सोमवार, सप्टेंबर ०६, २०२१

पत्रकार कल्याण योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचा आढावा घेण्यासाठी समिती गठित

 


नवी दिल्ली - 3 सप्टेंबर २०२१ : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्रकार कल्याण योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयाने वरिष्ठ पत्रकार आणि प्रसारभारतीचे सदस्य अशोक कुमार टंडन यांच्या नेतृत्वाखाली एक दहा सदस्यीय समिती नियुक्त केली आहे.ही समिती या योजनेसाठी सध्या असलेल्या मार्गदर्शक तत्वांचा आढावा घेणार असून, त्यात बदल करण्यासाठी आवश्यक त्या शिफारसी सूचवणार आहे. पत्रकारीतेच्या क्षेत्रात, अलीकडच्या काळात बदललेली परिस्थिती तसेच कोविड-19 मुळे अनेक पत्रकारांचा झालेला मृत्यू या सगळ्या पार्श्वभूमीवर, हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.

    पत्रकार कल्याण योजना गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात असून त्याचे निकष आणि मार्गदर्शक तत्वामध्ये बदल करण्याची गरज आहे. त्याशिवाय, अधिस्वीकृतीधारक असलेल्या व नसलेल्या पत्रकारांना या कल्याणकारी योजनेत समानतेने बघण्याची गरज असून, त्यांनाही या योजनेचे लाभ मिळवून देणे महत्वाचे आहे.

    ही समिती येत्या दोन महिन्यात आपला अहवाल देणार आहे.तिच्या शिफारसींच्या आधारावर जास्तीत जास्त पत्रकारांना लाभ मिळू शकेल, अशा रीतीने नवी मार्गदर्शक तत्वे तयार करणे सरकारला शक्य होईल.अशोक टंडन यांच्या नेतृत्वाखालील या समितीत, द वीक चे निवासी संपादक, सच्चिदानंद मूर्ती, मुक्त पत्रकार शेखर अय्यर, न्यूज 18 चे अमिताभ सिन्हा, बिझनेस लाईन चे शिशिर कुमार सिन्हा, झी न्यूजचे विशेष प्रतिनिधि रवींद्र कुमार, पांचजन्यचे संपादक हितेष शंकर, हिंदुस्थान टाइम्स च्या स्मृति काक रामचंद्रन, टाइम्स नाऊचे अमित कुमार, इकॉनॉमिक टाइम्सच्या वसुधा वेणुगोपाल, आणि पत्रसूचना कार्यालयाच्या अतिरिक्त महा संचालक श्रीमती कांचन प्रसाद या सदस्यांचा  समावेश आहे.

पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या आदेशानुसार जिल्हयातील पिक विमाधारक शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीच्या 25 टक्के आगाऊ रक्कम देण्याचे जिल्हाधिका-याचे विमा कंपनीस निर्देश-जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे


  • सोयाबीनच्या उत्पादकतेत ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट ; हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अधिसुचना जिल्ह्यात लागू
  • जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली माहिती

नांदेड, दि. 3 सप्टेंबर 2021 :- नांदेड जिल्हयातील सर्व तालुक्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना सन 2021-22 अंतर्गत प्रतिकुल हवामान परिस्थिती (Mid-Season Adversity) अधिसुचना लागु केली. जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या पडलेल्या खंडामुळे सोयाबीनच्या फुलांची गळ तर शेंगा परिपक्व न झाल्याने पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसुन आले आहे. अशास्थितीत जिल्हयातील पिक विमाधारक शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीच्या 25 टक्के आगाऊ रक्कम मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ अधिसूचना काढण्याबाबत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सूचना दिल्या होत्या. विमाधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी ही अधिसुचना लागु केली आहे.

नांदेड जिल्हयात 26 जुलै ते 16 ऑगस्ट या 21 दिवसाच्या कालावधीत पावसाचा खंड पडल्याने काही भागात सोयाबीनचे नुकसान दिसून आले. जिल्हयामध्ये समितीमार्फत याबाबत सर्वेक्षण करण्यात आले असून जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादकतेमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. 

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या शासन निर्णयानुसार हंगाम कालावधीत प्रतिकुल परिस्थिती जसे पुर, पावसातील खंड, दुष्काळ आदी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये सरासरी उत्पन्नाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमा धारक शेतकऱ्यांना 25 टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्याची तरतुद आहे.

समितीच्या सर्वेक्षण अहवालानुसार नांदेड जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादनामध्ये 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षीत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सोयाबीन, कापुस, तुर व ख. ज्वारी या पिकांसाठी हंगामातील प्रतिकुल परिस्थिती (Mid-Season Adversity) अधिसूचना लागु केली आहे. सर्व पात्र विमाधारक शेतकऱ्यांना विहीत मुदतीत नुकसान भरपाई आगाऊ रक्कम अदा करणेबाबत विमा कपंनीस निर्देश दिले.

तालुकानिहाय सायोबिन उत्पादकतेत घट : 

नांदेड तालुका 62.33, अर्धापुर 55.00, मुदखेड 61.67, बिलोली 61.98, धर्माबाद 61.74, नायगाव 60.00, मुखेड 60.37, कंधार 61.69, लोहा 64.00, हदगाव 59.75, हिमायतनगर 66.65, भोकर 64.73, उमरी 60.27, देगलूर 60.72, किनवट 68.79, माहूर 67.19 याप्रमाणे सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत अपेक्षित उत्पादकतेत येणारी घट टक्केवारी मध्ये आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली आहे.

चौकट

पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी जिल्ह्यासाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अधिसूचना लागू केली आहे

0000

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरिप हंगाम २०२० व रब्बी हंगाम २०२०-२०२१ पासून तीन वर्षांकरिता राज्यात राबविणे बाबत

Blogspot - जिल्हा माहिती कार्यालय,नांदेड महाराष्ट् शासन, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

facebook - जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड