मंगळवार, एप्रिल १३, २०२१

उद्या रात्रीपासून 15 दिवसाकरिता महाराष्ट्रात संचारबंदी(लॉकडाऊन) लागू_महाराष्टाच्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय:काय सुरु, काय बंद राहणार?

 राज्यात संचारबंदीचे आदेश लागू असणार आहे. महत्वाची बाब म्हणजे या काळात काय सुरु आणि काय बंद राहणार, हे सर्वसामान्य जनतेसाठी अत्यावश्यक बाब आहे. 

मुंबई,दि. १३ एप्रिल २०२१

राज्यात १ मे पर्यंत कडक निर्बंध लागू

दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज

कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करताना गरजूंच्या पाठिशी

कुणाचीही आबाळ होऊ देणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

एक महिन्यांचा शिधा, शिवभोजन थाळीही मोफत देणार

कामगारांसह, आदिवासी, असंघटीत क्षेत्राला दिलासा

मुंबई, दि. १३ : - कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा करतांना या काळात आर्थिक दुर्बल घटकांना याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देणारे ५ हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

 राज्यात उद्या बुधवार दि १४ एप्रिल २०२१ पासून रात्री ८ वाजेपासून १ मे २०२१ पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील व या काळात संपूर्ण संचारबंदी राहील. केवळ आवश्यक सेवा सुविधा सुरु राहतील. यासंदर्भातील ब्रेक दि चेनचे नवे आदेश आज प्रसिद्ध करण्यात आले आहेत.   

राज्यात मार्च २०२१ पासून कोविड-१९ ची दुसरी लाट आली असून या लाटेमध्ये बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रुग्णांची संख्या कमी करण्याची गरज म्हणून कडट टाळेबंदी लागू करण्यात येत आहे. पण या काळात आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी अन्नधान्य आणि आर्थिक सहाय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संकटाचा मुकाबला करताना शासन गरजूंच्या पाठिशी उभे आहे. याकाळात कुणाचीही आबाळ होऊ देणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

सर्व दुर्बल घटकांना दिलासा

आर्थिक दुर्बल घटकांमधील दारिद्रय रेषेखालील कुटुंबे, महिला, वयोवृध्द नागरीक, विधवा, दिव्यांग, असंघटित क्षेत्रातील नागरिक, कामगार, रिक्षाचालक व आदिवासी समाज यांना विचारात घेवून आर्थिक सहाय देण्यात येणार आहे. यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, उद्योग-ऊर्जा व कामगार विभाग, नगर विकास विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अर्थसहाय देण्यात येणार आहे.

एक महिना मोफत अन्नधान्य

अन्न सुरक्षा योजना लाभार्थी मोफत अन्नधान्य योजनेतून राज्यातील सुमारे सात कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य देण्यात येईल.

शिवभोजन थाळी मोफत

राज्यात शिवभोजन योजनेतून गरजूंना एक महिना शिवभोजन थाळी मोफत देण्यात येतील. सुमारे दोन लाख थाळ्या देण्याचे नियोजन आहे.

निवृत्तीवेतन योजना लाभार्थींना आर्थिक सहाय्य

या विभागाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, अशा या पाच योजनेतील सुमारे ३५ लाख लाभार्थ्यांना दोन महिन्यांकरिता प्रत्येकी एक हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य आगाऊ देण्यात येईल. .

बांधकाम कामगारांना अनुदान

नोंदणीकृत बांधकाम कामगार कल्याण योजनेंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या निधीमधून राज्यातील नोंदणीकृत अशा सुमारे १२ लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अनुदान देण्यात येईल. याशिवाय राज्यातील २५ लाख घरेलू कामगारांसाठी विविध कल्याणकारी सहाय्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.

फेरीवाल्यांना आर्थिक सहाय्य

राज्यातील सुमारे पाच लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल. ही रक्कम थेट फेऱीवाल्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

राज्यातील बारा लाख रिक्षाचालकांनाही प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल.

आदिवासी कुटुंबांना सहाय्य

आदिवासी विकास विभागाच्या खावटी योजनेचा लाभ घेत असलेल्या सुमारे १२ लाख आदिवासी कुटुंबांना प्रति कुटुंब दोन हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य येईल.

कोविडवरील सुविधा उभारणी

याशिवाय जिल्हास्तरावरील टाळेबंदी कालावधीतील व्यवस्थापनासाठी सुमारे ३ हजार ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून जिल्ह्यांना कोविडवरील औषधोपचार, उपकरणे, सुविधा उभारणी व इतर व्यवस्थेसाठी हा निधी संबंधित जिल्ह्याला देण्यात येईल.

 याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य शासन व इतर शासकीय संस्था यांना द्यावे लागणारे कर, शुल्क व इतर देय रकमा या एप्रिल व मे या दोन महिन्यांसाठी विनाव्याज भरण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे.

  • अत्यावश्यक काम नसेल तर कोणीही बाहेर पडू नये...
  • सर्व आस्थापना बंद राहतील (अत्यावश्यक सेवा वागळता)
  • सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद राहणार नाही... त्याचा वापर केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच
  • रुग्णालये, मेडीकल, लस उत्पादक, वाहने, मास्क इत्यादि सुरु..
  • हवाई वाहतूक, रेल्वे, सुरु
  • पावसाळी कामे सुरु राहतील
  • बँक, इ- कॉमर्स सुरु
  • पेट्रोल पंप सुरु राहतील
  • हॉटेल्स, बार बंद,

फक्त पार्सल सुरु

  • सकाळी 7-8 रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्री पार्सल सुरु...

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना वीजजोडणीसाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’ऊर्जामंत्री यांच्या पुढाकाराने महावितरणची योजना

  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपासून होणार अंमलबजावणी
  • उद्योजकांचेही प्रश्न सोडवणार
मुंबई, दि. १२ एप्रिल : अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने महावितरणद्वारे घरगुती ग्राहकांसाठी वीज जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पुढाकार घेतला असून येत्या दि. १४ एप्रिल ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या निर्देशानुसार या योजनेसंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला.

ऊर्जामंत्री डॉ. राऊत या योजनेच्या अनुषंगाने माहिती देताना म्हणाले की, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शोषित व उपेक्षित घटकांचे मुक्तिदाते म्हणून सुपरिचित आहेत. शिक्षणाच्या बळावर व उपेक्षित, शोषितांच्या व एकूणच समग्र भारतीयांच्या जीवनात क्रांतीकारक बदल घडवून आणण्याचे काम त्यांनी केले असून एक प्रकारे आधुनिक भारताची पायाभरणी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती जगभरात दि. 14 एप्रिल 2021 रोजी साजरी होत आहे. या जयंतीनिमित्त राज्यातील अनुसुचित जाती, जमाती प्रवर्गातील व्यक्तींचे जीवन प्रकाशमान करण्‍याच्या दृष्टीने वीज जोडणी कार्यक्रम दि.14 एप्रिल 2021 ते दि.6 डिसेंबर 2021 अर्थात बाबासाहेबांची जयंती ते पुण्यतिथी या कालावधीत राबविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

याशिवाय या योजनेत अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीच्या असंघटित उद्योगामधील वीज पुरवठ्यासंबंधीच्या तक्रारी, समस्यांचे निवारण करण्याबाबतच्या उपाययोजनांचाही समावेश असेल.

असा घेता येईल लाभ

योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अर्जदाराकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र, वीज जोडणीकरिता करण्यात येणाऱ्या विहित नमुन्यानुसार अर्जाकरिता आवश्यक कागदपत्रे जसे की, आधार कार्ड, रहिवासी दाखला आदी असणे आवश्यक असेल. तसेच अर्जदारांनी वीजजोडणीसाठी अर्ज केल्याच्या ठिकाणी यापूर्वीची थकबाकी नसावी. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने महावितरणच्या विहित नमुन्यात कागदपत्रासह ऑनलाईन अथवा ऑफ लाईन अर्ज करणे आवश्यक राहील. शासनमान्य विद्युत कंत्राटदारांकडून वीज मांडणीचा चाचणी अहवाल अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. लाभार्थ्याने 500 रुपये इतकी अनामत रक्कम महावितरणकडे जमा करणे आवश्यक राहील. अर्जदारांचा परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या तरतुदीच्या अधीन राहून वीज जोडणी उपलब्ध करण्यात येईल.

महावितरणद्वारे प्राप्त अर्जानुसार ज्या अर्जदाराच्या घरी वीज जोडणी नाही अशा लाभार्थ्यांना विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास पुढील 15 कार्यालयीन दिवसात वीज जोडणी उपलब्ध करण्यात येईल. तसेच जेथे अर्जदारास वीज जोडणीकरीता विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध करावी लागणार असल्यास अशा ठिकाणी महावितरणद्वारे निधी अथवा जिल्हा नियोजन विकास निधी अथवा इतर उपलब्ध होऊ शकणाऱ्या निधीमधून प्राध्यान्याने हाती घेऊन पूर्ण करण्यात येईल व वीज जोडणी उपलब्ध करण्यात येईल.

उद्योजकांचेही प्रश्न सोडवणार

याशिवाय अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीच्या असंघटित उद्योगांमधील वीज समस्यांचे प्राध्यान्याने निराकरण होण्याच्या दृष्टीने महावितरण स्तरावर प्रत्येक मंडळातील किंवा जिल्हास्तरावर अधीक्षक अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यक्षेत्राकरिता कृती दलाची स्थापना करण्यात येईल. अशा कृती दलात त्या कार्यक्षेत्रातील अनुसुचित जाती/ अनुसुचित जमातीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या उद्योजकांचा समावेश असेल. मुख्य अभियंता स्तरावर याचा दर महिन्यांनी आढावा घेण्यात येईल.

या योजनेतील तक्रारीचे निराकरण होण्याच्या दृष्टीने महावितरणस्तरावर समर्पित वेब पोर्टल निर्माण करण्यात येईल. या योजनेच्या अंमलबजावणीचे संनियंत्रण व आढावा घेऊन शासनास फलनिष्पत्ती अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि. 12.04.2021

Tags: अनुसुचित जाती

धक्कादायक : नायगावमधील टेंभुर्णी येथे मोठ्या भावाने आपल्या सख्ख्या छोट्या भावाचा धारदार शस्त्राने केला खून

 

 

नायगाव,दि.13 एप्रिल : वडीलांनी स्वतःच्याच खुनी मुला विरोधात दिलेल्या तक्रारीवरुन नायगाव पोलीस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे, त्यानंतर आरोपीस अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नायगांव तालुक्यातील टेंभुर्णी येथील माधवराव वडजे यांना दोन मुले होती. मोठा संदीप तर दुसरा विश्वजित पण या दोन भावात मागच्या एक दिड वर्षांपासून कौटुंबिक वाद होता. एक वर्षापूर्वी दोघा भावात असेच जोरदार भांडणे होत असतांना संदीप वडजे यांची पत्नी भांडण सोडवण्यासाठी मध्ये आली असता विश्वजितने त्यांच्यावरच चाकुने हल्ला केला होता. 

या घटनेपासून दोन भावातील वाद विकोपाला गेला. त्यामुळे नातेवाईकांनी मध्यस्थी करुन वाद मिटवला व दोघांना वेगळे केले. वाद मिटला असला तरी संदीपची पत्नी भितीने नांदायलाच यायला तयार नव्हती. त्यामुळे याचा राग संदीपच्या डोक्यात होता. त्याचबरोबर विश्वजित अधूनमधून तुला बघतो अशा धमक्याही देत होता त्यामुळे आपल्या जिवितास धोका होवू शकतो अशी भावना निर्माण झाली त्यामुळे भावाचा काटा काढल्याशिवाय आपण सुखी होणार नाही अशी मनाशी पक्की खुनगाठ बांधून ठेवली होती. आणि तशी संधी सोमवारी दि. 12 रात्री चालून आली. 

टेंभुर्णी येथील नवी आबादीमध्ये कँनालच्या बाजूला विश्वजित बांधकाम करत होता आणि 12 च्या रात्री बांधकाम होत असलेल्या घरासमोरच झोपलेला असतांना दि. 13 च्या पहाटे झोपीत असलेल्या विश्वजितच्या डोळ्यात तिखट टाकून धारधार शस्त्राने गळ्यावर वार केला. या हल्ल्यात विश्वजीत जागीच गतप्राण झाला.या धक्कादायक घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतदेह पोस्ट मार्टम करण्यासाठी नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी मयताचे वडील माधवराव विठ्ठलराव वडजे यांनी स्वतःच्याच खुनी मुला विरोधात नायगांव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन संदीप माधवराव वडजे याच्या विरोधात खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सिध्देश्वर धुमाळ करत आहेत.

#खुन प्रकरण