्या पराभवाचा वचपा काढला.

दुसरीकडे, भाजप नेते बापूसाहेब गोरठेकर यांच्या उमरी मतदारसंघात भाजप उमेदवाराने अवघ्या तीन मतांनी निसटता विजय मिळवला. बिलोली मतदारसंघातून भाजपचे भास्करराव पाटील खतगावकर बिनविरोध विजयी झाले होते.

गोरठेकरांच्या मतदारसंघात निसटता विजय

भाजप नेते बापूसाहेब (श्रीनिवास) गोरठेकर यांचे कट्टर समर्थक राहिलेल्या कवळे पितापुत्रांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कवळे गुरुजी या नावाने जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले मारोती कवळे यांचे पुत्र संदीप उमरी मतदारसंघातून नांदेड जिल्हा बँकेच्या रिंगणात उतरले होते.

भाजप नेते बापूसाहेब गोरठेकर यांची उमरी तालुक्यात मजबूत पकड आहे. परंतु मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या पाठिंब्यावर उमरीत भाजपचा धुव्वा उडवण्याचा निर्धार कवळेंनी व्यक्त केला होता. परंतु त्यांना विजय मिळवता आला नाही. याआधी विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाणांनी गोरठेकरांना पराभवाची धूळ चारली होती. मात्र गोरठेकर आपल्या उमेदवाराच्या माध्यमातून विधानसभेच्या पराभवाचा वचपा काढला.


Popular posts लोकप्रिय पोस्ट