मरवाळी येथे 'विकसित भारत – जी राम जी' ग्रामीण रोजगार हमी अभियानाचा शुभारंभ
![]() |
| VB-G RAM G योजना |
मनरेगा ऐवजी नवा ग्रामीण रोजगार हमी कायदा; १२५ दिवस रोजगार, सुधारित मजुरी व डिजिटल पारदर्शकतेवर भर
मरवाळी (ता. नायगाव, जि. नांदेड), दि. २ जुलै : ग्रामपंचायत मरवाळी/कोपरा येथे गुरुवारी 'विकसित भारत – जी राम जी (VB-G RAM G – विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन-ग्रामीण)' ग्रामीण रोजगार हमी अभियानाचा शुभारंभ व जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमात ग्रामीण रोजगार हमीच्या नव्या कायद्याच्या तरतुदी, लाभार्थ्यांचे अधिकार, रोजगाराची प्रक्रिया, ग्रामपंचायतीची भूमिका आणि ग्रामीण विकासातील लोकसहभाग याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
अभियंता जाधव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, VB-G RAM G हा केंद्र सरकारचा ग्रामीण रोजगार हमी विषयक नवा कायदा असून, १ जुलै २०२६ पासून देशभर लागू करण्यात आला आहे. या कायद्यामुळे पूर्वीच्या मनरेगा (MGNREGA) योजनेऐवजी पात्र ग्रामीण कुटुंबांना आता दरवर्षी १२५ दिवसांच्या हमी रोजगाराचा कायदेशीर अधिकार प्राप्त झाला आहे.
या नव्या कायद्यानुसार रोजगार हमीचा कालावधी १०० दिवसांवरून १२५ दिवसांपर्यंत वाढविण्यात आला असून, महागाईचा विचार करून मजुरी दरांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. मजुरीवरील खर्चाची जबाबदारी बहुतांश राज्यांमध्ये केंद्र सरकार ६० टक्के व राज्य सरकार ४० टक्के या प्रमाणात उचलणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
जाधव यांनी पुढे सांगितले की, रोजगाराची मागणी करूनही नियोजित कालावधीत काम उपलब्ध न झाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद कायम ठेवण्यात आली आहे. तसेच मजुरीचे देयक वेळेत न मिळाल्यास विलंब भरपाई देण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्यामुळे कामगारांच्या हक्कांचे संरक्षण अधिक प्रभावीपणे होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गाढे यांनी योजनेअंतर्गत कामगारांची नोंदणी, डिजिटल उपस्थिती, कामांचे नियोजन, निधी व्यवस्थापन आणि मजुरी थेट बँक खात्यात जमा करण्यासाठी आधुनिक डिजिटल प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे पारदर्शकता वाढून गैरव्यवहाराला आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
याशिवाय जलसुरक्षा, जलसंधारण, वृक्षलागवड, शेततळे, सिंचन सुविधा, ग्रामीण पायाभूत सुविधा आणि कायमस्वरूपी सार्वजनिक मालमत्ता निर्मितीवर विशेष भर देण्यात येणार असून, ग्रामसभेच्या माध्यमातून गावाचा विकास आराखडा तयार करून स्थानिक गरजांनुसार कामांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगितले.
यावेळी वैयक्तिक लाभाच्या कामांबाबत, शेतकऱ्यांसाठी उपलब्ध विविध योजनांबाबत तसेच रोजगार हमी कायद्यांतर्गत मिळणाऱ्या लाभांबाबत उपस्थितांच्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले. अधिकाधिक पात्र नागरिकांनी ग्रामपंचायतीमार्फत रोजगाराची मागणी नोंदवून या कायद्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
१ जुलै २०२६ पासून VB-G RAM G ग्रामीण रोजगार हमी कायदा लागू.
१. १२५ दिवसांची रोजगार हमी :
पूर्वीच्या मनरेगा योजनेतील १०० दिवसांच्या रोजगार हमीऐवजी आता पात्र कुटुंबांना वर्षातून १२५ दिवस रोजगाराची हमी देण्यात आली आहे.
२. सुधारित मजुरी दर :
महागाई निर्देशांकाचा विचार करून मजुरी दरांमध्ये सुधारणा करण्यात आली असून, ग्रामीण मजुरांच्या उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा आहे.
३. केंद्र-राज्य खर्च वाटणी :
मजुरीवरील खर्चाची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये विभागण्यात आली आहे. बहुतांश राज्यांसाठी केंद्र सरकार ६० टक्के, तर राज्य सरकार ४० टक्के खर्च उचलणार आहे.
४. डिजिटल पारदर्शकता :
कामगारांची नोंदणी, डिजिटल उपस्थिती, कामांचे नियोजन, निधी व्यवस्थापन आणि थेट बँक खात्यात मजुरी जमा करण्यासाठी आधुनिक डिजिटल प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. यामुळे पारदर्शकता वाढून गैरव्यवहाराला आळा बसण्यास मदत होईल.
५. उत्पादक आणि शाश्वत विकासावर भर :
या कायद्यांतर्गत केवळ रोजगार उपलब्ध करून देण्यावरच नव्हे, तर जलसुरक्षा, ग्रामीण पायाभूत सुविधा, आजीविका विकास आणि हवामान बदलाशी सुसंगत विकासकामांना प्राधान्य देण्यात आले आहे. गावांच्या विकास आराखड्यानुसार कायमस्वरूपी सार्वजनिक मालमत्ता निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
६. ग्रामीण विकासाला चालना :
ग्रामपंचायत-केंद्रित नियोजन, माहिती-आधारित निर्णयप्रक्रिया आणि तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम, उत्पादक आणि स्वावलंबी करण्याचे उद्दिष्ट या कायद्यामागे आहे.
कार्यक्रमास पंचायत समिती नायगावच्या नरेगा विभागाचे कार्यक्रम अधिकारी श्री. कदम, श्री. रानवळकर, श्री. सूर्यवंशी, अभियंता संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष श्री. जाधव, श्री. गाढे, श्री. कुरे, सहायक कृषी अधिकारी श्री. गुंडे, ऑपरेटर श्री. शिंदे, श्री. डोंगावे, सरपंच प्रतिनिधी श्री. केशवराव आनंदराव पवळे, नव्याने रुजू झालेले ग्रामपंचायत अधिकारी श्री. शिंदे, ग्रामरोजगार सहाय्यक राजकुमार वाघमारे, ग्रामपंचायत कर्मचारी, शेतकरी, मजूर व विविध लाभार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी श्री. शिंदे यांनी केले, तर आभार सरपंच प्रतिनिधी श्री. केशवराव आनंदराव पवळे यांनी मानले.
विशेष
महिला सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायतीतील एकही महिला व पुरुष सदस्य कार्यक्रमाच्या समूह छायाचित्रात दिसून आले नाहीत.
याबाबत संबंधित लोकप्रतिनिधीच्या अनुपस्थितीचे कारण समजू शकले नाही.
दरम्यान, कार्यक्रमास ग्रामस्थांची उपस्थिती अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे दिसून आले. या नव्या ग्रामीण रोजगार हमी कायद्याबाबत सर्वसामान्यांमध्ये अधिक जागृती व्हावी, यासाठी गावागावांत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याची आवश्यकता असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


टिप्पण्या