नायगाव/मरवाळी,दि २६ नोव्हेंबर २०२१ : ग्रा.पं. कार्यालय मरवाळी/कोपरा येथे दिनांक 26/11/2021 रोजी सकाळी 11 वाजता संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.घटनातज्ञ मसुदा समितीचे अध्यक्ष,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले,त्यानंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
या वेळी गावातील सर्व जाती धर्माचे नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.विशेष म्हणजे गावातील महिलांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
संविधानाबद्दल जनजागृती
२६ नोव्हेंबर १९४९ आणि २६ जानेवारी १९५०.... भारताच्या इतिहासातील महत्त्वाचे दोन दिवस. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीनं भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला तर २६ जानेवारी १९५० रोजी तिची अंमलबजावणी करण्यात आली . त्यानंतर भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून अस्तित्वात आलं. त्यामुळं या दिवसाचं महत्त्व लक्षात घेऊन '२६ नोव्हेंबर' हा संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
भारतीय संविधानाबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी व सर्व नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी या करीता संविधान दिनाच्या निमित्ताने ग्रामसेवक निलेश कुलकर्णी यांनी गावातील उपस्थित नागरिकांना संविधानाची महती पटवून सांगिताना ते म्हणाले की,हा दिवस भारतासाठी खूपच महत्वाचा दिवस आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण संविधानाचा स्वीकार केला होता. त्यामुळे या दिवशी म्हणजेच 26 नोव्हेंबरला संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू झाले.संविधानामुळे भारतीय नागरिकांना आपले हक्क आणि अधिकार मिळाले. या संविधानामुळे आपल्याला स्वतंत्र देशातील स्वतंत्र नागरिक असल्याची भावना निर्माण होते. संविधानात दिलेले मुलभूत अधिकार आपली ढाल बनून आपल्याला हक्क देतात. त्याचप्रमाणे यामध्ये दिलेल्या मुलभूत कर्तव्य आपल्याला जबाबदारीची जाणीव करुन देतात.
भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. संविधानामध्ये आपल्या देशातील नागरिकांचे मुलभूत अधिकार, कर्तव्य, सरकारची भूमिका,राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे अधिकार लिहिले आहेत. आपल्या देशात राहणाऱ्या सर्व धर्माच्या लोकांमध्ये एकता, समानता असावी आणि सर्व लोकांना कोणताही भेदभाव न करता त्यांचे हक्क मिळावेत यासाठी संविधान तयार करण्यात आले होते. त्याचप्रमाणे विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिकेचे काय काम आहे ? देश चालवताना त्यांची काय भूमिका आहे ? या सर्व गोष्टी संविधानात नमूद केल्या गेल्या आहेत. भारतीय संविधान तयार करण्यासाठी 2 वर्षे 11 महिने 18 दिवसांचा कालावधी लागला होता. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान लिहून पूर्ण झाले होते.२६ जानेवारी १९५० पासून संविधान लागू करण्यात आले.भारतीय संविधानाची मूळ प्रत 16 इंच रुंद आहे. तर 33 इंच लांब चर्मपत्र पानावर लिहिले आहे.अशाप्रकारे संविधानाविषयी विस्तृतपणे माहिती सांगितली.
मरवाळी/कोपरा ग्रामपंचायतीची १० जानेवारी २०२१ रोजी मुदत संपली आहे.तेव्हापासून प्रशासक नेमण्यात आले आहे.सरपंचाचा कार्यकाळ संपल्यामुळे येथील ग्रामपंचायतीची सर्व जबाबदारी ही ग्रामसेवक यांच्यावर आली आहे.
या प्रसंगी ग्रामपंचायत कार्यालयाचे अव्वल कारकून, रोजगार सेवक,ग्रा.प सेवक,ग्रामपंचायत स्तरीय आपले सरकार सेवा केंद्राचे संगणक परीचालक हे सर्व जन उपस्थित होते.
| २६ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांना भारतीय राज्यघटनेचा अंतिम मसुदा सादर करताना मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर. |
| मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर,मसुदा समितीच्या अन्य सदस्यांसह. |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा