कला
कला ही उपजत अशी देणगी आहे. तरीही तिला वृद्धींगत करण्याचे परिश्रम मात्र आपल्यालाच घ्यावे लागतात. आपण कलेमुळे जीवनात एक वेगळाच आनंद उपभोगत असतो. बरेचदा आपण म्हणतो, कलेला मोल नाही म्हणजे ती अनमोल आहे की मातीमोल आहे. अर्थात अनमोल आहे.हे मात्र आपल्याला ठरवायचे आहे. आपल्या अंगी असलेली कला आपल्याला शोधावी लागेल. बऱ्याचदा असा अनुभव येतो की काही कलेत घराणेशाही दिसून येते. जसे संगीत, नृत्य, गायन, वादन, चित्रकला या कला एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत चालत येतात. पण प्रत्येक वेळी असं घडतंच असं नाही. खाणीत हिरा सापडतो तसच एखाद्या गरीबाच्या झोपडीत एखादा गायक सापडतो.आपले मित्र-मैत्रिणी, आई-वडील, आपले आप्त, आपल्या संबंधात येणाऱ्या व्यक्ती आपल्यातील कलेला जाणून असतात. आपल्या आई-वडिलांचा आपल्या कलेला वाढवण्यासाठी विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असतात. कधी परिस्थितीने म्हणा किंवा संधी मिळाली नाही म्हणून म्हणा एखाद्याला कला असूनही त्या कलेला पुढे नेण्याचा मार्ग सापडत नाही. पण तरीही आपण आपली कला जोपासण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज स्पर्धेचे युग आहे.प्रत्येकाला वाटतं माझा मुलगा डॉक्टर, इंजिनियर हवा.त्यात कला कुठेतरी हरवली जाते.
कला पैशाने विकत घेता येत नाही. कलेतून खूप मोठा फायदा मिळाला नाही, तरी नुकसान नाही. काहींच्या जीवनात कलेतून मिळणारा आनंद मात्र पैशापेक्षा मोठा असेल. नृत्य, गायन, वादन, क्रीडा, चित्र इत्यादी या कला प्रत्येक व्यक्तीला कमी अधिक प्रमाणात असतात. आपल्यातील कला ओळखून आपणच त्या कलेसाठी श्रम घ्यावे लागतात. आज तांत्रिक साधने वाढली. तुम्हाला जरी गुरु करता आला नाही. तरी यूट्यूब च्या माध्यमातून, व्हाट्सअपच्या माध्यमातून, दुरदर्शन, मित्र परिवाराच्या माध्यमातून, अचानक एखादी व्यक्ती, एखादी कल्पना, एखादा प्रयत्न तुम्हाला एक संधी पुरवत असते. तुम्ही जरी गुरुगृही राहून शिकला नाही तरी तुम्ही तुमच्या प्रयत्नातून शिकू शकता. आपल्याला मिळालेल्या फावल्या वेळात आपण गप्पा मारतो, टीव्ही बघतो, फिरायला जातो. त्याच फावल्या वेळेचा योग्य वापर करून आपण आपल्या अंगी असलेली कला जोपासली तर नक्कीच आपल्याला आनंद मिळेल. कधीतरी असेही घडेल तुमच्यातील कला तुमच्या घरातील लोकांना, मित्र परिवाराला स्तुतीचा विषय होणार नाही, परखड शब्दांत एखादा अभिप्राय देईल. पण, तुम्ही त्यांची स्तुती तुम्हाला मिळेल म्हणून कलेची जोपासना करू नका. तर तुमचा आनंद, समाधान म्हणून कलेची जोपासना करा.
नक्कीच ती कला पुढे जाईल आणि त्या कलेतून तुम्ही इतरांना काहीतरी देऊ शकाल.तुम्ही केलेली एखादी कृती जी कला आहे पण तुम्हाला हवे ते प्रोत्साहन मिळाले नाही म्हणून तुम्ही त्याला अपयश मानू नका. तर तुमच्या प्रयत्नात कुठेतरी कमी होता असा विचार करून तुम्ही प्रयत्न करत रहा. जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही. या प्रयत्नांच्या कालावधीतही तुम्हाला एक आत्मिक आनंद मिळतो.तुम्ही कोणाला जरी सांगू शकला नाही तरी तो तुमच्या पर्यंत पोहोचत असतो.नक्कीच कला अनमोल आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या कलेला मोल देत आहोत, त्याप्रमाणे इतरांच्या कलेचा ही विचार केला पाहिजे. बऱ्याचदा आपल्याला क्रीडाविषयक, संगीताविषयी, माहिती नसते , आवड नसते.तरीही एखाद्याच्या कलेला पाहून आपल्याला त्यातील गुणवत्ता काही प्रमाणात तरी समजते. आपण नक्कीच त्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.एखादे गाणे आपल्या मनाला भावले तर भरभरून दाद दिली पाहिजे.चूका आणि शिका हे खरे आहे.तरी चूका दाखवून दुखवण्यापेक्षा त्यातील प्रयत्न, सौंदर्य शोधा त्याला नवी झळाळी द्या.
आज ऑलम्पिक सामने सुरू आहेत.ऑलंम्पिक सामन्यात चढाओढ लागलेली आहे.आपल्या देशाचा झेंडा फडकवण्याची.आपल्या देशासाठी आपण एक गौरवास्पद पाऊल उचलणार त्याचा आनंद काही वेगळाच आहे. त्यासाठी आज ज्या खेळाडूंनी आपले तन-मन-धन अर्पण केले आहे. त्यांचे आपण प्रेरक होऊ शकतो.खेळावर त्यांनी आपले मन एकाग्र केले आहे.आपण जरी खेळू शकलो नाही, तरी त्यांना प्रोत्साहन मात्र देऊ शकतो. दुसऱ्याला प्रोत्साहन देणे ही एक मोठी कला आहे.या प्रेरणेच्या बळावर अगदी एखाद्या लहान खेडेगावातला मुलगा, मुलगी पुढे येतात आणि आपल्या देशाचा गौरव होतात.
भारताच्या प्रगतीला शोभिवंत करणा- या सर्व कला रसिकांना खूप खूप शुभेच्छा.
डॉ.सौ.शुभांगी गादेगावकर
मीरा रोड, जिल्हा-ठाणे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता