SIR मोहिमेत जिल्हाधिकाऱ्यांपासून तहसीलदारांपर्यंत घरभेटींवर भर;नायगाव तालुक्यात आढावा ग्रामपंचायत कार्यालयापुरताच मर्यादित? तलाठी, बीएलओंकडून माहिती मिळण्यात अडचणी
![]() |
मरवाळी,दि.०६/०७: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (SIR-2026) मोहिमेत जिल्हा प्रशासनाकडून व्यापक जनजागृती केली जात आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी "एकही पात्र मतदार वंचित राहू नये" यासाठी नागरिकांनी बीएलओंना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा माहिती कार्यालयामार्फत प्रसिद्धीपत्रके, व्हिडिओ, ECINET ॲप, मतदार पडताळणीची माहिती आणि वेळापत्रक,गृह भेटीची माहिती सातत्याने प्रसिद्ध करण्यात येत आहे.
याच मोहिमेअंतर्गत नायगाव तालुक्यातील मरवाळी गावात तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी आढावा बैठक घेतल्याची माहिती समोर आली. मात्र, या भेटीच्या निमित्ताने स्थानिक पातळीवरील बीएलओ,तलाठी व संबंधित कर्मचारी कडून मोहीमेची व्यापक जनजागृती, समन्वय आणि तहसीलदारांच्या प्रत्यक्ष गृहभेटी बाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
SIR मोहिमेच्या जनजागृतीवर प्रश्न; तलाठी, बीएलओंकडून माहिती मिळण्यात अडचणी
तहसीलदार गावात आल्याचे समजल्यानंतर संबंधित तलाठी व कर्मचाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या संवादात संबंधित कर्मचाऱ्यांनी, "मला याबाबत काही माहिती नाही. मी आधीच गावात आलो होतो. तहसीलदार मॅडम येणार असल्याबाबत कुणाचा फोन किंवा मेसेज मिळाला नव्हता," असा आशय व्यक्त केल्याचा दावा करण्यात आला आहे.
तलाठयाशी झालेल्या दूरध्वनी संभाषणात SIR मोहिमेबाबत माहिती विचारली असता बीएलओमार्फत गावातील ग्रुपवर पाठवण्यात आल्याचे ही सांगण्यात आले. मात्र, पत्रकारांकडून ग्रामीण नागरिकांपर्यंत ही माहिती प्रत्यक्षात पोहोचली नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. संभाषणाच्या शेवटी भविष्यात अशा प्रकारची माहिती वेळेवर देण्याचे आश्वासन संबंधित तलाठ्यांनी दिल्याचे सांगण्यात आले
मरवाळी मधील दोन्ही बीएलओ शी फोनवर संपर्क साधला असता एकाने मी आताच मरवाळी येऊन जेवण करण्यासाठी गडगा येथे आलो आहे असे सांगण्यात आले, व्हाट्सअप मेसेज करुन विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहीम २०२६ संदर्भात वरिष्ठ स्तरावरून प्राप्त अधिकृत माहिती पाठवण्याची विनंती केली असता यादी pdf नाही साहेब ऑफलाईन आहे असे प्रतिउत्तर मिळाले म्हणजे माहिती मागितली मोहीमेशी निगडित आणि प्रतिउत्तर मिळाले यादी ऑफलाईन आहे गजब का लॉजिक.
दुसऱ्या बीएलओ ला याच मोहीमेची माहिती पाठवा म्हणून फोन केला असता या महाशयांनी तर अकलेचे तारे तोडले. तुम्ही पत्रकार आहात तुम्हाला सगळी माहिती असते असे उत्तर मिळाले, व्हाट्सअप मेसेज केला असता मेसेज उघडून ही पाहण्यात आले नाही
ग्रामपंचायतीच्या सहभागावरही प्रश्नचिन्ह
उपलब्ध छायाचित्रांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयात बैठक दिसत असली, तरी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला लोकप्रतिनिधी आणि गावातील इतर सामाजिक घटकांचा व्यापक सहभाग स्पष्टपणे दिसून येत नाही. मतदार यादी पुनरीक्षणासारख्या महत्त्वाच्या मोहिमेत स्थानिक स्वराज्य संस्थांचा सक्रिय सहभाग अपेक्षित असताना तो कितपत होता, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, मरवाळी येथील भेटीदरम्यान ग्रामपंचायत कार्यालयातील आढावा बैठकीची माहिती समोर आली. मात्र, तहसीलदारांनी प्रत्यक्ष नागरिकांच्या घरी जाऊन पडताळणी केल्याचे, कोणत्याही मतदाराचा गणना फॉर्म स्वतः भरल्याचे किंवा बीएलओंच्या घरभेटीची प्रत्यक्ष पाहणी केल्याचे छायाचित्र, व्हिडिओ अथवा अधिकृत नोंद उपलब्ध झालेली नाही.
उत्तरांची प्रतीक्षा असलेले प्रश्न
या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये पुढील प्रश्न उपस्थित होत आहेत—
नायगाव तालुक्यात ३० जूनपासून किती घरभेटी पूर्ण झाल्या?
मरवाळी येथे तहसीलदारांनी प्रत्यक्ष किती घरांना भेट दिली?
कोणत्या मतदाराचा गणना फॉर्म स्वतः भरला?
गृहभेटींची अधिकृत छायाचित्रे किंवा व्हिडिओ उपलब्ध आहेत का?
बीएलओंच्या घरभेटीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली का?
ग्रामपंचायत पदाधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींना पूर्वसूचना देण्यात आली होती का?
संबंधित तलाठी, बीएलओ आणि ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचाऱ्यांना वेळेवर सूचना देण्यात आल्या होत्या का?
नागरिकांपर्यंत मोहिमेची माहिती पोहोचविण्यासाठी नेमके कोणते प्रयत्न करण्यात आले?
जर प्रत्यक्ष पडताळणी झाली असेल, तर त्याबाबतचे पुरावे प्रशासन सार्वजनिक करणार का?
जिल्हा माहिती कार्यालयाच्या ब्लॉग वरील माहिती आणि नायगाव तालुक्यातील परिस्थिती
आतापर्यंत जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्ध झालेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकांमध्ये—
४ जुलै रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी धर्माबाद तालुक्यातील सालेगाव येथे प्रत्यक्ष पाहणी केल्याचे,
५ जुलै रोजी स्वतः गणनापत्र भरल्याचे,
धर्माबादच्या तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी राजापूर व येताळा येथे नागरिकांच्या घरी जाऊन गणनापत्र भरल्याचे,
नांदेड दक्षिणचे तहसीलदार संजय वारकड यांनी मनियार गल्ली येथे नागरिकांच्या घरी जाऊन गणनापत्र भरून डिजिटायझेशनची खात्री केल्याचे तपशीलवार नमूद करण्यात आले आहे.
लोकशाहीचा पाया म्हणजे माहितीचा अधिकार
विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेचे उद्दिष्ट "एकही पात्र मतदार वंचित राहू नये" हे आहे. मात्र हे उद्दिष्ट केवळ प्रसिद्धीपत्रके, पोस्टर्स किंवा समाजमाध्यमांवरील संदेशांमुळे साध्य होणार नाही. प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकापर्यंत प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, घरभेटीचे वेळापत्रक आणि पडताळणीची माहिती स्पष्टपणे पोहोचणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे जिल्हा माहिती कार्यालयाच्या ब्लॉगवर इतर तालुक्यांतील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रभेटी, गणना फॉर्म भरणे आणि बीएलओंच्या कामाची पाहणी केल्याचे तपशीलवार नमूद करण्यात आले आहेत. मात्र, नायगाव तालुक्यात मरवाळीतील आढावा बैठकीव्यतिरिक्त इतर गावांमध्ये अशा प्रत्यक्ष गृहभेटींची माहिती उपलब्ध झालेली दिसून येत नाही.
यामुळे आणखी एक प्रश्न उपस्थित होतो—जर मरवाळीसारख्या गावातच समन्वय, जनजागृती आणि गृहभेटींबाबत इतके प्रश्न उपस्थित होत असतील, तर तालुक्यातील इतर मंडळांमध्ये प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे?
मतदार यादी पुनरीक्षणासारख्या लोकशाहीशी थेट संबंधित मोहिमेत माहितीचा अधिकार हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. "एकही पात्र मतदार वंचित राहू नये" हे उद्दिष्ट केवळ प्रसिद्धीपत्रके, पोस्टर्स किंवा समाजमाध्यमांवरील संदेशांनी साध्य होणार नाही. त्यासाठी प्रत्येक नागरिकापर्यंत वेळेवर, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती पोहोचणे आवश्यक आहे.
स्वजनगणनेच्या वेळी असाच प्रकार घडला होता, तळागाळातील जनतेपर्यंत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय तसेच जिल्हा माहिती कार्यालयाच्या ब्लॉगवर दिली जानारी रोजची रोज माहिती संबंधितांमार्फत वंचित घटकांपर्यंत पोहचत नाही हे मोठ्या खेदाने सांगावे लागत आहे, त्यामुळे जिल्हाधिकारी व विविध विभागातील वरिष्ठांनी याकडे विशेष लक्ष घालण्याची मागणी होत आहे
या पार्श्वभूमीवर नायगाव तालुक्यातील एसआयआर चा घेतलेला आढावा, स्थानिक समन्वय, गृहभेटींची अंमलबजावणी आणि ग्रामपंचायतीचा सहभाग, तलाठी बीएलओ मार्फत नागरिकांपर्यंत मोहीमेची माहिती पोहोचविण्याच्या प्रक्रियेबाबत प्रशासनाने अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


टिप्पण्या