मंगळवार, एप्रिल ०६, २०२१

आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य मॉडेल निवासी शाळेच्या पदभरतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबई,दि 6 एप्रिल : आदिवासी विकास विभागांतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी नवीन शैक्षणिक वर्षात महाराष्ट्रात 14 एकलव्य मॉडेल निवासी शाळा सुरू होणार आहेत. या अनुषंगाने महाराष्ट्रात एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये एकूण 216 जागांसाठी पदभरती होणार असून याकरिता 30 एप्रिल 2021 पर्यंत आवेदनपत्र सादर करण्याचे आवाहन आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या 25 शाळांमध्ये इयत्ता 6 वी ते 12 वी च्या वर्गात साधारण 6000 पेक्षा अधिक अनुसूचित जमातीचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. केंद्राकडून महाराष्ट्रात या एकलव्य मॉडेल निवासी शाळेमध्ये प्राचार्य (16), उप-प्राचार्य (08), टी.जी.टी. (इंग्रजी, फिजिक्स, गणित, अर्थशास्त्र, बायोलॉजी, कॉमर्स)(28) आणि पी.जी.टी (इंग्रजी, हिंदी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र) (164) अशा एकूण 216 जागांसाठी पदभरती होणार आहे. या पदांसाठी 30 एप्रिल 2021 पर्यंत अर्ज

 https://recruitment.nta.nic.in/WebinfoEMRSRecruitment      या संकेतस्थळावर करावे.

पदभरतीकरिता होणारी परीक्षा ही तीन तासांची असून ही परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या किंवा जून 2021 या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. तसेच ही परीक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषेत संगणकावर घेण्यात येईल, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.


Current Events

Press Release new

Information Bulletin

APPLY FOR EMRS TEACHING STAFF SELECTION EXAM 2021



Tags: एकलव्य मॉडेल निवासी शाळा

आता शिवभोजन केंद्रावर देखील शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात मिळणार- अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

 कोरोना काळात मजूर, कामगार,शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळीचा मोठा आधार. सर्व हॉटेल, उपाहारगृहे यांना पार्सल सुविधाच देण्याचे राज्य सरकारचे आदेश. त्यामुळे आता शिवभोजन केंद्रावर देखील शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात मिळणार- अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ


मुंबई, दि. 6 एप्रिल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संपूर्ण राज्यात ‘ब्रेक दि चेनच्या‘ अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात जनतेला उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.

कोरोना काळात मजूर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळी मोठा आधार देत आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे सर्व हॉटेल, रेस्टॅारंट यांना पार्सल सुविधाच देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे आता शिवभोजन केंद्रावरदेखील शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात उपलब्ध होणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

मंत्री श्री. भुजबळ म्हणाले, सरकारने लागू केलेल्या सर्व नियमांचे पालन जनतेने करावे आणि प्रशासनाला मदत करावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या पार्सल सुविधेच्या निर्णयामुळे शिवभोजन थाळीच्या किंमतीमध्ये कोणताही बदल केला नाही. पूर्वीप्रमाणेच 5 रूपयात शिवभोजन थाळी सर्वसामान्य जनतेला उपलब्ध होणार आहे.

कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला थांबविण्यासाठी सरकारने ‘ब्रेक दि चेन’ या मोहिमेच्या अंतर्गत काही कडक निर्बंध लागू केले आहेत. या नियमांचे सर्वांनी पालन केले तरच आपण कोरोनाला रोखू शकतो त्यामुळे सर्वांनी राज्य शासनाला सहकार्य करावे असे आवाहनदेखील श्री. भुजबळ यांनी केले आहे.


राज्य सुकाणू समितीच्या बैठकीत मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी राज्यात सुरु असलेल्या लसीकरणाचा घेतला आढावा

राज्य सुकाणू समितीच्या बैठकीत मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी राज्यात सुरु असलेल्या लसीकरणाचा घेतला आढावा. राज्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी केंद्र शासनाकडून लसींचा अधिकाधिक पुरवठा होण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना.
राज्यात दररोज ४ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण

८२ लाख नागरिकांना लसीकरण करुन महाराष्ट्र देशात अग्रेसर; मुख्य सचिवांकडून लसीकरणाचा आढावा

मुंबई,दि 6 एप्रिल : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून 80 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. राज्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी केंद्र शासनाने लसींचा अधिकाधिक पुरवठा करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिल्या.

कोरोना लसीकरणासंदर्भात नियोजन व समन्वयासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या राज्य सुकाणू समितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य सचिवांनी राज्यात सुरु असलेल्या लसीकरणाचा आढावा घेतला. शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ.पी.गुप्ता आदी यावेळी उपस्थित होते.

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. व्यास यांनी सादरीकरण केले. महाराष्ट्रात सुमारे एक कोटी सहा लाख डोसेस प्राप्त झाले असून त्यापैकी 88 लाख डोसेसचा वापर झाला आहे. महाराष्ट्रात डोस वाया जाण्याचे प्रमाण तीन टक्के आहे. ते अत्यंत कमी असून राष्ट्रीय सरासरीच्या देखील निम्मे आहे. दि. 5 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात 81 लाख 21 हजार 332 नागरिकांना लसीकरण करण्यात आले. राज्यात दररोज 4 लाख नागरिकांना लसीकरण केले जात आहे.

80 लाखाहून अधिक लोकांना लसीकरण करुन महाराष्ट्राने देशात अग्रक्रमात सातत्य राखल्याबद्दल यंत्रणेचे अभिनंदन करतानाच लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याच्या सूचना मुख्य सचिवांनी केल्या. 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाची राज्य सरासरी 12.3 टक्के असून राज्यातील भंडारा, कोल्हापूर, नागपूर, मुंबई, पुणे, सांगली, गोंदिया, वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यांनी राज्य सरासरीपेक्षा अधिक लसीकरण केले आहे. औरंगाबाद, पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, ठाणे या सहा जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या जास्त असून येथे प्राधान्याने 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी यंत्रणेने प्रयत्न करावेत. राज्यातील लसीकरणाचा वेग पाहता केंद्र शासनाकडून जास्तीचा लस पुरवठा होण्याकरिता पाठपुरावा करण्यात येईल असे मुख्य सचिवांनी सांगितले.

Tags: लसीकरण


जलसिंचन उपसा विभागाच्या ३१ वर्षीय लाचखोर महिला सहायक अभियंतीस ९० हजाराची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले

 


पुणे : पवनानगर येथील जलसिंचन उपसा विभागाच्या सहाय्यक अभियंत्या महिलेला 90 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे.

मोनिका रामदास ननावरे (वय 31) असे पकडण्यात आलेल्या सहाय्यक अभियंत्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. यातील तक्रारदार मावळ तालुक्यातील करूजगावचे आहेत. त्यांची तेथे शेती आहे.या शेताला पवना नदीतून पाणी उपसा करण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. त्यावेळी लोकसेवक मोनिका यांनी तक्रारदार याच्याकडे परवानगी देण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार आज सापळा कारवाईत मोनिका यांना तडजोडीअंती 90 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.