शुक्रवार, ऑगस्ट ०९, २०२४

Dispute Free Village: मरवाळी येथील तंटामुक्त गाव समितीचे पुनर्गठन करण्याची निवेदनाद्वारे मागणी,तुमच्याही ग्रामपंचायतीकडे 15 ऑगस्ट पर्यंत करा मागणी, गावातील तंटे गावातच मिटवा

 

Dispute Free Village

संपादक-संजय चिखले

मरवाळी,दि.8 ऑगस्ट 2024: गावात तंटे निर्माण होऊ नयेत, तसेच दाखल असलेले तंटे व नव्याने निर्माण होणारे तंटे लोकसहभागातून सामोपचाराने मिटविण्याची व्यवस्था निर्माण व्हावी आणि सामाजिक शांती प्रस्थापित होऊन राज्याची शांततेतून समृद्धीकडे वाटचाल व्हावी या दृष्टीने तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांच्या संकल्पनेतून 15 ऑगस्ट 2007 पासून 'महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम' राज्यात सुरु करण्यात आली. 

नांदेड जिल्ह्यातील नायगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजे मरवाळी/कोपरा ग्रामपंचायत येथील काही सुज्ञ,जागरूक व प्रतिष्ठित ग्रामस्थांना महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष व सदस्यांकडून शासन निर्णयानुसार समितीसाठी घालून दिलेल्या आचारसंहितेचे  कुठलेच पालन करण्यात येत नसल्याची बाब ध्यानात आली.

मागिल दोन वर्षात समितीने एकही बैठक घेतली नाही तसेच गावात निर्माण होणाऱ्या तंट्यांबाबत समितीला कसलेच देणं घेणं नसणे,समितीला गावात निर्माण झालेल्या तंट्यात रस नसणे,तंटे/वाद याची माहिती तंटामुक्त गाव समितीकडे देण्यासाठी समितीकडून ग्रामस्थांना आवाहन न करणे,उद्भवलेल्या तंट्यांसंदर्भात बैठक घेतल्याचे रेकॉर्ड नसणे. 

विशेष बाब म्हणजे असे असताना देखील सर्व नियम धाब्यावर बसवून मागिल दोन वर्षांपासून समितीचे पुनर्गठनच करण्यात आले नाही व एकही तंटा/वाद न मिटवता समिती अध्यक्ष व सदस्य स्वतःच्या बतावणी करीता पदाचा गैरवापर करत,पदाचा मोठेपणा मिरवत फिरत असल्याची धक्कादायक व संतापजनक बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने तसेच शासन आदेशानुसार समितीत बदल करण्याची १५ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट दरम्यानची हीच योग्य वेळ असल्याने काही जागरूक नागरिकांनी ग्रामसेवक एन.एच कुलकर्णी यांचेकडे एका निवेदनाद्वारे ग्रामसभा बोलावण्याची मागणी केली आहे.


समितीचा कार्यकाळ व समिती सदस्य, अध्यक्ष बदलणे

तंटामुक्त गाव समिती कायमस्वरुपी कार्यरत राहील.तथापी जे सदस्य समितीच्या बैठकांना उपस्थित राहत नसतील, समितीच्या कामात वेळ देत नसतील समितीच्या कामात रस घेत नसतील, समितीच्या कामकाजात अडथळा निर्माण करत असतील अशा सदस्यांना बदलून नवीन सदस्य घेणे बाबत प्रत्येक वर्षाच्या १५ ऑगस्ट नंतरच्या पहिल्या ग्रामसभेमध्ये ग्रामसभेच्या मान्यतेने निर्णय घेता येईल.तसेच समितीचा अध्यक्ष बदलण्याची ग्रामसभेला आवश्यकता वाटत असेल तर अध्यक्ष बदलून नवीन अध्यक्षाची निवड त्याच ग्रामसभेमध्ये करण्यात यावी. मात्र कोणत्याही परिस्थितीत तंटामुक्त गाव समितीचे १/३ पेक्षा अधिक सदस्य एकाचवेळी बदलता येणार नाहीत.

तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष व सदस्य 

कसे असावेत

ग्रामसभेने अध्यक्ष निवडताना सामाजिक प्रश्नांची जाण असलेल्या,प्रतिष्ठित, प्रामाणिक,समजुतदार, समाजात ज्यांचा प्रभाव आहे व सदस्य निवडताना निस्वार्थी निवडले पाहिजेत किंवा घेतले पाहिजेत.

कसे नसावेत

समितीमध्ये गुंड प्रवृत्तीच्या, कडव्या जातीय विचारसरणीच्या, अवैध धंदे असणाऱ्या व अवैध धंद्यांचा पुरस्कार करणाऱ्या तसेच असामाजिक तत्वांचा अवलंब करणा-या व्यक्तींना स्थान असणार नाही.समितीचे सदस्य निर्व्यसनी व उत्तम चारित्र्याचे असावेत.

समितीच्या बैठकीस उपस्थित राहणे गावपातळीवरील शासकीय कर्मचाऱ्यांना अनिवार्य असेल

समितीच्या सदस्यांसाठी आचारसंहिता

समितीच्या सदस्यांनी निर्पेक्ष व निष्पक्षपातीपणे काम करणे आवश्यक आहे.समितीच्या बैठकांना उपस्थित राहणे,समितीच्या कामासाठी वेळ देणे,तंटे मिटविण्याच्या कामात रस घेणे आवश्यक आहे.तंटे मिटविताना त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे.तंटे मिटवित असताना नकारात्मक व पुर्वगृहदुषीत दृष्टीकोन सदस्यांनी ठेवू नये.

समितीची कार्य व कक्षा

गावामध्ये शक्यतोवर तंटे निर्माण होऊ नयेत,जातीय धार्मिक सलोखा, सामाजिक व राजकीय सामंजस्य आणि अनिष्ट चालीरीती व प्रथांचे निर्मुलन करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना :

सार्वजनिक सण/उत्सव शांततेत साजरे करणे.

जातीय व धार्मिक सलोखा निर्माण करणे.

सार्वजनिक व खाजगी मालमत्तांचे संरक्षण करणे.

ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यरत करणे.

अवैध धंद्यांना प्रतिबंध करणे व त्यांचे निर्मुलन करणे.

सामाजिक सुरक्षिततेसाठी कार्यक्रम राबविणे.


गाव हा विश्वाचा नकाशा। गावावरूनी देशाची परीक्षा।।

गावची भंगता अवदशा। येईल देशा।।

 ---ग्रामगीता वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज


संबंधित बातम्या

Dispute Free Village: ग्रामस्तरीय पर्यायी वाद निवारण (एडीआर) व्यवस्था अर्थात तंटामुक्त गावचा बाजार संपला का❓