नवी दिल्ली - 3 सप्टेंबर २०२१ : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्रकार कल्याण योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयाने वरिष्ठ पत्रकार आणि प्रसारभारतीचे सदस्य अशोक कुमार टंडन यांच्या नेतृत्वाखाली एक दहा सदस्यीय समिती नियुक्त केली आहे.ही समिती या योजनेसाठी सध्या असलेल्या मार्गदर्शक तत्वांचा आढावा घेणार असून, त्यात बदल करण्यासाठी आवश्यक त्या शिफारसी सूचवणार आहे. पत्रकारीतेच्या क्षेत्रात, अलीकडच्या काळात बदललेली परिस्थिती तसेच कोविड-19 मुळे अनेक पत्रकारांचा झालेला मृत्यू या सगळ्या पार्श्वभूमीवर, हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.
पत्रकार कल्याण योजना गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात असून त्याचे निकष आणि मार्गदर्शक तत्वामध्ये बदल करण्याची गरज आहे. त्याशिवाय, अधिस्वीकृतीधारक असलेल्या व नसलेल्या पत्रकारांना या कल्याणकारी योजनेत समानतेने बघण्याची गरज असून, त्यांनाही या योजनेचे लाभ मिळवून देणे महत्वाचे आहे.
ही समिती येत्या दोन महिन्यात आपला अहवाल देणार आहे.तिच्या शिफारसींच्या आधारावर जास्तीत जास्त पत्रकारांना लाभ मिळू शकेल, अशा रीतीने नवी मार्गदर्शक तत्वे तयार करणे सरकारला शक्य होईल.अशोक टंडन यांच्या नेतृत्वाखालील या समितीत, द वीक चे निवासी संपादक, सच्चिदानंद मूर्ती, मुक्त पत्रकार शेखर अय्यर, न्यूज 18 चे अमिताभ सिन्हा, बिझनेस लाईन चे शिशिर कुमार सिन्हा, झी न्यूजचे विशेष प्रतिनिधि रवींद्र कुमार, पांचजन्यचे संपादक हितेष शंकर, हिंदुस्थान टाइम्स च्या स्मृति काक रामचंद्रन, टाइम्स नाऊचे अमित कुमार, इकॉनॉमिक टाइम्सच्या वसुधा वेणुगोपाल, आणि पत्रसूचना कार्यालयाच्या अतिरिक्त महा संचालक श्रीमती कांचन प्रसाद या सदस्यांचा समावेश आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा