नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेले पत्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. त्याला कारणही तसंच खास आहे.
नांदेड ४ मार्च २०२१
हायलाइट्स:
- नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्याचं पत्र चर्चेत.
- कार्यालयाच्या आवारात घोडा बांधण्यासाठी मागितली परवानगी.
- अजब पत्राने जिल्हाधिकारी विपिन इटनकर पडले बुचकळ्यात
नांदेड : नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना विभागात सहाय्यक लेखाधिकारी म्हणून सेवेत असलेले सतिष पंजाबराव देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एक अजब विनंती केली असून देशमुख यांचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या पत्राने जिल्हाधिकारी बुचकळ्यात पडले आणि त्यांच्यावरही मग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांकडे याबाबत सल्ला मागण्याची वेळ आली.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात कार्यालयीन वेळेत घोडा बांधण्याची परवानगी सतिष देशमुख या अधिकाऱ्याने आपल्या पत्रात मागितली आहे. देशमुख यांच्या पत्रात मोजकाच पण जिल्हाधिकाऱ्यांना चक्रावून टाकणारा मजकूर आहे. या सगळ्यामागे देशमुख यांनी दिलेलं कारणही अजब आहे.
'मी सतिष पंजाबराव देशमुख, सहाय्यक लेखाधिकारी (रोहयो शाखा) जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे कार्यरत आहे. मला पाठीच्या कण्याचा त्रास होत असल्यामुळे टू व्हिलरवर येण्यास त्रास होत आहे. त्यामुळे मी घोडा खरेदी करण्याचे ठरवले आहे. घोड्यावर बसून विहित वेळेत कार्यालयामध्ये येणे मला शक्य होईल. मी घोडा आणल्यास त्याला कार्यालयीन परिसरात बांधण्याची परवानगी देण्यात यावी, ही विनंती.' असे पत्र देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले असून त्यानंतर पुढे बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत.
मेडिकल कॉलेजचा घेतला सल्ला
सतिष देशमुख यांच्या अजब मागणीमुळे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला. त्यांनी मग डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्याकडे हे पत्र पाठवलं व सल्ला मागितला. तेथील अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागाने या पत्राच्या अनुषंगाने आपला सल्ला दिला असून तो सल्लाही खासच आहे. 'पाठीच्या कण्याचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी घोड्यावर प्रवास केल्यास आणखीन आदळ आपट होते. त्यामुळे मणका दबण्याची, मणक्यातील गादी दबण्याची तसेच सरकण्याची शक्यता असते. त्यामुळे पाठीच्या कण्याचा आजार कमी न होता तो वाढण्याची दाट शक्यता आहे', असे त्यात नमूद करण्यात आले असून तसे अधिष्ठातांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळवले आहे.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी सतिष देशमुख यांची विनंती फेटाळताना त्यांना चांगलीच तंबी दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता