![]() |
| फरार संतोष वेणीकर |
परभणी : राज्यभरात गाजत असलेल्या कृष्णूर धान्य घोटाळ्यात गेल्या दोन वर्षापासून फरार असलेल्या नांदेड येथील तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर हा काही दिवसापूर्वी अचानक परभणी येथील भूसंपादन कार्यालयात रुजू झाला होता. परंतु ईडीच्या कारवाईची कुणकुण लागल्यानंतर त्याने कार्यालयाला दांडी मारली. रजा किंवा पूर्वकल्पना न देता तो कार्यालयात गैरहजर असल्यामुळे आता परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांला कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे.
नांदेडातील कृष्णूर एमआयडीसीत असलेल्या इंडिया मेगा अॅग्रो अनाज कंपनीत शासकीय धान्याची विल्हेवाट लावण्यात आली होती. या प्रकरणाचा पोलिसांनी भांडाफोड केला होता. त्यानंतर इंडिया मेगाच्या मालकासह एकूण १९ जणांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी आरोपीमध्ये सहभाग असलेल्या तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. पुढे औरंगाबाद उच्च न्यायालयातही वेणीकरला दिलासा मिळाला नाही. त्यानंतर तो फरार झाला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असलेल्या सीआयडीला वेणीकरला पकडण्यात यश आले नाही. त्यातच फरारी असताना काही दिवसापूर्वी वेणीकर हा परभणी येथील भूसंपादन कार्यालयात अचानक रुजू झाला होता. परंतु याबाबत सीआयडीला खबर नव्हती हे विशेष.
धान्य घोटाळ्यात ईडीने एन्ट्री घेत.. इंडिया मेगाचा मालक अजय बाहेती याला अटक केली. त्याच्या अटकेच्या दोन दिवसापूर्वीच वेणीकर हा कार्यालयातून गायब झाला. याबाबत त्याने परभणी जिल्हाधिकारी यांनाही कळविले नव्हते.वेणीकर तेंव्हापासून रजा न घेताच कार्यालयात आला नाही.त्यामुळे आता परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी त्याला कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. नोटिसीचे समाधानकारक उत्तर न दिल्यास वेणीकरवर कारवाई करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे सीआयडीही त्याच्या मागावर आहेत.
गतवर्षी नांदेडमध्ये उघड झालेल्या धान्य घोटाळ्याचा तपास आता ईडी करतेय. कृष्णुर इथे उघडकीस आलेल्या या धान्य घोटाळ्यातील आरोपी अजय बाहेती याला ईडीने अटक केली आहे.त्यानंतर आता नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात खळबळ उडाली. याच घोटाळ्यातील आरोपी असलेला नांदेडचा तत्कालीन उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर पुन्हा गायब झाला आहेत. सध्या परभणी इथे कार्यरत असलेल्या वेणीकर याला तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी हजर होण्याची नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे ईडीच्या भीतीमुळे या घोटाळ्यातील अनेक जण भूमिगत झाले आहेत.
ईडीचा वापर केंद्र सरकार नेहमी विरोधकांना नामोहरम करण्यासाठी करते असा आरोप नेहमीच होत असतो. मात्र ईडीने नांदेडच्या धान्य घोटाळ्यात लक्ष घातल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. गोरगरिबांसाठी मोफत आणि स्वस्त दरात दिलं जाणारे धान्य काळ्या बाजारात विकल्याचा हा घोटाळा आहे.
काय आहे हा नेमका घोटाळा..?
2018 च्या जुलै मध्ये राज्यातील सर्वात मोठा शासकीय धान्य घोटाळा नांदेडमध्ये उघड झाला. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी हा घोटाळा उघडकीस आणला होता. या धान्य घोटाळ्यात जिल्ह्य़ातील बडे राजकीय मंडळी, व्यापारी आणि महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हाथ असल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. गोर गरीबांच्या तोंडचा घास पळवणारे मोठे रॅकेट नांदेडमध्ये कार्यरत असल्याचे यात उघड झालं. पोलीसांनी या कारवाईत दहा ट्रकसह एक कोटी 80 लाखांचे धान्य जप्त करुन गुन्हे दाखल केले होते. या धान्य घोटाळ्याची व्याप्ती एवढी मोठी आहे की पारदर्शक चौकशी झाली तर अनेक बडे मासे तुरुंगात जातील अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
दरम्यान, जिल्हा पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मीना यांनी तपास अधिकारी म्हणून आयपीएस असलेले नरुल हसन यांची नियुक्ती केली होती. पोलिसांनी कारवाईची माहिती आम्हाला दिली नसल्याचा कांगावा महसूलचे अधिकारी करतायत. आपलं काही पितळ उघड पडेल या भीतीने महसूलचे अधिकारी माध्यमांशी बोलण्याचे टाळले होते. मात्र पोलिसांनी याच धान्य घोटाळ्याच्या संदर्भातला तेरा पानाचा अहवाल महसुल आयुक्ताकडे सादर केला होता.
गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या या धान्य घोटाळ्याच्या मुळाशी जाऊन बिंग फोडण्याचे धाडस आजतागायत कुणीही दाखवलं नव्हतं….मात्र, आता या प्रकरणाचा तपास आयपीएस दर्जाच्या अधिका-याकडे दिल्याने पोलीस या घोटाळ्याच्या मुळापर्यंत पोहोचले होते.
सीआयडी नंतर आता थेट ईडी
नांदेडच्या या धान्य घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे सीआयडीकडे हा तपास देण्यात आला. मात्र या घोटाळ्यातील आरोपी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर हा उजागरपणे फिरत असताना त्याला सीआयडी अटक करू शकली नाही. त्यातच या घोटाळ्यातील बहुतांश आरोपींचा जामीन झाला होता आणि या मंडळींनी पुन्हा आपला हाच धंदा सुरू ही केला होता. मात्र अचानकपणे गत आठवड्यात ईडीने या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी अजय बाहेती ला अटक केलीय. दुसरीकडे गायब असलेला उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर याला हजर होण्यासाठी परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुंगळीकर यांनी नोटीस बजावली आहे. तर या धान्य घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने ईडी आता या प्रकरणाचा तपास करणार आहे. त्यामुळे या घोटाळ्यातील अनेक जण भूमिगत झाले आहेत.या प्रकरणात काही पत्रकारांवरही कारवाई ची शक्यता वर्तवली जात आहे.
गोरगरिबांचा तळतळाट लागणार
भारतात कुणीही उपाशीपोटी झोपू नये म्हणून सरकारने अन्न सुरक्षा योजना सुरु केलीय. यातून गरीब कुटुंबाला अत्यल्प दरात धान्य पुरवलं जाते. मात्र अधिकारी आणि काही व्यापाऱ्यांच्या अभद्र युतीने गोरगरिबांचा घास हिरावून घेत त्याची काळ्या बाजारात विक्री केली. हा घोटाळा करणाऱ्या सर्वांना स्थानिक आणि उच्च न्यायालयातून जामीन मिळाल्याने प्रकरण थंड झाले आणि हे बहाद्दर पुन्हा आपल्या काळ्या धंद्याला देखील लागले होते. मात्र आता ईडीच्या एन्ट्रीमुळे या चोरांना अद्दल घडणारच अशी आशा निर्माण झालीय. गोरगरिबांच्या तोंडचा घास हिरावणाऱ्यांना मोठी शिक्षा होईल असं बोललं जातंय.

1 टिप्पणी:
नुसते राम राज्य शिवराज्य आणतो म्हणून सत्तेवर येणाऱ्यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या जर आवळल्या नाही तर गुन्हेगारी संपुष्टात येणार नाही व रामराज्य तर दूरच राहिले स्वराज्य पण धोक्यात येईल
टिप्पणी पोस्ट करा