मंगळवार, ऑगस्ट २४, २०२१

RTI मुळे त्रस्त झालेल्या इंदापूर पंचायत समिती कर्मचाऱ्यांचं 23 ऑगस्टपासून कामबंद आंदोलन

 

  • कामबंद आंदोलनाला गटविकास अधिकाऱ्यांचा पुढाकार

इंदापूर,दि २४ ऑगस्ट २०२१ : जोपर्यंत जनहिताऐवजी वैयक्तिक माहिती अधिकार वापरून इंदापूर पंचायत समिती कामकाजात अडथळा आणणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा बंदोबस्त होत नाही, तोपर्यंत इंदापूर पंचायत समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या नेतृत्वाखाली दि. २३ ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले.

यामधून अत्यावश्यक सेवा, घरकुल आदींना वगळण्यात आले आहे मात्र या आंदोलनामुळे इंदापूर तालुक्यातील नागरिकांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे असल्याने सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यामध्ये लक्षघालून जनतेसाठी कामबंद आंदोलन थांबवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात गटविकास अधिकारी विजयकुमार परीट पत्रकारांशी बोलताना म्हणाले, गेले काही दिवस पंचायत समितीच्या कामकाजात अडथळे निर्माण केले जात आहेत. वारंवार माहितीचा अधिकार, उपोषण याद्वारे तेच-तेच लोक कोणतेही जनहित नसताना त्रासदेण्याचे काम करत आहेत. त्यामध्ये काही सामाजिक संघटना व माहितीचा अधिकार कार्यकर्त्यांचा समावेश आहे. माहिती एकच मात्र ती विविध माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून मागवून मुद्दाम त्रास दिला जातो.

त्यामुळे चांगले काम करून देखील इंदापूर तालुक्याची बदनामी होत आहे. त्यामुळे आम्ही सर्वच कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत यांचा बंदोबस्त होत नाही,तोपर्यंत कामकाज बंद ठेवायचा निर्णय घेतला आहे. तसेच जाणूनबुजून माहिती मागविणाऱ्या त्याच कार्यकर्त्यांविरुद्ध मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे दाद मागणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माहितीच्या अधिकाराचे अस्त्र दिले मात्र त्याऐवजी कामे होण्याऐवजी त्याचा काही जणांनी व्यवसाय केला आहे. त्यामुळे अशा कार्यकर्त्यांच्या अधिकारावर गदा आणून त्यांना कायद्याच्या कक्षेत आणून माहिती अधिकाराचा दुरुपयोग करणाऱ्यास शिक्षेस पात्र करावे अशी मागणी शासकीय कर्मचारी यांनी केली आहे.

आम्ही आमच्यासाठी' या संकल्पनेतून पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकार पतपेढी उभारणार - म.प.सं.ता.अ.नागेश पा.कल्याण


नायगाव,दि. २४ ऑगस्ट २०२१ : पत्रकार आर्थिक सक्षम झाले पाहिजेत यासाठी पत्रकार संघाच्या माध्यमातून सर्वांनी एकदिलाने एकजुटीने "आम्ही आमच्यासाठी"या विचार धारेवर काम करावं त्या माध्यमातून पत्रकारांसाठी आपण पत्रकार पतपेढी उभारू असे प्रखर मत मराठी पत्रकार संघाचे नूतन नायगाव तालुका अध्यक्ष नागेश पाटील कल्याण यांनी व्यक्त केले.

      पुढे बोलताना ते असे ही म्हणाले की, पत्रकारितेच्या माध्यमातून आपण पूर्णवेळ समाजसेवेचे काम करतो संपादकीय विभागा प्रमाणे आपणास कसलेही वेतन नसते. असे असताना देखील ही वर्तमानपत्राच्या ध्येय धोरणाप्रमाणे ग्रामीण भागातील समाजमनाचा आरसा जगा समोर आणण्यासाठी जीवाचा आटापिटा करून बातमी व वृत्त संकलन करीत असतो. यावेळी अनंत अडचणींचा सामना ही प्रसंगी आपनास करावा लागतो. यात आर्थिक अडचणीचा ही मोठा प्रश्न आपल्यासमोर नित्याचा असतो. ग्रामीण क्षेत्रात मिळकत तर नसतेच वरून ताण अधिक असतो. याकरिता हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण आपले पत्रकारितेचे कार्य करीत आपली आर्थिक उन्नती कशी साधता येईल यासाठी "आम्ही आमच्यासाठी" या संकल्पनेतून कार्य करण्याची नितांत गरज आहे. कारण आपण एखाद्या गल्ली बोळातील नेत्याची बातमी लिहितो तो राष्ट्रीय नेता म्हणून उदयाला येतो. एखाद्या उद्योजकाची बातमी घेतो तेंव्हा तो शासनाकडून कोट्यवधींच्या सवलती पदरात पाडून घेतो. आणि एखाद्या अधिकाऱ्याची बातमी घेतली तर तो उच्च पदस्थ पदावर ही पोहचतो. पण आपली प्रश्न मात्र तशीच वर्धापन, दिवाळी, चार दोन हजाराची जाहिरात शे पाचश्याची मिळकत व वर्षभर त्या जाहिरातीच्या बदल्यात बातमी फुकट यामुळे कुठे मान न कुठे सन्मान ही शृंखला बंद करायची असेल तर आपण आपल्या पत्रकार संघाच्या माध्यमातून "आम्ही आमच्यासाठी" या संकल्पनेच्या माध्यमातून व्यापक अर्थाने व एकजुटीने कार्य करण्याची गरज आहे. यासाठी या माध्यमातून ज्यांना जशी आर्थिक मदत करता येईल तशी त्यांनी करावी व सर्वांच्या सहकार्यातून जमणाऱ्या निधीतून पत्रकार पतपेढी स्थापन करून अडचणीत असणाऱ्या आपल्या भावंडाना अडचणीच्या वेळी व बचत गटांच्या निर्मितीच्या माध्यमातून लघु व कुटीर उद्योग व्यवसाय यासाठी ही मदत करता येईल. व बिकट परिस्थिती असणाऱ्या आपल्या बांधवांची आर्थिक स्थिती ही सुधारता येईल. यासाठी तालुक्यातील जेष्ठ वरिष्ठ व सहकारी सर्वच पत्रकार बांधवानी या कामासाठी एकजुटीने व एकदिलाने कार्य करावे. जेणेकरुन कोरोनाच्या संकटाने दोन पत्रकार बांधव आपण गमावलो पण इतरांसाठी घरच्या लेकरा बाळांना उपाशी ठेवून वेळ देणारे,अडचणीस मदत करणारे आपण असून ही, आपल्या सहकार्यांच्या कुटुंबियांना ही आपण काही मदत करू शकलो नाही.ही आपली शोकांतिका आहे. कारण एकच पत्रकारितेत काम करणाऱ्या सर्वांचीच परिस्थिती मजबूत आहे असे नाही. यामुळे आपण सर्वांनी आता आपल्यासाठी ही थोडे जगणे गरजेचे आहे. असे मला वाटते कारण आपल्या तालुक्यात आजघडीला सर्वच वर्तमानपत्रांची व न्यूज पोर्टल यूट्यूब चैनल या सर्वांची मिळून 70 च्यावर संख्या पत्रकार बांधवांची आहे. या सर्वांनी ठरवून कार्य केले तर हे कार्य ही कठीण नाही. असे ही ते म्हणाले.ते तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार संघाच्या संघटनात्मक बांधणी सहविचार तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते.यावेळी तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी, पत्रकार यांची उपस्थिती होती.