शनिवार, जून १२, २०२१

निलंबन : उप विभागीय अधिकारी याला आर्थिक देवाण-घेवाण प्रकरणी राज्य सरकारने केले तडकाफडकी निलंबित

 


सोलापूर,दि १० जून : दक्षिण सोलापूर व अक्कलकोटचे प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना आर्थिक देवाणघेवाणीच्या तक्रारीवरून राज्य शासनाने गुरुवारी तडकाफडकी निलंबित केल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली. महसूल व वनविभागाचे उपसचिव डॉ. माधव वीर यांनी दिपक शिंदे यांचा निलंबनाचा आदेश काढण्यात आला असून हा आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला आहे. प्रांताधिकारी दिपक शिंदे यांच्याविरोधात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून गंभीर स्वरूपाच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. शिवाय या तक्रारीसोबत आर्थिक देवाणघेवाणीसंदर्भातील ध्वनिफितही दाखल करण्यात आली होती. या ध्वनिफितीतील आर्थिक देवाणघेवाणचे संभाषण हे गंभीर स्वरूपाचे असल्याने, शासनाने दिपक शिंदे यांची विभागीय चौकशी करण्याचे ठरविले आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रांताधिकारी शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.प्रांताधिकारी पदाचा कार्यभार असताना त्यांच्याकडे भूसंपादनाचीही अतिरिक्त जबाबदारी होती. तसेच प्रांताधिकारी पदाचा कार्यभार घेण्यापूर्वी ते पूर्णवेळ भूसंपादन अधिकारी म्हणून काम पाहत होते. भूसंपादन कामातही त्यांच्याविषयी अनेक बाधित शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. तसेच शासनाचे वाहन असताना ते खासगी वाहन वापरत होते. त्या वाहनावर आरटीओ किंवा जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता निळा दिवा ते वापरत होते. या वाहनावर चालकही खासगीच होता. सरकारी सेवेतील चालक नाकारून खासगी चालक ठेवण्याचे कारण गुलदस्त्यात होते. आता त्यांच्या या सर्व कारभाराची चौकशी होणार आहे. प्रांताधिकारी शिंदे यांच्याविरूध्द नागरिकांच्याही मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या. प्रांताधिकारी पदाचा कार्यभार असताना त्यांच्याकडे भूसंपादनाचीही अतिरिक्त जबाबदारी होती. तसेच प्रांताधिकारी पदाचा कार्यभार घेण्यापूर्वी ते पूर्णवेळ भूसंपादन अधिकारी म्हणून काम पाहत होते. भूसंपादन कामातही त्यांच्याविषयी अनेक बाधित शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या.



शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ ची सुरुवात दिनांक १५ जून २०२१ पासून ! मात्र विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा प्रश्न जैसे थे



  • शाळेत विद्यार्थ्यांना बोलवण्या संदर्भात अद्याप सूचना नाहीत.
  • आस्थापना वरील १००% कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
  • सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याच्या सूचना.

नांदेड, दि १२ जून २०२१ : नांदेड जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ ची सुरुवात दिनांक १५ जून पासून करण्यात येत आहे,तसे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना ११ जून रोजी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीचे पत्र पाठवण्यात आले आहे.

शिक्षण संचालक यांच्या ३० एप्रिल २०२१ रोजीच्या पत्रानुसार शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या सत्राची दिर्घ सुट्टी संपल्यानंतर जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापन,सर्व माध्यम व सर्व प्रकारच्या शाळा दिनांक १५.०६.२०२१ मंगळवार पासून सुरु होत आहेत.त्यानुसार आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना कळवावे अशा सूचना शिक्षण संचालक यांनी जिल्हापरिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिका-यांना दिल्या होत्या.

तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा जिल्हाधिकारी नांदेड यांनी ६ जून २०२१ नुसार शाळेत विद्यार्थ्यांना बोलवणे संदर्भात अद्याप कोणत्याही सूचना नाहीत परंतु सर्व आस्थापनावरील १००% कर्मचारी उपस्थितीसह शाळा सुरु राहतील अशा सूचना असल्याने सर्व शिक्षकांना उपस्थित राहावे लागणार आहे.

१५ जून पासून सर्व शिक्षक शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे प्रवेश, शैक्षणिक नियोजन, ऑनलाईन शिक्षण, वृक्षारोपण इत्यादी उपक्रम राबविण्यास सुरुवात करावी.कोरोना संदर्भातील मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर राखणे,हॅंडवॉश सुविधा यांची आवश्यक ती दक्षता घ्यावी व दिनांक १५ जून २०२१ रोजी सर्व शाळा सुरु झाल्याबाबत आणि शिक्षक उपस्थिती बाबतचा अहवाल तात्काळ सादर करण्याच्या सूचना ही देण्यात आली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ची सुरुवात करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिका-यांना पत्राद्वारे सूचना दिल्याची माहितीही वरिष्ठांना म्हणजे जिल्हाधिकारी,मुख्यकार्यकारी अधिकारी तसेच शिक्षण उपसंचालक लातूर यांना प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडून देण्यात आली आहे.



साई प्रसाद सेवाभावी संस्थेने नायगाव तालुक्यातील कार्ला येथील वडजे कुटुंबाला दिला आधार

 


नांदेड : नायगाव तालुक्यातील कार्ला येथील तरूण संजय वडजे ( वय २७ ) शेतीत फारसे उत्पन्न निघत नसल्याने नांदेडात उदर निर्वाह निमित्ताने आला होता.तो खाजगी दुकानात नोकरी करून कसा बसा पोट भरत होता.त्यात त्याचा विवाह झाला, त्याला दोन मुली झाल्या. विवाहानंतर पती-पत्नी दोघे मेहनत करून संसाराचा गाडा चालवित होते.सर्व काही आनंदात चालले होते. पण देवाची नजर या सुखी संसारावर पडली असावी.संजय वडजे याला पोटाचा आजार झाला.

त्यावर विविध रूग्णालयात उपचार करण्यात आले.तो एक प्रामाणिक तरूण होता.तो कोणाचे मन दुखवत नसे.संजय हा आमच्या परिवारातील सदस्य वाटायचा.त्याला कोणतेही व्यसन नव्हते ! तरी लिव्हरवर सूज आली,या आजारावर बराच खर्च झाला. पण उपयोग झाला नाही. म्हणतात ना ! जो आवडे सर्वांना तोचि आवडे देवाला.त्याप्रमाणे संजयचे निधन झाले.संजयच्या सर्व चाहत्यांना धक्का बसला.पत्नीसमोर दोन मुलीला घेवून आयुष्य कसे काढावयाचे? याची चिंता आहे. संजय परिवाराला मी माझा व परिवार चांगला परिचित असल्याने नांदेडच्या साईप्रसादकडे या कुटुंबाला स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करावी अशी विनंती केली.


प्रा. अनंत मान्नीकर यांनी यासाठी पुढाकार घेतला. साई प्रसाद या सेवाभावी संस्थेकडे प्रस्ताव पाठविला गेला. त्यानंतर या सेवा भावी संस्थेने शिलाई, पिको फॉल मशीन,कपडे व नगदी सहा हजार रूयये मुलींना शाळेत प्रवेश घेण्यासाठी देण्यात आले.साई सेवा संस्थेची मदत देतांना संजयच्या कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू  आले. जे रंजले गांजले त्याशी म्हणे आपुले --- याप्रमाणे साई सेवाभावी संस्थेने स्व. संजय वडजे कुंटुंबाला आधार दिला आहे.

साईसेवा संस्था अनेक कुटुंबाला आर्थिक मदत देवून माणसूकीचे दर्शन घडवत असते.त्यांच्या कार्याला माझा मानाचा मुजरा.

कमलाकर जोशी ज्येष्ठ पत्रकार नांदेड.