शुक्रवार, ऑक्टोबर १५, २०२१

भ्रष्टाचार (Corruption) ; इतिहास, व्याप्ती, वैशिष्ट्ये, कारणे, भ्रष्टाचार निमूर्लन योजना

 


एखाद्या व्यक्तिने आर्थिक लाभाकरिता अथवा स्वत:च्या मानसिक समाधानाकरिता अथवा स्वहिताकरिता आपल्या कर्तव्याची जाण न ठेवता दुसऱ्या व्यक्तिला अनैतिकपणे दिलेला त्रास म्हणजे भ्रष्टाचार. भ्रष्टाचार ही एक गंभीर सामाजिक समस्या आहे. या समस्येचे मूळ प्रामुख्याने व्यक्तिच्या अनैतिक व्यवहारात आहे, असे मानले जाते. त्याचबरोबर व्यक्तिच्या सामाजिक, नैतिक मूल्यांचा ऱ्हास हेही भ्रष्टाचाराचे एक महत्त्वाचे कारण म्हणून बघितले जाते. नियमहिनता, असत्यवादिता, अपारदर्शकता या तीन गोष्टी बरेचदा अनैतिकतेच्या गाभ्याशी असल्याचे दिसते. जेव्हा अशा नैतिक मूल्यांचा ऱ्हास होतो, तेव्हा समाजामध्ये भ्रष्टाचार नावाची समस्या उद्भवते. त्याचबरोबर गुंतागुंतीची आणि आंतर्विरोधग्रस्त सामाजिक आणि राजकीय परिस्थितीच प्रचंड प्रमाणातील भ्रष्टाचार वाढण्यास कारणीभूत ठरत आहे.

भ्रष्टाचार या शब्दाची उत्पत्ती भ्रष्ट व आचार या दोन शब्दांच्या एकीकरणातून झाली असून भ्रष्ट असे आचरण म्हणजे भ्रष्टाचार. व्युत्पत्तीशास्त्रानुसार व्यक्तिगत स्वार्थासाठी व्यक्तिने सदसदविवेकबुद्धी गहाण टाकून केलेले वर्तन म्हणजे भ्रष्टाचार होय. भ्रष्टाचाराची संकल्पना अधिक योग्य रीत्या स्पष्ट होण्यासाठी वेगवेगळ्या विचारवंतानी या संकल्पनेच्या केलेल्या व्याख्या समजून घेणे गरजेचे आहे.

डी. एच. बेली यांच्या मते, ‘भ्रष्टाचार म्हणजे स्वतःच्या व्यक्तिगत लाभासाठी स्वतःला मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर करणे होय. हा लाभ पैशाच्या स्वरूपात असण्याची गरज नाही’.

ॲडरली यांच्या मते, ‘भ्रष्टाचार म्हणजे काही औपचारिक नियम किंवा कायद्यांचे उल्लंघन करून सार्वजनिक सत्तेचा व्यक्तिगत फायद्यासाठी उपयोग करणे होय’.

झेप्टेल यांच्या मते, ‘सार्वजनिक भूमिका अथवा कार्यालयाचे नियम आणि कर्तव्य बाजूला ठेऊन व्यक्तिगत फायद्यांसाठी केलेले वर्तन म्हणजे भ्रष्टाचार होय’.


इतिहास : प्राचीन काळी कौटिल्य यांनी अर्थशास्त्रात सरकारी नोकरांकडून राज्यातील महसुलातील पैशांच्या होणाऱ्या अपहाराचे आणि भ्रष्टाचाराचे चाळीस प्रकार मांडले आहेत. इ. स. पूर्व पाचव्या शतकात ग्रीक अधिकारी परकीयांकडून लाच घेऊन त्यांना सार्वजनिक सभेला जाऊ देत आणि मतदान करू देत होते; तर रोमन साम्राज्यात खंडणी आणि देणग्यांच्या रूपात भ्रष्टाचार होत असे. तसेच रोमच्या सिनेटच्या निवडणुकीत भ्रष्टाचारी मार्गाने मते मिळविली जात होती. हीच परंपरा पुढे भारत आणि इतर देशांतही चालू राहिली. सम्राट अशोकांच्या काळातही काही प्रमाणात भष्टाचार अस्तित्वात होता. मध्ययुगात कर वसूल करण्याचे अधिकारच मर्यादित लोकांच्या हातात असल्यामुळे भ्रष्टाचाराची व्याप्ती मर्यादित राहिली. त्यानंतर ब्रिटीश अमदानीत केवळ भारतीय अधिकारीच नव्हे, तर अत्यंत उच्च पदावर असणारे ब्रिटीश अधिकारी देखील लाच घेत होते. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात एकूणच आर्थिक क्रियांच्या झालेल्या विस्ताराने भ्रष्टाचाराच्या अनेक मार्गांना जन्म दिला. स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या एक-दीड दशकात उच्च पातळीवरील राजकीय नेते मोठ्या प्रमाणात प्रामाणिक राहिले; परंतु तिसऱ्या-चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत हे चित्र बदलायला सुरुवात झाली. नव्या राजकीय नेत्यांनी आपला प्रामाणिकपणा संपविला. लोकांमधील त्यांची प्रतिमाही मलीन बनू लागली. त्याचबरोबर जवळजवळ सर्वच क्षेत्रांतील सरकारी कर्मचारी अत्यंत छोट्या कामासाठीसुद्धा लाच घेऊ लागले. आज जगातील अनेक राजकीय नेते, मंत्री मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारी मार्गांचा अवलंब करताना दिसत आहेत. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या अशासकीय जर्मन संघटनेनुसार भ्रष्टाचाराच्या बाबतीत भारताचा ९७ वा क्रमांक लागतो. दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचाराच्या व्यवहारातील विसंगती देखील या समस्येची गुंतागुंत आणि व्याप्ती अधिक विस्तारते. त्याचबरोबर जात, वर्ग, लिंगभावात्मक तसेच अनेक प्रकारच्या विषमतायुक्त समाजामध्ये भ्रष्टाचाराची व्याप्ती आणि गुंतागुंत अधिक वाढते. त्यामुळे या समस्येचा विचार व्यापक संदर्भात होणे गरजेचे आहे.


व्याप्ती : भ्रष्टाचार या शब्दाचा वापर प्रामुख्याने लाच घेणे, पैसा खाणे, पैशाची अफरातफर करणे अशा विविध अर्थाने सर्वसाधारणपणे लोक आपल्या जीवनात करत असतात; परंतु आपण भ्रष्टाचाराकडे एक समाजशास्त्रीय संकल्पना म्हणून बघतो, तेव्हा सर्वसामान्यांकडून केला जाणारा भ्रष्टाचार हा मर्यादित स्वरूपाचा आहे, असे आपल्या लक्षात येते. म्हणजेच भ्रष्टाचाराकडे जेव्हा आपण समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून एक सामाजिक प्रक्रिया म्हणून बघतो, तेव्हा त्या सामाजिक प्रक्रियेचे व्यवस्थात्मक आकलन पुढे आणण्याची गरज निर्माण होते.

जगातील सर्वच भांडवली व्यवस्था कमी-अधिक फरकाने भ्रष्ट असतात. भांडवली व्यवस्था जसजशी प्रगत होत जाते, तसतसा भ्रष्टाचार अधिक नियमित, शिस्तबद्ध आणि संस्थात्मक बनतो. भारतासारख्या ‘तिसऱ्या जगामध्ये’ तुटपुंजी साधनसामुग्री, दारिद्र्य आणि विषमता यांमुळे भ्रष्टाचाराला नवे आयाम मिळतात. त्यातूनच भ्रष्टाचाराचा प्रश्न एक ज्वलंत राष्ट्रीय प्रश्न म्हणून समोर येतो.

आज समाजाच्या सर्वच अंगांना भ्रष्टाचार नावाच्या समस्येने ग्रासलेले आहे. ही समस्या केवळ भारतापुरतीच मर्यादित नसून सर्वव्यापी आहे. भारतातील सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीनुसार तसेच ऐतिहासिक टप्प्यांनुसार या समस्येचे वेगळे आकलन करणे सर्व जगालाच गरजेचे आहे. भ्रष्टाचाराच्या व्याप्तीचा विचार करताना भ्रष्टाचाराच्या क्षेत्रांचा विचार होणे गरजेचे आहे.

भ्रष्टाचाराने संपूर्ण समाज पोखरून टाकला आहे. आज भ्रष्टाचाराविना कोणतेही क्षेत्र अलिप्त असल्याचे दिसून येत नाही. सर्वच क्षेत्रात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचार सुरू आहे. राजकीय क्षेत्र, निवडणुका, बांधकाम व्यवसाय, शेअर व बँकिंग क्षेत्र, विविध हवाला, उद्योग, रस्ते इत्यादी क्षेत्रे भ्रष्टाचाराची ज्वलंत क्षेत्रे म्हणून पुढे आलेली दिसतात. राजकीय क्षेत्र, प्रशासकीय क्षेत्र, आर्थिक क्षेत्र, धार्मिक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र अशा सर्वच क्षेत्रांत भ्रष्टाचार वाढलेला दिसून येतो. तसेच स्पीड मनी, गिफ्ट मनी, एंड मनी व खंडणी इत्यादी भ्रष्टाचाराचे प्रकार अस्तित्वात आलेले दिसतात. भारतासारख्या विकसनशील देशात बांधकाम उद्योग, कर आकारणी, जमीन घोटाळे, राजकारण आणि निवडणुका ही भ्रष्टाचाराची ज्वलंत क्षेत्रे बनलेली आहेत.


वैशिष्ट्ये : भ्रष्टाचार या विसंगतीपूर्ण आणि गुंतागुंतीच्या सामाजिक व्यवहाराची काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे : (१) भ्रष्टाचारामध्ये व्यक्तिने तिला लाभलेल्या सत्तेचा, अधिकाराचा आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी केलेला उपयोग केंद्रस्थानी असतो. (२) आपल्या वाट्याला आलेल्या भूमिका जाणीवपूर्वक व नियमानुसार न पार पाडणे हेसुद्धा भ्रष्टाचाराच्या समस्येचे मूळ आहे. (३) भ्रष्टाचाराच्या घटना, व्याप्ती आणि परिणाम हे स्थल व काल सापेक्ष असतात. (४) सत्तेचा गैरवापर, संपत्तीचा अवाजवी हव्यास, शासकीय आणि प्रशासकीय नियमांचे उघडपणे केलेले उल्लंघन इत्यादी मूलभूत बाबी भ्रष्टाचाराच्या मुळाशी असतात.

भ्रष्टाचाराच्या समस्येच्या भारतातील स्वरूपाचे स्पष्टीकरण करताना राज्यशास्त्राचे अभ्यासक सुहास पळशीकर म्हणतात की, ‘भ्रष्टाचार ही विसंगतीत अडकलेली लोकशाही आहे. एकीकडे भ्रष्टाचारात भारताचा ९७ वा क्रमांक लागतो, तर दुसरीकडे लोकायुक्त, केंद्रीय दक्षता आयुक्त, न्यायालये माहिती यंत्रणा इत्यादी भ्रष्टाचार विरोधी यंत्रणादेखील आपल्या देशात मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. म्हणजेच सार्वत्रिक भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार विरोधी कायदे व संस्था यांचे सहअस्तित्व हे आपल्या सार्वजनिक जीवनाचे एक विसंगतीपूर्ण वैशिष्ट्य आहे’.


कारणे : भ्रष्टाचाराच्या समस्येबाबतींत विसंगती व भ्रष्टाचार या समस्येमागची प्राथमिक कारणे पुढील प्रमाणे आहेत.

कायदे व नियम यांच्या व्यक्तिनिरपेक्ष अंमलबजावणीचा अभाव : सार्वजनिक संस्था त्यांच्या नेमलेल्या हेतुनुसार चालविणे तसेच त्या संदर्भातील कायदे आणि नियम यांची व्यक्तिनिरपेक्ष अंमलबजावणी करणे या मुलभूत कौशल्यात शासन कमी पडत आहे. याचाच अर्थ कायदे करायचे, नियम बनवायचे आणि त्यांच्या अंमलबजावणीची कोणतीही यंत्रणा योग्य पद्धतीने न राबविता तिचा कारभार बेभरोसे सोडून द्यायचा असा होतो. सध्या ही सर्व प्रकारच्या यंत्रणांची कार्यपद्धतीच बनली असल्याचे दिसते. अशा संस्थात्मक अपयशामुळे कायदे करणे आणि नव्या यंत्रणा स्थापन करणे हे एक प्रकारे धूळफेक ठरू लागली आहे. संस्था चालविण्यासाठी कौशल्य तर लागतेच; परंतु कायद्यासमोर सर्वजण समान आहेत, हे तत्त्व निरपवादपणे स्वीकारावे लागते. त्यामुळे कायदे आहेत, पण कायद्याचा ज्यांच्यावर अंमल करायचा ते घटक मात्र मर्यादित आहेत.

सार्वजनिक जीवनातील व्यवसायिक वृत्तीचा अभाव : व्यक्ती हा व्यक्तिगत पातळीवर बरेचदा प्रेमळ, कनवाळू, दुसऱ्याची व्यक्तीशः काळजी करणारा असतो; परंतु समाज म्हणून सार्वजनिक सभ्यता, सार्वजनिक विवेक यांचा तो पाठपुरावा करतोच असे नाही. प्रत्येकाने आपले काम व्यावसायिक वृत्तीने करावे, हे सार्वजनिक सभ्यतेचा एक भाग असतो; परंतु सर्वसाधारणपणे सार्वजनिक जीवनात (प्रामुख्याने प्रशासकीय जीवनात) व्यावसायिक वृत्ती कमी दिसून येते. एकावर कृपा व दुसऱ्यावर अवकृपा ही वृत्ती जास्त आढळते. व्यक्तिगत जीवनात आपण चांगली व्यक्ती असावे, असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो; पण आपल्या सार्वजनिक भूमिकेत आपण चांगली व्यक्ती असावे, असा तितकासा कोणी प्रयत्न करित नाही. यश मिळविणे, पैसा मिळविणे हे सर्वांचे प्राथमिक उद्दिष्ट असते. हे व्यक्तिगत आणि सार्वजनिक सभ्यतेमधील अंतर भ्रष्टाचाराच्या समस्येच्या विसंगतीपूर्ण स्वरूपाचे एक महत्त्वाचे कारण आहे.

स्वायत्त नागरिक होण्याच्या प्रक्रीयेचा अभाव : माणसांचे रूपांतर स्वाभिमानी आणि आत्मप्रतिष्ठा असणाऱ्या नागरिकांमध्ये होण्याची प्रक्रिया संविधानाला आणि लोकशाही राजकारणाला अपेक्षित आहे. त्यासाठी आपल्या जन्मजात समुदायाच्या गुलामगिरीतून माणसे मुक्त होणे आणि राजकीय व्यवस्थेचे आपण आश्रित किंवा ग्राहक नसून स्वतःला अधिकार असलेले स्वायत्त नागरिक आहोत, अशी व्यक्तिंची स्वतःबद्दलची प्रतिमा तयार होणे या दोन गोष्टी आवश्यक असतात. या दोन्ही गोष्टी साध्य होण्यासाठी व्यक्ती म्हणून स्वतःकडे पाहण्यास सुरुवात होणे गरजेचे असते. नेमकी हीच प्रक्रिया अतिशय संथ गतीने होताना दिसते.

आपल्या प्रशासकीय चौकटी आणि राजकीय व्यवहार नागरिकत्वाच्या निर्मितीत सतत अडथळा आणतात. अधिकाधिक कायदे आणि तरतुदी या व्यक्तिंना वेगवेगळ्या समुहांमध्ये कोंडून ठेतात. त्यामुळे कल्याणकारी लोकशाही राजकारणाच्या प्रक्रियेतून माणसांचे हक्क असलेले स्वायत्त नागरिक बनण्याऐवजी त्यांचे लाभधारक समूहांमध्ये रूपांतर होते. या प्रक्रियेत माणसांचे व्यवहार हे जबाबदार आणि स्वाभिमानी नागरिक म्हणून न होता दुय्यमत्त्वाचे नैतिक बळ असलेल्या सामूहिक अहंकारातून होवू लागतात. त्यामुळे नागरिकत्वाचा अभाव हे देखील भ्रष्टाचाराच्या विसंगतीपूर्ण वैशिष्ट्यांचे महत्त्वाचे कारण आहे.


आर्थिक कारणे : भ्रष्टाचाराचे मूळ हे आर्थिकतेशी जोडलेले आहे. माणसाला अल्पावधित, झटपट श्रीमंत होण्याची आणि विनाकष्टाचे उच्च दर्जाचे जीवन जगण्याची इच्छा असते. त्यापोटीच तो अन्य मार्ग शोधत असतो. त्यासाठी तो चलनवाढ करणे, परवाना देण्यासाठी बरीच रक्कम मोजायला लावणे, उद्योग व्यवसायांतील साटेलोटे इत्यादींमुळे आर्थिक भ्रष्टाचार करतो. व्यक्तिगत लाभासाठी तो भ्रष्ट आचरण करण्याचा मार्ग स्वीकारतो. त्याच बरोबर आपल्या देशातील क्लिष्ट कर रचना हीसुद्धा भ्रष्टाचाराचे महत्त्वाचे कारण आहे. त्यासंदर्भातील असंख्य प्रकरणे न्यायालयात निकाली लागलेले नाहीत. कर चुकविण्यासाठी विविध भ्रष्ट मार्गांचा वापर केला जात आहे.

सामाजिक कारणे : जीवनविषयक वाढता चंगळवादी व भोगवादी दृष्टीकोन, निरक्षरता, प्रशासकीय व कायदेशीर प्रक्रियेविषयक अज्ञान, सर्व प्रकारच्या विषमता, पिळवणुकीस प्राधान्य अशा सामाजिक संरचनेच्या वैशिष्यांमुळे भ्रष्टाचाराला प्राधान्य प्राप्त होते. भारतात जातीव्यवस्था आणि नातेसंबंध देखील भ्रष्टाचारवाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजाविताना दिसतात.

राजकीय कारणे : भ्रष्टाचाराला राजकीय कारण हेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे दिसून येते. बऱ्याच वेळा अकार्यक्षम नेतृत्व, निवडणुकांसाठी निधी, राजकारण्यांबरोबरचे हितसंबंध, राजकीय उदासीनता, कामाबद्दलची तत्परता, जात, धर्म, नातेसंबंधांचे राजकारण इत्यादीं मधूनही भ्रष्टाचार होताना दिसतो. राजकारणातील भ्रष्टाचाराची चर्चा करत असताना बरेचदा राजकारणातील भ्रष्टाचाराचे मूळ भ्रष्ट राजकारणी, अधिकारी यांच्या व्यवहारांत शोधले जाते; परंतु राजकीय क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराची पाळे-मुळे जशी भारतातील विशिष्ट स्वरूपाच्या भांडवली व्यवस्थेत शोधता येतात, तशी ती येथील वैशिष्ट्यपूर्ण लोकशाही पद्धतीत देखील आहेत. भ्रष्टाचाराच्या समस्येची ही व्यवस्थात्मक बाजू लक्षात न घेतल्यामुळे राजकारणातील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी खेळले गेलेले भ्रष्टाचाराचे राजकारण उथळ, तात्पुरते आणि अव्यवहार्य ठरते.

कायदेशीर कारणे : अमर्यादित कायदे, कायद्यातील कमकुवत बाजू व कायद्याच्या अंमलबजावणीमधील ढिसाळपणा या सर्व गोष्टींचा गैरफायदा घेत आज सत्तास्थानी असलेल्या व्यक्ती मोठमोठ्या घोटाळ्यांतून निर्दोषपणे बाहेर पडल्याचे दिसून येते. यामुळे भ्रष्टाचार आणखी फोपावण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. याचबरोबर सरकारचे आर्थिक धोरण, वस्तुंची कमतरता, पैशांचे वाढते महत्त्व, अपुरे वेतन व आर्थिक असुरक्षितता, योग्य शिक्षेचा अभाव, प्रचंड प्रमाणात असणारा अवैध पैसा इत्यादी कारणेसुद्धा भ्रष्टाचार घडण्यासाठी कारणीभूत असल्याचे दिसून येतात.

भ्रष्टाचार निमूर्लन योजना : इ. स. १९४७ मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा संमत करण्यात आला. स्वातंत्र्यानंतर ३० पेक्षा जास्त समित्या किंवा आयोग अस्तित्वात आले. केंद्र सरकार आणि राज्य सरकारे यांची प्रशासनातील गतिमानता, पारदर्शकता वाढविण्यासाठी तसेच जनतेच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक या क्षेत्रांत असणाऱ्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी हे धोरण योजले होते. त्यानुसार विविध समित्या व आयोग स्थापन करण्यात आले. उदा., सचिवालय, पुनर्गठन समिती–१९४६; मितव्ययिता समिती–१९४७; अय्यंगार रिपोर्ट–१९४९; गोरवाला रिपोर्ट–१९५१; पॉल एच. एपलबी रिपोर्ट–१९५२; संथानम समिती–१९६२; पहिला प्रशासकीय सुधार आयोग–१९६६; दुसरा प्रशासकीय सुधार आयोग–२००५; संस्था-अंमलबजावणी संचालनालय (ईडी) – १९५६; सी. बी. आय.–१९६१; केंद्रीय दक्षता आयोग–१९६४; कायदे : भारतीय दंड संहिता–१८६०; भारतीय आयकर अधिनियम–१९६१; लोकायुक्त–१९७१; भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम–१९८८; मनी लॉडरिंग कायदा–२००२; माहितीचा अधिकार अधिनियम–२००५.


देश-विदेशांत भ्रष्टाचारविरोधी कायदेशीर तरतुदींच्या माध्यमांतून यंत्रणा उभ्या असून देखील एकविसाव्या शतकात समाजामध्ये भ्रष्टाचाराच्या समस्या कायम आहेत. त्यामुळे केवळ कायदे करणे किंवा यंत्रणा उभ्या करणे पुरेसे नसून समाजातील जात, वर्ग, लिंगभावात्मक विषमता यांच्या संरचनांमुळे आणि व्यवस्थांमुळे भ्रष्टाचाराच्या समस्येचे स्वरूप अधिकच गुंतागुंतीचे आणि विसंगतीपूर्ण बनत आहे. त्यामुळे उपाययोजानांचा विचार करता केवळ भ्रष्ट व्यवहारांपुरता तसेच कायदेशीर तरतुदींपुरता मर्यादित विचार करून चालणार नाही. भ्रष्टाचाराचे निराकारण केवळ कायदेशीर किंवा व्यवस्थापकीय पुनर्रचनेमुळे होऊ शकत नाही. त्यासाठी सामाजिक नीती व मूल्यांची जाण वाढविण्याची गरज आहे. तसेच व्यापक पातळीवर खऱ्या अर्थाने सुसंस्कृत, सभ्य व भ्रष्टाचारमुक्त समाज निर्माण करण्यासाठी कृती कार्यक्रमाची आखणी आणि विषमताविरहित समाजाची निर्मिती करावी लागेल. भ्रष्टाचार निर्मुलन ही प्रत्येक नागरिकाची जाबाबदारी आहे, ही बाब प्रत्येकानी मनात रुजविणे गरजेचे आहे.


संदर्भ :


जाधव, तुकाराम; शिरापूरकर, महेश, भारतीय संविधान व भारतीय राजकारण, पुणे, २०१२.

ठाकूर, प्रदिप; राजा, पूजा, भ्रष्टाचाराच्या विरोधातील भारतीय लढ्याचा चेहरा, पुणे, २०१२.

यादव, योगेंद्र; पळशीकर, सुहास; डिसूझा, पीटर, लोकशाही जिंदाबाद, पुणे,२०१०.

Bardhan, Pranab, Globalisation, Democracy and Corruption an Indian Perspective, Kolkata, 2015.

Guhan, Sanjivi; Samuel, Paul, Corruption in India : Agenda for Action, 1997.

Verma, Arvind; Sharma, Ramesh, Combating Corruption in India, New Delhi, 2019.

समीक्षक : मयुरी सामंत

आज आपल्यासमोरची सर्वात गंभीर समस्या आहे ती भ्रष्टाचार व लाचखोरी ; भ्रष्टाचार येतो कोठून ?

 


आज आपल्यासमोरची सर्वात गंभीर समस्या आहे ती भ्रष्टाचार व लाचखोरी. भ्रष्टाचार येतो कोठून ? कुठल्याही भ्रष्टाचाराचे उगमस्थान असते व्यक्तीचा अनैतिक व्यवहार. आज समाजाची जी दुर्गती,स्वच्छंदता आणि बेशिस्त आहे तिचे कारण आहे सामाजिक नैतिक मूल्यांचा र्‍हास. नियमहीनता,असत्यवादीता सगळीकडे सर्रास पहायला मिळते. या दुर्दशेबद्दल व गंभीर समस्येबद्दल विचार करणे,त्याच्या निराकरणाचे उपाय शोधणे हे प्रत्येक बुद्धीजीवीचे कर्तव्य आहे. परंतु, दुर्दैव असे की भ्रष्टाचार विश्वव्यापक समस्या आहे असे म्हणून त्यावर उपाय करण्याचा विचार टाळण्याकडेच सर्वांचा कल दिसतो. असे वाटते की समाजाने भ्रष्टाचार हा जीवनाचा अविभाज्य अंग म्हणून स्वीकारला आहे की काय. या बेजबाबदार व्यवहाराला सामान्य मणुष्य जसा जबाबदार आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने शासन कर्ते व शासन प्रणाली जबाबदार आहे. आज सामान्य जनतेचे कुठलेच काम लाच दिल्याशिवाय होत नसेल तर त्यांनी मतदानासाठी लाच घेतली म्हणून केवळ त्यांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करता येणार नाही. त्यासाठी सार्‍या व्यवस्था, विशेषत: शासनप्रणाली नैतिकतेच्या पायावर उभी करावी लागेल. घराघरांतून, शाळांमधून नियम, व्यवस्था, अनुशासन, सत्यवादीता, पावित्र्य, आत्मशक्तीचा विकास करण्यावर भर दिला गेला पाहिजे. व्यक्तीच्या व्यवहारात सत्य उतरले तर मणुष्य सामाजिक नैतिकता प्रतिष्ठीत करु शकतो. वैज्ञानिक व तांत्रिक प्रगतीमुळे मानवाचे भौतिक जीवन सुविधापूर्ण झाले आहे परंतु मानव आतुन अधिक अशांत होत चालला आहे. कारण हेच की सदगुणांचा सदाचारांचा आजच्या जीवनात नितांत अभाव आहे. जेंव्हा नेतृत्वच स्वत: असत्त्याने वागते तेंव्हा सामान्य लोकही त्याचे अनुकरण करतात. शिडीच्या खालच्या पायर्‍यांवर असलेला मणुष्य भ्रष्ट होणार नाही याची काळजी वरच्या पायर्‍यांवरच्या प्रतिष्ठीतांनी घ्यायची असते. सामान्य जनता नेता आणि अभिनेता यांना आपला आदर्श मानते व त्यांचे अनुकरण करते. आज नेता भ्रष्ट,अभिनेता भ्रष्ट आणि आणि म्हणून जनताही भ्रष्ट अशी मानवतेच्या भविष्याच्या दृष्टीने फार भयावह परिस्थिती आहे. भ्रष्ट नेतृत्व, भ्रष्ट समाज स्त्रीच्या अब्रुचे रक्षण करु शकत नाही. यातुन बाहेर पडण्याचा प्रयत्न प्रत्येक व्यक्तीला स्वत:च करावा लागेल. कुठलातरी दैवी चचमत्कार आपल्याला यातुन सोडवील हा भाबडेपणा आपण सोडला पाहिजे

भ्रष्टाचार एक समस्या ; भ्रष्टाचार एक कलंक_Essay on Corruption In Marathi

 


भ्रष्टाचार वर मराठी निबंध । Essay on Corruption In Marathi

नमस्कार ! मित्रांनो आज आपण ” भ्रष्टाचार वर मराठी निबंध । Essay on Corruption In Marathi ” या विषयावर निबंध बघणार आहोत.

या निबंधा मध्ये आज आपण आपल्या देशाला बोळकावलेला भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारा विषयी असणारी देशातील समाजाची मानसिकता यांवर माहिती बघणार आहोत.

आजचे जग हे एकविसाव्या शतका कडे जात आहे. आणि ह्या एकविसाव्या शतकाला एक राक्षसाने जणू आळाच घातला आहे. त्या राक्षसाचे नाव, ” भ्रष्टाचार” !


भ्रष्टाचारावर मराठी निबंध । Essay on Corruption In Marathi

हल्ली दिवसें दिवस तर वर्तमानपत्रात रोज नव्या ” आर्थिक घोटाळा” बघायला मिळतो. वर्तमानपत्र हे बातम्या देणारे नसून भ्रष्टाचार लिहिणारे पत्रच झाले आहे. त्यात कित्येक बँक घोटाळे, लाच घेणारे अधिकारी, खोट्या नोटा छापणे….. अशा कित्येक घोटाळ्यांच्या बातम्या आपण रोजच वाचत, बघत असतो.

पूर्वीच्या काळातील भ्रष्टाचारा पेक्षा या आधुनिक युगाचा भ्रष्टाचार हा महाभयंकर आहेत. आज कुठल्याही क्षेत्रात विचार केला असता, भ्रष्टाचार नावाची कीड ही त्या क्षेत्राला लागलेली दिसेलच. भ्रष्टाचाराने आज प्रत्येक क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व स्थापित केलेले आहे.

जर आपलं एखादं कोणी बँक कर्मचारी किव्हा सरकारी कर्मचारी काम करत नसेल तर तेला पैशाची लाच देऊन काम करून घेणे हेलाच भ्रष्टाचार म्हणतात.

वाढत्या महागाईला तर पर्यायच नाही. महागाई ही दिवसें दिवस आणखी वाढतच जात आहे. कोणत्याही गोष्टीची कमतरता म्हणजेच टंचाई ही भ्रष्टाचाराला जन्म देते.

आज देशाची लोकसंख्या अफाट वाढलेली आहे. इथे नोकऱ्यांच्या जागा कमी आणि नोकरीसाठी अर्ज केलेल्या लोकांची संख्या जास्त आढळते. मग नोकऱ्यांची टंचाई हा मुद्दा समोर आला की, तेथे भ्रष्टाचाराला वावरण्यासाठी जागा मिळतेच.

लाखो रुपयांची लाच देऊन मोठ्या- मोठ्या अधिकाराच्या जागा मिळवल्या जातात, आणि दिलेली लाच पुन्हा मिळविण्यासाठी पुन्हा नव्याने झालेला अधिकारी लाच घेतो, परिणामी हा भ्रष्टाचार वाढत जातो.

लाच देणे आणि लाच घेणे चक्र सुरू होते आणि त्यातूनच ” काळा पैसा” निर्माण होत आहे.

आज विज्ञानाने खूपच प्रगती केली आहे. त्यात जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या चैनीच्या गोष्टी ची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झाली आहे. नव- नवीन गोष्ट बघायला मिळत आहेत आणि त्या गोष्टींची प्राप्ती करण्यासाठी लालची होत आहे.

कष्ट करून पैसा मिळविणे सगळ्यांना नको वाटत आहे. सहज काही काम न करता पैसा मिळवणे सगळ्यांना सुखाचे वाटत आहे. पण ह्याच वागण्यामुळे, स्वतःच्या स्वार्थासाठी, हव्यासापोटी मनुष्य भ्रष्टाचार सारख्या राक्षसाला जन्म देत आहेत.

आज पैसा मिळवण्यासाठी मनुष्य वाटेल ते करायला तयार आहे. पैशासाठी लोक चुकीचा आणि भ्रष्टाचाराचा मार्ग स्वीकारत आहेत. आज प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचाराचा किडा फिरत आहे.

भ्रष्टाचाराने अन्न आणि औषधी सुद्धा सोडल्या नाहीत. आज अन्नात व औषधात देखील भेसळ केली जात आहे. अन्नाच्या आणि औषधातील भेसळीमुळे रोज कित्येक गरीब आणि निरपराध जीवांचे बळी घेतले आहेत.

तसेच भ्रष्टाचाराने शिक्षण क्षेत्र सुद्धा सोडले नाही. आज कमी गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यां कडून लाच घेऊन त्यांना मेडिकल, इंजीनियरिंग अशा शाखेत भरती केली जाते. बालवर्गा पासून ते शाळा- महाविद्यालयां पर्यंतच्या सर्व शाखेच्या प्रवेशासाठी लाच घेतली जाते.

आणि अशीच लाच घेऊन दहावी ते बारावीच्या परीक्षेच्या प्रश्न पत्रिका फोडल्या जात व लाच घेऊनच परीक्षेतील गुणांची फिरवा फिरवी केली जाते. आज वैयक्तिक स्वार्थासाठी आपल्या देशाची संरक्षण विषय सर्व माहिती परकीय सत्तेला पुरवायला सुद्धा लोक विचार करेनात.

काही वर्षांपूर्वी आपल्या देशात हा भ्रष्टाचार नावाचा राक्षस जन्माला नव्हता पण कालांतराने ती स्थिती बदलली आहे. सुरुवाती भ्रष्टाचारी माणसाला खूप कमी दर्जा देत असत पण आज सर्व नैतिक चालीरीतीचा व मूल्यांचा ऱ्हास झाला आहे.

आज आपल्याला एक ही ठिकाण असे दिसणार नाही की, जिथे भ्रष्टाचार बघायला मिळणार. आजच्या जगातील पापी लोक मंदिरा मध्ये सुद्धा भ्रष्टाचार करताना दिसतील. जे लोक लाच देतात त्यांना दर्शनासाठी पहिले स्थान असते आणि गरीब लोकांना तासांनतास रांगेतच थांबावे लागते.

आज असे एकही असे क्षेत्र नाही तिथे भ्रष्टाचार बघायला नाही सर्वत्र भ्रष्टाचाराचे साम्राज्य पसरलेले दिसेल. आजचा भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला आहे.

भ्रष्टाचाराचे राज्य केवळ मोठ्या शहरात नसून लहान लहान खेड्यांपर्यंत पोहोचले आहे. सध्या खेड्यातील लोकांना काही काम करायचे म्हटले तर लाच द्यावी लागते. त्या शिवाय कुठलीच कामे पूर्ण होत नाहीत.

भ्रष्टाचाराचे सर्वात प्रथम प्रसारण हे सरकारी कार्यालयांमधून होताना दिसेल कोणते ही काम सरकारी कर्मचाऱ्यांकडून करून घ्यायचे म्हटले तर आधी त्यांचे ” खिसे भरावे” लागतात. म्हणजेच लाच द्यावी लागते.


भ्रष्टाचार एक समस्या :

आज- काल फसवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे. फसवणूक हा एक प्रकारच्या भ्रष्टाचाराचाच भाग मानला जातो. फसवे फोन करून बँकेची माहिती घेऊन पैसे चोरणे, फसवणूक काही ना काही वस्तू घेणे आज खूप वाढले आहे.

आज- काल विमा कंपनी, बँका, आयकर विभाग, मोठी कार्यालय, सरकारी कार्यालये या ठिकाणी हा भ्रष्टाचाराने आळा घातला आहे. मोठे अधिकारी आपल्या पदाचा गैर फायदा घेऊन भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत आहेत.

भ्रष्टाचाराचा क्रीडा सर्वांची मने आणि समाजाला पोखरत आहे. आज भ्रष्टाचार हि मोठी चिंताजनक गोष्ट झाली आहे. कारण भ्रष्टाचाराचा राक्षस आपले हात पाय कापत आहे. म्हणजेच आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपल्याला भ्रष्टाचाराला आहारी जावे लागत आहे.

अनेक पवित्र ठिकाणांचा भ्रष्टाचाराची कीड लागून ही ठिकाणे अपवित्र झाली आहेत. वैद्यकीय क्षेत्र हे केवढे पवित्र क्षेत्र मानले जाते. डॉक्टरांना, नर्सना तर परमेश्वराचा दर्जा दिला जातो.

डॉक्टर आपल्याला जीवनदान देतात पण ह्या भ्रष्टाचाराच्या अभावी जाऊन आपल्याला जीवदान देणारे परमेश्वराचे दुसरे रूप मानणारे डॉक्टर राक्षस बनत आहेत. तो पैशाच्या पोटी गरीब माणसांवर उपचार करेना ज्यांच्या कडे पैसा आहे त्यांच्या मागे डॉक्टर ही आहे अशी स्थिती झाली आहे.

माणसाची परिस्थिती, उच्चपद आणि अधिकार हे भ्रष्टाचाराला कारणीभूत ठरतात. हवं ते मिळवण्यासाठी माणूस भ्रष्टाचाराचा मार्ग स्वीकारत आहे. लहान- लहान गोष्टींमधून भ्रष्टाचार जन्म घेत असतो.

तो म्हणजे वजनामध्ये काटा मारणे, कंडक्टरने सुटे पैसे परत न करणे, परीक्षेत नंबर आल्यास विद्यार्थ्यांची बक्षिसे ठेवून घेणे, अशा लहान लहान गोष्टीं मधून भ्रष्टाचार जन्माला येत असतो. आज प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या गोष्टीत भ्रष्टाचार करीत असतो.

राष्ट्राच्या भवितव्याचे नाव सांगून अनेक राजकारणी नेते भ्रष्टाचार करतात. बोगस प्रतिष्ठान, नियम, अटी काढून राजरोस किती मोठ्या प्रमाणात पैसा जमवतात.

शेतकऱ्यांना शेतीसाठी आलेल्या अनुदानातून पैसे काटते, रस्ते- बांधकामाच्या कामातून पैश्याची आदला बदली करणे अश्या कित्येक नव- नवीन कारणांमधून पैसा कमावला जातो भ्रष्टाचार होतो.


भ्रष्टाचार एक कलंक :

काहीजण तर स्वतःच्या स्वार्थासाठी देशाला विकायला सुद्धा कमी करत नाहीत. देशातील गुप्त माहिती इतर देशाला देऊन त्यांच्या कडून पैसे घेणे परिणामी आतंकी हमले अशा समस्यांना तोंड द्यायला भाग पडावे लागते.

नोकरी करताना वरिष्ठ पदासाठी म्हणजे प्रमोशन साठी वरिष्ठ कर्मचाऱ्यांना पार्टी देणे, पैसे देणे हा एक प्रकारचा भ्रष्टाचारच समजला जातो.

पण हा भ्रष्टाचार करताना आपण विचार करत नाही की माणूस भ्रष्टाचारी होतो तरी का? माणसाच्या सर्व श्रद्धा निष्ठा हरवतात तर का ?

मंदिरातील देवाच्या सोन्याच्या मुर्त्या सुद्धा चोरीला जातात मग या वागणुकीला म्हणावे तरी काय ?

असे किती तरी प्रश्न आपल्या समोर पडतात. जेव्हा पैसा साठी भ्रष्टाचार करून एखाद्या गरीबा कडून पैशाची लाच घेऊन आपण आनंदी तरी राहू शकतो का ? मग हा भ्रष्टाचार करायचाच का ?

जेव्हा आपण कष्ट करून पैसे कमवतो त्याचा आनंद आपण पैशा सोबत मोजू पण शकत नाही. कोणी भ्रष्टाचार करून आपल्याला देशाला व स्वतःला सुद्धा वाईट मार्गावर घेऊन जात आहोत. प्रत्येक मनुष्याचे स्वप्न असते की चांगले शिकून समाजात चांगला माणूस म्हणून जगावे.

पण हा भ्रष्टाचार रुपी किड आपल्या समाजात येवढ्या मोठ्या प्रमाणात लागली आहे की, गरीब- श्रीमंत, लहान-मोठे, तरुण- म्हातारे सर्व भ्रष्टाचाराला बळी पडत आहेत.

म्हणून आपल्या देशाला या भ्रष्टाचाराच्या राक्षसा पासून मुक्त करायचे असेल तर सरकार बरोबर देशातील प्रत्येक नागरिकाने पाऊल उचलले पाहिजे.

भारत देशातील भ्रष्टाचार ही समस्या दूर झाली तर भारत देश हा विकसनशील देशांच्या यादीत येईल. व देशाची प्रगती सुद्धा होईल सोबतच देशातील प्रत्येक नागरिक प्रगती करेल. म्हणून प्रत्येक व्यक्ती प्रामाणिक पणे राहून आपले कर्तव्य पार करण्यासाठी जबाबदार झाला पाहिजे.

कोणतीही व्यवस्था, सुविधा आणि यंत्रणा जी लोकांच्या फायद्याची असेल ती अस्तित्वात आणलीच पाहिजे.

मानवी विकास हा फक्त आर्थिक दृष्ट्या न होता तो नैतिक दृष्ट्या होणे गरजेचे आहे.

आणि असेच झाले तेव्हाच भ्रष्टाचार आपल्या समाजातून दूर होईल. आणि आपल्या देशाचा विकास होईल व देशातील प्रत्येक नागरिक प्रामाणिक होईल.

भ्रष्टाचार शब्दाचा अर्थ ; भारतातील वाढता भ्रष्टाचार ; भ्रष्टाचाराचे परिणाम ; भ्रष्टाचार रोखण्यासाठी उपाय

 


प्रस्तावना:

कोणताही माणूस हा जन्मताच भ्रष्ट नसतो. परंतु माणसाला आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती म्हणजे हव्यास, दुर्बलता, लोभ आणि राक्षसी प्रवृत्ती त्याला भ्रष्टाचार करण्यास भाग पाडते. आजही भारत देश हा दिवसेंदिवस एक विकसित राष्ट्र बनण्याचा प्रयत्न करीत आहे.

परंतु या देशामोर अनेक गंभीर समस्या आहेत. जसे की बेरोजगारी, वाढती लोकसंख्या तसेच या सोबतच भ्रष्टाचार. आजच्या काळामध्ये आपल्या देशात भ्रष्टाचार हा सगळीकडे पसरला आहे.

आज भारतात जवळपास सर्व प्रकारच्या आयटी कंपन्या, मोठी कार्यालये, चांगली अर्थव्यवस्था असून सुद्धा भारत देश मागे आहे. याला सर्वात मोठे कारण म्हणजे भ्रष्टाचार होय. भ्रष्टाचाराने सर्व ठिकाणी आपले घर तयार केले आहे.

मग ते समाजातील लोक असो, सरकारी कर्मचारी किंवा राजकीय नेते असोत. भारतात अशा प्रकारे भ्रष्टाचार वाढला आहे. कधी–कधी भ्रष्टाचाराशिवाय काम सुद्धा होत नाही.


भ्रष्टाचार शब्दाचा अर्थ –


भ्रष्टाचार हा शब्द दोन शब्दानी मिळून बनलेला आहे – भ्रष्ट + आचार. भ्रष्ट म्हणजे वित आणि आचार म्हणजे आचरण. भ्रष्टाचार य शब्दाचा अर्थ होतो असे आचरनण जे कोन्त्यहि प्रकारे अनैतिक आणि अयोग्य आहे.

जेव्हा एखादी व्यक्ति न्याय न्यायालयीन व्यवस्थेच्या स्वीकारलेल्या नियमांच्या विरुद्ध जाऊन आपल्या स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करते त्याला भ्रष्ट म्हटले जाते.


भ्रष्टाचाराची कारणे

भ्रष्टाचाराची अनके कारणे आहेत.

असंतोष


जेव्हा एखाद्या व्यक्तीला कोणत्याही अभावामुळे त्या गोष्टीचा जर त्रास होत असेल तर त्याला भ्रष्टाचार करण्यास भाग पाडले जाते.

स्वार्थाची भावना आणि असमानता


असमानतेमुळे, आर्थिक आणि सामाजिक स्थिती एखाद्या व्यक्तीला भ्रष्ट बनवते. निकृष्टता आणि मत्सराचा बळी पडल्यामुळे भ्रष्टाचार स्वीकारण्यास भाग पडले जाते. त्याच प्रमाणे लाचखोरी, नातेवाईकांमधले वाद – विवाद हे सर्व भ्रष्टाचाराला जन्म देतात.

भारतातील वाढता भ्रष्टाचार


भ्रष्टाचार हा एखाद्या आजारासारखा असतो. आह हा भारत देशात जास्त वेगाने वाढत आहे. त्याच बरोबर वेगाने पसरत सुद्धा आहे.

जर याला वेळेवरच थांबले नाही तर संपूर्ण देशाला वेढेल. भ्रष्टाराचा परिणाम खूप व्यापक आहेत. आपल्या भारत देशातील असे कोणतेच क्षेत्र नाही जे त्याच्या प्रभावापासून मुक्त आहे.

भ्रष्टाचाराचे परिणाम


भ्रष्टाचार हा भारत देशात मोठया प्रमाणात पसरत आहे. जसे की ढोंगी बाबा आहेत, रस्ते, इमारत आणि पुलाचे काम करणारे कंत्राटदार आहेत या सर्वांमध्ये भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणात दिसून येतो.

तसेच भारत देशात बऱ्याच ठिकाणी धर्म, पंथ, श्रद्धा या सर्वांच्या नावाखाली लोकांचे शोषण केले जाते. त्याच प्रमाणे सरकारी कार्यलयांमध्ये पैसे दिले नाहीत तर काम होत नाही.

काही लोक हे पैशांसाठी, मोठे कर्मचारी आणि नेते चुकीच्या गोष्टी पास करतात. तसेच सरकारी कामासाठी सरकारी कार्यलयात काही लोक हे पैशांसाठी लोकांकडून पैसे वसूल करतात. याचा सर्वात जास्त परिणाम सामान्य लोकांवर होतो.

भ्रष्टाचार रोखण्यासाठी उपाय


भ्रष्टाचार हा एक संसर्गजन्य रोग आहे. भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी समाजातील विविध स्तरांवर कडक दंड व्यवस्था केली पाहिजे. आज भ्रष्टाराची अशी परिस्थिती आहे की, ती व्यक्ती लाचखोरीच्या प्रकरणात पकडली जाते आणि लाच देऊन सोडण्यात सुद्धा येते. त्यामळे प्रत्येक व्यक्तीने आपल्यामध्ये प्रामाणिकपणा बाळगावा.

निष्कर्ष:

भ्रष्टाचार हा मानवी समाजाला लागलेला एक अभिशाप आहे. जर आपल्याला आपल्या देशाचा आणि समाजाचा विकास करायचा असेल तर छोट्या – छोट्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपली छोटीशी चूक सुद्धा भ्रष्टाचार वाढविण्यास मोठी भूमिका बजावू शकते.