नायगांव तालुक्यात पहिला झटका,अनेक गांवात चर्चा.....
नायगाव : जिल्ह्यातील राजकारण्यांचे लक्ष असलेल्या मेळगाव ग्रामपंचायतीचे बहुचर्चीत सरपंच अमोल महिपाळे यांच्यासह अन्य एक महिला सदस्यास सदस्य पदी राहण्यासाठी अनर्ह/अपात्र ठरविल्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी विनोद शिंदे यांच्या पुराव्यानिशी दिलेल्या तक्रारीवर नुकताच दिल्याने राजकीय वर्तूळात चांगलीच खळबळ माजली असून नायगांव तालुक्यातील या वर्षातील पहिल्याच निर्णयामुळे कागदोपत्री सोपस्कार पूर्ण केलेल्या अनेक गांवातील सरपंच,उपसरपंच व सदस्यांत भितीचे वातावरण पसरले आहे व तालुक्यात सर्वच गांवात याबाबत चर्चा रंगत आहेत.
सविस्तर वृत्त असे की, नायगांव (खै.) तालुक्यातील एकेकाळी निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त म्हणून सुपरिचित असलेल्या मेळगाव ग्रामपंचायतीसाठी आनंदराव पाटील शिंदे व मोहनराव पाटील शिंदे तसेच,वैजनाथ पाटील या दोन गटांत झालेल्या अतिशय अटीतटीच्या व चुरशीच्या निवडणुकीत दोन्ही गटांचे प्रत्येकी ३ तर,अन्य एक जागेवरील उमेदवारांना सम-समान मते मिळाल्याने नशिबचिठ्ठीवर वैजनाथ शिंदे गटाच्याच चंद्रकला प्रदिप धसाडे या अन्य एक उमेदवाराचा विजय झाला होता.अनुसूचित जाती प्रवर्गासाठीच्या आरक्षित सरपंचपदासाठीचे दोन्ही उमेदवार वैजनाथ पाटील शिंदे यांच्याच गटाकडे असल्याने त्यांच्याच गटाचे असलेल्या अमोल रामानंद महिपाळे यांची सरपंचपदी फेब्रुवारी महिन्यात निवड झाली होती.
सरपंचपदावर असलेल्या अमोल महिपाळे यांनी स्वतःच्याच घरात शौचालयाचा वापर दूरच मात्र शौचालय बांधकामही केलेच नव्हते त्याचबरोबर,सार्वजनिक जीवनात वावरतांना अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन लज्जास्पद काम केले व सद्या तो कारागृहात आहे.तसेच,अन्य एक महिला सदस्या चंद्रकला प्रदीप धसाडे यांनी ग्रामपंचायतीच्याच शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याने या दोघांनाही ग्रामपंचायत सदस्यपदावर राहण्यासाठी अपात्र घोषित करण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांच्या न्यायालयात विनोद आनंदराव शिंदे यांनी एँड.शिवरुद्र पुजारी यांच्या मार्फत दाद मागितली होती.या वस्तुनिष्ठ तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने सविस्तर चौकशी करुन अहवाल पाठवण्याचे आदेश गटविकास अधिकारी नायगांव (खै.) यांना दिला होता.पंचायत समितीच्या प्रत्यक्ष स्थळ पाहणीत अतिक्रमण झाले असल्याचे गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या अहवालात नमूद केले.त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (ज-३) नुसार दाखल केलेला विवाद अर्ज मंजूर करण्यात येऊन ग्रामपंचायत सदस्या चंद्रकला प्रदीप धसाडे यांनी ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक जागेवर अनाधिकृत अतिक्रमण केल्याचे सिध्द झाले.त्यामूळे त्यांना सदस्यपदी राहण्यास अनर्ह /अपात्र ठरविण्याचा त्याचबरोबर,सरपंच अमोल महिपाळे यांच्या बाबतीत गटविकास अधिकारी,पंचायत समिती नायगांव यांनी दि.१७ मे रोजी सादर केलेल्या अहवालात अमोल रामानंद महिपाळे रा.मेळगाव यांचे शौचालय असून त्यांचे बांधकाम नुकतेच केलेले दिसुन येते.तसेच,त्याचा नियमित वापर होत नसल्याचेही नमूद केल्याने त्यांनी महाराष्ट्र ग्रा.प. अधिनियम १९५८ चे कलम १४ (ज -५) १६ चा भंग झाल्याचे सिद्ध झाले.
या दोन्ही प्रकरणात वादी, प्रतिवादी व त्यांच्या वकिलांनी चांगलेच युक्तिवाद केले.मात्र गटविकास अधिकारी,नायगांव यांनी सादर केलेल्या अहवालानुसार जिल्हाधिकारी डाॅ.विपीन इटनकर यांनी दिनांक.5 जूलै रोजी दिलेल्या निर्णयात सरपंच अमोल महिपाळे व चंद्रकला प्रदीप धसाडे या दोघांनाही ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी अपात्र ठरवून अनर्ह ठरविले.
जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर स्तरावरुन प्रतिष्ठित असलेल्या ग्रामपंचायत मेळगांवचे सरपंच महिपाळे सह अन्य एका महिला सदस्यांस अपात्र ठरविल्याच्या नायगांव तालुक्यातील या पहिल्याच निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करुन सरपंच,उपसरपंच,सदस्य पदावर विराजमान असलेल्या अनेकांच्या उरात चांगलीच धडकी भरली आहे.तर,या नंतर कोणत्या गांवातला कोण पायउतार होईल याबाबतही गांवागावातून चर्चा रंगली आहे.....थेट सर्वोच्च न्यायालयाचा निवाडयाचा दाखला.
..महत्त्वाचे म्हणजे,धसाडे यांनी स्वतः ग्रामपंचायतीच्या शासकीय जागेत अतिक्रमण केलेच नसल्याचा युक्तिवाद त्यांचे वकिल एँड.राहूल कुलकर्णी यांनी केला होता मात्र विरोधी गटाचे वकिल एँड.शिवरुद्र पुजारी यांनी लोकप्रतिनिधींच्या कुटुंबातील व्यक्तीचे शासकीय जमिनीत अतिक्रमण असल्यास त्याच कुटुंबातील पदावर असलेला लोकप्रतिनिधी पदावर राहण्यास अपात्र ठरतो असा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका प्रकरणाचा दाखला दिल्याने धसाडे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविल्याने पदावरून पायउतार व्हावे लागले....

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता